पोराच्या “स्वरराज” नावाचं फक्त “राज” झालेलं पाहून वडील म्हणाले, गेले स्वर उडूनी…!!!

श्रीकांत ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे लहान बंधू.

दोघांच्या व्यक्तिमत्वात जमीन अस्मानाचा फरक होता. प्रबोधनकारांच्या सहवासात तयार झालेल्या या मुलामध्ये एकजण म्हणजे धडाडणारी तोफ होता तर दुसरा म्हणजे एक श्रवणीय गजल होता..

प्रबोधनकारांचे चिरंजीव, बाळासाहेबांचे बंधु, राज ठाकरेंचे वडील याहून त्यांची इतिहासात वेगळी ओळख आहे अन् ती म्हणजे,

संगीतकार श्रीकांत ठाकरे..

श्रीकांत ठाकरेंच्या लहानपणीचा एक किस्सा खुद्द त्यांनीच लिहून ठेवला आहे. झालेलं अस की, श्रीकांत ठाकरेंना लहानपणी फिट्स यायच्या. प्रबोधनकारांनी यावर अनेक उपाय केले. एकदिवशी काय झालं कोणास ठावूक पण प्रबोधनकारांना या फिट्स वर संगीत उपायकारक ठरू शकेल अस वाटलं.

त्यांनी एका व्हायोलिन वादकाला बोलावून घेतलं आणि शास्रोक्त संगीताचे सूर छेडायला सांगितलं. शास्त्रीय संगीताचे स्वर ऐकून एक वर्षांचे श्रीकांत ठाकरे उठून उभा राहिले. त्यावेळेपासून संगीत हा त्यांच्या फिट्सवरचा उपाय झाला आणि पुढील आयुष्यात संगीतकार हीच त्यांची ओळख झाली.

त्यांनी मराठी चित्रपटांना संगीत द्यायला सुरू केलं. मोहम्मद रफी यांच्या आवाजाला मराठीत आणणे आणि त्याला योग्य न्याय देणे फक्त श्रीकांत ठाकरे यांना जमलं होत.

हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा हे रोमँटिक गीत असो किंवा शोधिसी मानवा राऊळी मंदिरी हे भक्ती असो किंवा हा छंद जीवाला लावी पिसे हे उडत्या चालीतले गाणे असो रफी आणि श्रीकांतजी यांच्या जोडीने रसिकांना वेड लावणारी गाणी दिली.

श्रीकांत ठाकरे हे स्वतः उर्दू शिकलेले होते.

मराठीत चित्रपट संगीतात गझल हा प्रकार पहिल्यांदा त्यांनीच हाताळला. त्यांच्या चालता बोलता चोविस तास डोक्यात संगीत असायचं. या संगीतप्रेमातून त्यांनी आपल्या पत्नीचं, मुलाचं नाव संगीता संबधितच ठेवली.. 

याच प्रेमातून त्यांनी आपल्या पत्नीचं नाव मधुवंती. खुद्द प्रबोधनकारांनीच त्यांना संगीताच्या रागावरून पत्नीचं नाव मधुवंती ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी आपल्या मुलीचं नाव जयजयवंती ठेवलं आणि

मुलाचं नाव ठेवलं

“स्वरराज”

या आपल्या मुलाला श्रीकांत ठाकरे यांनी लहानपणापासून व्हायोलिन, तबला, गिटार शिकवायला सुरवात केली. पण या मुलाला संगीतापेक्षा व्यंगचित्रात जास्त रस होता.

आपले काका व्यंगचित्र काढत असताना तो तासनतास तिथे जाऊन बसायचा.

बाळासाहेबांनी आपल्या पुतण्याच्या हातात कुंचला दिला आणि त्याची फटकार कशी काढायची हे शिकवलं.

याच काळात शिवसेना पक्ष उभा राहत होता. मुंबईतल्या सगळ्या राजकीय घडामोडी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे या नावाभोवती फिरत होत्या. बाळासाहेबांचा बुलंद आवाज ऐकण्यासाठी लाखो लोक गोळा होत होते.

तेव्हा सुरू असलेल्या अनेक सभांना बाळासाहेब आपल्या या लाडक्या पुतण्याला सोबत नेत होते.

बाळासाहेबांनी अख्ख्या मुंबईला भारावून टाकलेलं. यात त्यांचा पुतण्या देखील होता. तो त्यांची चालतीबोलती लहान आवृत्ती होता.

काकांच्या प्रमाणे व्यंगचित्रकार होण्यासाठी जेजे स्कुल ऑफ आर्ट या नामांकित कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवलं. काही ठिकाणी वर्तमानपत्रात त्याला काम मिळालं होतं.

सुरवातीचे काही महिने स्वरराज या नावानेच त्यांनी व्यंगचित्रे काढली. एकदा बाळासाहेब त्याला म्हणाले,

“अरे मी जेव्हा व्यंगचित्र काढायचो तेव्हा बाळ ठाकरे या नावाने काढायचो. तू सुद्धा स्वरराज याच्या ऐवजी छोटं सुटसुटीत नाव घे.”

त्या दिवशी बाळासाहेबांनी आपल्या पुतण्याचं नवं बारसं केलं,

राज ठाकरे.

राज ठाकरे गंमतीत म्हणतात की,

“वडील संगीत क्षेत्रात असल्यामुळे आपला मुलगाही पुढे त्याच क्षेत्रात जाईल म्हणून त्यांनी पाळण्यात माझं नामकरण केलं. मात्र नंतर मला वेगळेच राग येऊ लागले आणि त्या रागाचं परिवर्तन वेगळ्याच गोष्टीत झालं”

तर या आठवणीबद्दल श्रीकांत ठाकरेंनी लिहून ठेवलय.. ते म्हणतात, 

“स्वरराज चं फक्त राज झालेलं पाहून मी म्हणालो, स्वर आले जुळूणी तसं स्वर गेले ऊडूनी..ठीक आहे. वडिलांनी नाही काकांनी बदल केला कारण तो माझा भाऊ होता. मतात कधी परिवर्तन झालं नाही आणि होणार नाही पण मनाला एक समाधान वाटतं की स्वरांचा तो पक्का आहे कारण फिल्मी गायकांच गाणं ऐकून तो म्हणाला,

पप्पा हा मोठा गायक इथे बेसूर झाला..हे पाहिल्यानंतर याच्यात सुरांचा भरणा व्यवस्थित रक्तातून मी दिला याचे समाधान वाटते”

आज राज ठाकरेंनी भोंग्याचा विषय घेतला आहे. कितीही झालं तरी भोंगा हा स्वरांचाच विषय. एक वेगळा स्वर आणि वेगळा राग आज त्यांनी छेडलाय, या निमित्ताने सांगितलेला स्वरराज चं राज होण्याचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करुन नक्की सांगा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.