तो शत्रुघ्न सिन्हाचा डमी होता हे दोन वर्षांपूर्वी उघडकीस आलं

शत्रुघ्न सिन्हा म्हणजे स्टाइलबाज अभिनय, दमदार डायलाॅगचा बादशहा, मर्दरांगडा गडी. त्यामुळेच की काय, त्याच्यासारख्याच दमदार धर्मेंद्रप्रमाणे नृत्याशी त्याचा काहीच संबंध आलेला नाही. धर्मेंद्रचा नाच विनोदी म्हणून तरी बघवतो, शत्रू केविलवाणा दिसतो.

तरीही एका गाण्यात अमिताभ आणि ऋषी कपूर असे नृत्यकुशल को-स्टार असताना शत्रूच सगळ्यात भाव खाऊन गेला होता, असं सांगितलं तर धक्का बसेल ना!

कोणतं होतं ते गाणं?

मनमोहन देसाईंच्या ‘नसीब’ या मल्टिस्टारर ब्लाॅकबस्टर सिनेमाच्या क्लायमॅक्सला खास मनमोहन देसाई पद्धतीने सगळ्या नायक नायिकांवर चित्रित केलेलं एक गाणं होतं,

‘रंग जमाके जायेंगे, चक्कर चलाके जायेंगे.’

त्यात नायकनायिकांच्या तिन्ही जोड्या म्हणजे अमिताभ बच्चन-हेमामालिनी, ऋषी कपूर-किम आणि शत्रुघ्न सिन्हा-रीना राॅय. ‘अमर-अकबर-अँथनी’ मध्ये जसे तिन्ही नायक क्लायमॅक्सला टायटल साँग गातात, तीच ही आयडिया.

या गाण्यातल्या माफक वेषांतरातून खलनायक मंडळींना हे तिघे नायकच आहेत हे लक्षात कसं येत नाही, असे प्रश्न मनमोहन देसाईंच्या सिनेमांमध्ये विचारायचे नसतात, त्यांच्या प्रेक्षकांना ते पडतही नसायचे.

कमलजी या प्रसिद्ध डान्स मास्टरने नृत्यदिग्दर्शन केलेल्या या गाण्यात अमिताभ स्पॅनिश मेटॅडोर म्हणजे बुलफायटिंग करणारा वीर बनला होता, ऋषी होता चार्ली चॅप्लीन आणि शत्रुघ्न सिन्हा चक्क कोसॅक डान्सर बनला होता.

रशियन लष्कराच्या युक्रेनियन तुकड्यांमधून जगभरात लोकप्रिय झालेला कोसॅक डान्स म्हणजे गुडघ्यांवर बसून, उड्या मारून केलं जाणारं जानदार, जोशपूर्ण नृत्य.

अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्यासारखे नृत्यकुशल स्टार गाण्यात असताना मनमोहन देसाईंनी शत्रुघ्न सिन्हाला कोसॅक नर्तकाचा वेष द्यावा, हे त्यांच्या चक्रमपणाला साजेसं होतं आणि शत्रूनेही हा वेष मान्य करावा हे त्याच्या चक्रमपणाला साजेसं होतं.

मात्र, आज ते गाणं पाहिलंत तर त्यात शत्रू जोरदार नाचलेला दिसतो आणि तोच त्या नृत्याबद्दल भाव खाऊनही गेलाय.

हा चमत्कार कसा झाला, याचा उलगडा ऋषी कपूरने दोन वर्षांपूर्वी केला होता.

‘नसीब’च्या सेटवर अमिताभ आणि ऋषी कपूर दोघेही आपल्या नृत्याच्या स्टेप्सवर प्रचंड मेहनत घ्यायचे. शत्रू हा नृत्याचा शत्रू. त्याला तालात दोन पावलं उचलून टाकणं अशक्य. त्याने अधिक मेहनत घेणं अपेक्षित होतं. पण तो मस्त आरामात बसून राहायचा. टंगळमंगळ करायचा. कॅमेरा सुरू झाला की आपण आपल्या शैलीत धकवून नेऊ, असा त्याला भरवसा असावा.

पण, या गाण्यात तसं करणं शक्य नव्हतं, कोसॅक डान्सरचा वेष आहे तर त्याच्याप्रमाणे नाचण्याचा किमान प्रयत्न तरी करणं आवश्यक होतं. ते शत्रूने केलंच नाही. गाण्याचं चित्रीकरण सुरू झालं तेव्हा शत्रूचं नृत्यकौशल्य, किंवा खरंतर त्याचा अभाव उघडा पडू लागला. टेक्स ओके होईनात. फिल्म वाया जायला लागली.

मनमोहन देसाईंनी थोडा वेळ हा खेळ पाहिला आणि एका असिस्टंटला बोलावून सांगितलं की ज्युनियर आर्टिस्टांच्या सप्लायरला सांगून चांगला उंचनिंच गडी शोधून आणा आणि त्याला याच्यासारखे कपडे घाला, दाढी लावा.

ज्यात तिन्ही नायक एकत्र आहेत आणि पडद्यावर स्पष्ट दिसतायत, असे भाग शत्रूभाऊंच्या अफाट नृत्यकौशल्याला झाकतपाकत उरकून घेण्यात आले आणि लाँग शाॅट्ससाठी चक्क शत्रूचा ‘डबल’ वापरला गेला.

तोवर सगळ्यांना स्टंट डबल माहिती होता, तो नायकाच्या ऐवजी स्टंट्स करतो. शत्रुघ्न सिन्हामुळे त्या दिवशी ‘डान्स डबल’ असा नवा प्रकार जन्माला आला असणार.

सगळ्यात गंमत म्हणजे, हे सगळं चित्रिकरण सुरू असताना, शत्रू सेटवरच कॅमेऱ्याच्या मागे बसलेला असायचा आणि अमिताभ, ऋषी, त्याचा स्वत:चा ‘डान्स डबल’ यांना ‘शाबाश, करो डान्स, ऐसा करो, बहुत अच्छे, जी लगाके नाचना, शाबाश रे मेरे शेरों’ अशा प्रकारे त्याच्या खास स्टायलीत आरडतओरडत प्रोत्साहन देत होता आणि अमिताभ-ऋषी यांच्या मेहनतीवर मीठ चोळत होता. सगळं गाणं हे अशा प्रकारे चित्रित झालं.

सिनेमा रिलीज झाला तेव्हा या गाण्यात अमिताभकडून जी अपेक्षा होती ती त्याने पूर्ण केली होती, ऋषी नृत्यात सर्वात उजवा, त्याने चार्लीचं सोंग झक्क वठवलं होतं.

पण नृत्यगीतामध्ये शत्रू काय करणार, तो तर उघडा पडणार, खासकरून अमिताभसमोर झाकोळला जाणार, या भावनेने अमिताभचे फॅन चेकाळले होते आणि शत्रूचे फॅन नाउमेद झाले होते.

प्रत्यक्षात गाण्यात ‘शत्रू’ने रीना राॅयच्या बरोबरीने केलेलं जोरकस नृत्य पाहिल्यावर अमिताभचे फॅन चाट पडले आणि शत्रूच्या फॅन्सनी जल्लोष केला.

जो माणूस संपूर्ण गाण्याच्या शूटिंगमध्ये अजिबात मेहनत न घेता, नवाबी थाटात बसून होता, ज्याने तो नाच केलाच नाही, तो आपल्यापेक्षा भारी नाचला अशी प्रेक्षकांची समजूत झाली आणि तोच भाव खाऊन गेला, हे पाहिल्यावर या दोघांचा जीव किती जळला असेल !

आत्ता हे गाणं पहा आणि शोधून दाखवा की शत्रू दिसतोय की डबल दिसतोय.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.