भावी मुख्यमंत्री, जे एका मताने आमदारकीलाच पडले होते.

‘एक चुटकी सिंदूर की किमत’ रमेश बाबूंना समजली की नाही ते माहित नाही पण ‘एक व्होट की किमत’ ज्यांना चांगलीच समजली असणार असे ३ नेते भारताच्या राजकीय इतिहासात सापडतात.

पहिले आणि सगळ्यात फेमस म्हणजे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. वाजपेयींच्या १ मताने पडलेल्या सरकारचा किस्सा तर आपल्या सगळ्यांनाच माहितेय. पण अजून २ माणसं अशी आहेत की ज्यांना केवळ १ मतामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता

राजस्थानचे काँग्रेसचे नेते सी.पी. जोशी आणि जनता दल सेक्युलरचे ए.आर. कृष्णमूर्ती ही ती २ माणसं होतं, ज्यांना फक्त एका मतामुळे पराभवाचा सामना करावा लागला होता.

विशेष म्हणजे जोशींच्या पत्नी आणि कृष्णमूर्ती यांचा ड्रायव्हर या हक्काच्या मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं नव्हतं आणि त्यामुळेच त्यांना निवडणुकीत पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं.

शिवाय सी.पी. जोशी हे तर काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते आणि काँग्रेसने विधानसभा निवडणुका जिंकल्या देखील होत्या पण सी.पी. जोशी पराभूत झाल्याने त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं होतं.

हे ही वाचा – 

पहिला किस्सा २००८ सालचा. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांमधला.

सी.पी. जोशी हे राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते. विरोधात होते भाजपचे कल्याण सिंह चौहान.

सी.पी. जोशी हे संभाव्य विजेते मानले जात होते. यामागे २ कारणं होती. एकतर या भागावर त्यांचा जबरदस्त होल्ड होता. १९८० ते १९९० अशी १० वर्षे त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

cp joshi
सी.पी. जोशी

नव्वदच्या दशकातील पुढच्या २ निवडणुकांमध्ये शिवदनसिंग चौहान यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर १९९८ साली परत त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. १९९८ ते २००८ अशी १० वर्षे त्यांनी परत एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

दुसरं आणि अतिशय महत्वाचं कारण म्हणजे निवडणुकीत जर काँग्रेसचा विजय झाला तर ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. आपला नेता मुख्यमंत्री होतोय, या जनभावनेचा फायदा देखील त्यांना मिळत होता.

प्रचाराची रणधुमाळी पार पडली. निवडणुकांचा निकाल लागला. त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. पण नाथद्वाराचा जो निकाल आला त्याने जोशींना धक्काच बसला. अतिशय काट्याच्या लढतीत भाजपच्या कल्याण सिंह चौहान यांच्याकडून सी.पी. जोशी यांचा अवघ्या १ मताने पराभव झाला होता.

या अनपेक्षित निकालाने एकच गोंधळ उडाला. जोशी यांच्याकडून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने २ वेळा फेरमतमोजणी केली. पण दोन्हीही वेळा निकाल कायम राहिला.

पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं. तिथे एक वेगळंच नाट्य घडून आलं. कल्याण सिंह चौहान यांच्या पत्नीने आपल्या पतीसाठी दोन वेळा मतदान केलं असल्याचं सिद्ध झालं. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी कल्याणसिंग यांची आमदारकी रद्द केली.

निवडणुकीच्या दिवशी ‘इलेक्शन बूथ’ हेच ‘मंदिर’असतं !

त्यानंतर काही दिवसांनी एक बाब अशी समोर आली की या निवडणुकीत सी.पी. जोशी यांच्या बायको आणि ड्रायव्हरने मतदानच केलं नव्हतं. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त वाय.एस. कुरेशी यांनी याबाबतीत जोशींना फोन करून या गोष्टीची शहानिशा केली होती.

कुरेशी यांना खुद्ध सी.पी. जोशी यांचीच ही गोष्ट खरी असल्याची कबुली दिली होती. “निवडणुकीच्या दिवशी आपल्या पत्नी मुलीसह मंदिरात गेल्याने त्यांनी मतदान केलं नव्हतं” असं सी.पी. जोशींनी कुरेशी यांना सांगितलं होतं.

बंगळूरु येथे मतदारांच्या जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना माजी मुख्य निवडणूक आयुक्त वाय.एस. कुरेशी यांनी हा किस्सा सांगितला होता. यावरून आपण एक महत्वपूर्ण गोष्ट शिकली पाहिजे की “निवडणुकीच्या दिवशी ‘इलेक्शन बूथ’ हेच ‘मंदिर’असतं” अशी कोपरखळी देखील कुरेशींनी काढली होती.

मात्र एका उमेदवाराच्या बायकोने मतदान केलं नाही आणि दुसऱ्या उमेदवाराच्या बायकोने दोन वेळा मतदान केलं, असा हा एका मताचा खेळ संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरला.

हे ही वाचा –

१ मताने विधानसभा निवडणुकीत पराभूत होणारे देशातील पहिले नेते –

दुसरा किस्सा आहे २००४ सालच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमधला.

a r krishnmurti
ए.आर. कृष्णमूर्ती

कर्नाटकातील संथेमराहल्ली विधानसभा मतदारसंघ. जनता दल सेक्युलरचे ए.आर. कृष्णमूर्ती आणि काँग्रेसचे आर. ध्रुवनारायण यांच्यादरम्यान थेट लढत होती. या निवडणुकीचा ज्यावेळी निकाल हाती आला त्यावेळी ए.आर. कृष्णमूर्ती हे केवळ १ मताने पराभूत झाले होते.

२००४ साली १ मताने विधानसभा निवडणुकीत पराभूत होणारे ते देशातील पहिलेच नेते ठरले होते.

विशेष म्हणजे त्यांनी मतदान करायला निघालेल्या आपल्या ड्रायव्हरला त्यापासून थांबवलं होतं. या निकालाविषयी बोलताना कृष्णमूर्ती म्हणतात की, “ तो आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता. माझ्या कट्टर राजकीय विरोधकासाठी देखील मी कधी असा पराभव चिंतणार नाही”

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.