येडीयुरप्पांना “आस्मान” दाखवणारा काँग्रेसचा हा बाहुबली नेमका आहे तरी कोण…?

 

गेल्या ४ दिवसांपासून कर्नाटक आणि एकूणच राष्ट्रीय राजकारणात सुरु असलेले राजकीय नाट्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. पैसा आणि सत्ता यांच्या मग्रुरीच्या जीवावर लोकशाही व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा सत्ताधारी भाजपचा खेळ सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे यशस्वी होऊ शकला नाही. हे तर झालं व्यवस्थेच्या पातळीवर पण या कर‘नाटकात’ ग्राउंड लेव्हलवर भाजपचे अध्यक्ष आणि या खेळाचे मास्टरमाइंड असणाऱ्या अमित शहा आणि येडीयुरप्पा यांना कटशह देण्यामागे डी.के. शिवकुमार या काँग्रेस नेत्याचा मोठा हात असल्याची माहिती समोर येतेय.

कोण आहेत डी.के. शिवकुमार…?

डी.के. शिवकुमार ही काँग्रेसमधील मोठी धनाड्य आसामी आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी जनता दलाच्या पी.जी.आर. सिंधिया यांचा ३० हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्याकडील संपत्तीचा आकडा जाहीर करताना २५१  कोटी संपत्तीचे मालक असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच ते चर्चेत आले होते. कारण २००८ सालच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपली संपत्ती ७५ कोटी रुपये इतकी जाहीर केली होती आणि पुढच्या ५ वर्षांच्या काळात त्यात १७६ कोटींनी वाढ झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर स्थापण्यात आलेल्या सिद्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी उर्जामंत्री म्हणून काम पाहिलंय. यावर्षीची कर्नाटक विधानसभा निवडणूक देखील त्यांनी कनकपुरा मतदारसंघातूनच लढवली व जनता दलाच्याच नारायण गोवडा यांचा ३१ हजार ४२४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली संपत्ती ८०० कोटी असल्याचं सांगितलं होतं. २०१३ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत साधारणतः तिप्पट वाढ झाली होती.

शिवकुमार यांची कर्नाटकच्या राजकारणात ‘राजकीय शार्प शुटर’ अशी ओळख आहे. त्यामुळेच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवरील गोष्टी सर्वाधिक आक्रमकपणे हलवण्याची जबाबदारी डी.के. शिवकुमार यांच्यावरच सोपविण्यात आली होती. या ४  दिवसांच्या काळात पक्षाला फुटीपासून वाचविण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना बंगळूरु परिसरातील ‘बिदादी’ येथील ज्या ‘इगलटन गोल्फ रिसॉर्ट’मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं होतं, तो रिसॉर्ट डी.के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या मालकीचा आहे. विरोधी पक्षांनी काँग्रेसचे आमदार फोडण्याची कसलीही संधी मिळणार नाही, याची व्यवस्थित काळजी त्यांनी या ४ दिवसांत घेतली. एवढंच काय तर ज्यावेळी रिसॉर्ट भोवती असणारी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली त्यावेळी त्यांनी आमदारांना बंगळूरूच्या बाहेर हलवलं आणि कुठलाही आमदार विरोधकांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घेतली. शिवाय अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेसच्या समर्थनात उभं करण्यात देखील त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.

eagle
‘इगलटन गोल्फ रिसॉर्ट’

यापूर्वी २०१७ मध्ये जेव्हा राज्यसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा अहमद पटेल यांची जागा वाचवणं काँग्रेससाठी प्रतिष्ठेचं झालं होतं. तेव्हा देखील गुजरातमधील आपल्या ४४ आमदारांना काँग्रेसने डी.के. शिवकुमार यांच्या छत्रछायेखाली ‘इगलटन गोल्फ रिसॉर्ट’मध्येच ठेवलं होतं. त्यावेळी २ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या ३ दिवसांच्या कालावधीत आयकर विभागाने ‘इगलटन गोल्फ रिसॉर्ट’सह शिवकुमार यांच्या मालकीच्या देशभरातील ६७ ठिकाणांवर छापा टाकला होता. आयकर विभागाच्या ३०० अधिकाऱ्यांच्या टीमने ही कारवाई पूर्ण पाडली होती. ‘इगलटन रिसॉर्ट’वरील छाप्यात जरी आयकर विभागाला काही मिळालं नसलं शिवकुमार यांच्या दिल्ली येथील घरातून ८ कोटी आणि इतर ठिकाणच्या कार्यालयातून २ कोटींची रोख रक्कम आयकर विभागाने हस्तगत केली होती. २०१५ साली कनकपुरा आणि रामनगरम परिसरातील खाणींमध्ये अवैधपणे उत्खनन केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना त्यांना नोटीस देखील पाठवली होती.

1 Comment
  1. Pramod shinde says

    खुप महत्वपूर्ण माहिती मिळते आपल्या पेज वर शतशः धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.