आमच्या इथे विमान भाड्याने मिळेल, या मराठी माणसाचा नाद करायचा नाय…

आमच्याकडं फोर व्हिलर भाड्यानं मिळेलं. असा आता कोणत्याही गावात, गल्लीत गेलं की बोर्ड पाहायला मिळतो. मग तयारी चालू. किती सिटर, तेल टाकून न्यायची की सगळं भाडं देवून न्यायची, हॉल्ट किती घेणार, टोल कोणाकडं. लाख गोष्टी.

पण एक असा भिडू आहे जो चक्क हेलिकॉप्टर आणि विमान भाड्यानं देतो.

ते ही फिरायला, वेळेच गणित गाठणाऱ्या राजकराणी उद्योगपतींना, लग्नात मिरवण्याच्या हौसेला आणि एअर ॲम्बुलन्स म्हणूनही. यातील कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची आहे? तर तुम्ही त्याला नुसता दोन तास आधी फोन लावायचा. विमान उभं असतं. पायलट आत असतो. व्हिजीबलीटी नीट असेलं तर पैसे भरायचे न् भाडं संपेपर्यंत विमान आपलं.

नाशिकच्या मंदार भारदे यांनी 2009 मध्ये ‘मॅब एव्हिएशन’ कंपनीची सुरुवात केली न् त्या माध्यमातुन त्यांनी हेलिकॉप्टर न् विमान भाड्यानं द्यायचा व्यवसाय चालू केला. नाशिकमध्येच बी.कॉम आणि एम.ए. पुर्ण केलं. शिक्षण पुर्ण झाल्यावर ‘मॅब एव्हिएशन’च्या स्थापनेपर्यंत बरेच उद्योग करुन झाले.

कंटेनरमधून कांदा विकला. इंटरनेटवरुन ऑर्डर घेवून मुंबईतील घरोघरी भाजी विकायला सुरुवात केली. बंदिस्त शेळी पालनाचा कोर्स केला. काही काळ पत्रकारिता देखील केली. पण यातील प्रत्येक गोष्टीचा त्यांनी पुर्णपणे आनंद घेतला.

‘बदल ही काळाची गरज’ मानुन ते बदल करत गेले. मात्र करिअर बदलताना त्यांनी कधीच ‘लोक काय म्हणतील’ असला दळभद्री विचार केला नाही.

एक ना धड् भाराभर चिंध्यामधून विणली भरजरी पैठणी

आपला बेसिक करिअर चॉईस काय असावा या बद्दल फार आधीपासून म्हणजे आपण पाचवी-सहावीत जायला लागल्यापासूनच आपल्या पालकांची दबक्या आवाजात चर्चा चालू होते. आठवी-नववीत जाईपर्यंत दोन-तीन वर्ष ते आपल्या मनावर बिंबल जातं. न् दहावी पासून आपला त्याच दिशेनं प्रवास चालू होतो. हे सर्वसाधारण घरात दिसणार चित्र. फार कमी मुलं अशी असतात की जे ठामपणे आपल्या पालकांना सांगतात की मी अमूक’ गोष्टीमध्ये करिअर करणार आहे.

याहून देखील फारच कमी मुलं अशी असतात की जे शाळा-कॉलेजच्या आयुष्याचा मस्त आनंद घेतात.

त्या वयात ‘करिअर’ या गोष्टीच जास्त टेन्शन घेत नाहीत. पण त्यांना आपली आवड लक्षात आलेली असते आणि ते त्या दिशेनं हळू हळू पावलं टाकत असतात. मंदार याच शाळा-कॉलेजच्या आयुष्याचा आनंद घेणाऱ्या मुलांपैकी एक. नेतागिरी करण्यासहित लाठ्या-काठ्या खाण्यापासून ते पोलिसांनी उचलून नेण्यापर्यंत सगळे कारनामे त्यांनी कॉलेजमध्ये केले.

पण हळू हळू डॉक्युमेंट्रीची आवड लागली. त्यातुन फिरणं, प्रवास करणं आवडू लागलं. माणसं वाचायची सवयं लागली.

डॉक्युमेंट्री बनवताना त्याला एकदा वारीची डॉक्युमेंट्री करायची होती. त्यातील काही विहंगम दृश्य त्याला ‘बर्ड आय व्ह्यु’ या अँगलने दाखवायचे होते. त्यांनी त्यासाठी हेलिकॉप्टरच्या शोधात त्याने अनेकांचे उंबरठे झिजवले. पण अखेरपर्यंत त्याला यासाठी यश मिळाले नाही.

ही गोष्ट त्याच्या मनात कायमची राहिली.

मुंबईत आल्यावर ही अनेकदा विमानतळाच्या भिंतीपलीकडील आवाज त्याला अनेकदा तिकडे खेचत होता. सात-आठ वेळा आत घुसण्याचाही प्रयत्न केला. पण आत गेल्यावर जायचं कोणाकडे, कोणाला भेटायचे, याबद्दल काहीच सांगता न आल्यानं सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकले. पण त्यांनी हार मानली नाही.

मंदार यांचे आजोबा बाळासाहेब भारदे जवळपास दोन दशक आमदार. त्यातील पाच वर्ष यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळात राज्याचे सहकारमंत्री आणि एकदा विधानसभेचे अध्यक्ष. त्यामुळे त्यांनी मनात आणलं असतं तर राजकीय ओळख वापरुन या दोन्ही गोष्टींसाठी सहज शक्य होत्या.

पण त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचे स्वप्न पहायचे होते. शेवटी एकदा कुणा मंत्र्याच्या ताफ्यातील एका गाडीत घुसून त्यांनी हेलिकॉप्टरपर्यंत प्रवेश केलाच आणि त्याच क्षणी त्यांचा निश्चय झाला.

आपल्या व्यवसायाची दिशा हीच. न् ‘मॅब एव्हिएशन’ नावाची कंपनी स्थापन केली. विमाने, हेलिकॉप्टरच्या व्यवसायाबरोबरच तांत्रिक बाजूही समजावून घेण्यासाठी अक्षरश: अहोरात्र अभ्यास केला.

राजकारणी/सेलिब्रेटी ग्राहक 

मॅब एव्हिएशनच्या सुरुवातीपासुनच छोट्यातील छोट्या आणि मोठ्यातील मोठ्या राजकारण्यांपर्यंत ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नेते, सेलिब्रेटी, अतिमहत्वाच्या व्यक्ती, बडे उद्योजक हे मंदार यांचे ग्राहक आहेत.

निवडणूकीच्या काळात प्रचारासाठी, राजकीय दौऱ्यांसाठी अनेक राजकीय नेत्यांची आणि पक्षांची ‘मॅब’च्या ताफ्यातील हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांना मागणी असते. तसेच शुटींगसाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी, फिल्मस्टार, उद्योजक यांची हेलिकॉप्टरला पसंती आहे.

हौशी नवरा/नवरींसाठी लगीन घरातुन मागणी 

आपल्या भारतात लग्नामधील होणारी हौस आणि नव-नवीन कल्पनांची अजिबात कमतरता नाही. त्यापैकीच एक कल्पना म्हणजे नवरा/नवरीची हेलिकॉप्टरमधून होणारी एन्ट्री. यासाठी ही अनेक लगीनघरातुन मंदार यांच्या हेलिकॉप्टरला मागणी असते.

हवाई पर्यटनाच नवं क्षेत्र खुलं 

हवाई पर्यटन हे भारतात नव्याने झेप घेत असलेले क्षेत्र. अकाशातुन पक्षाच्या नजरेतुन आपलं शहर, आपल्याला आवडणार पर्यटनस्थळ पाहणं किंवा नवीन ठिकाण शोधणं यासाठी पर्यटक हेलिकॉप्टरच्या माध्यमातुन आपली हौस पुर्ण करतात. उंच ठिकाणी जाण्यासाठी वृद्धांची देखील हेलिकॉप्टरला मागणी असते.

‘एक्स्प्लोर मराठा’ असा रूट

हेलिकॉप्टरमधून सह्याद्री पर्वतरांग खूप वेगळी आणि भव्य दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आकाशातून पाहून राजांची व्हिजन समजते. कोणताही परदेशी पर्यटक जेव्हा भारतात येतो तेव्हा विमानातच त्याच्या कानावर पहिल्यांदा ‘वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असाच आवाज पडतो. आणि मग सुरु होते शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता.

त्यामुळे आपल्याकडील गडकिल्ल्यांची संपदा परदेशी नागरिकांना दाखवण्यासाठी ‘एक्स्प्लोर मराठा’ असा रूट तयार केला आहे. ते परदेशी नागरिकांना हेलिकॉप्टरमधून गडकिल्ले दाखवतात.

वैद्यकीय मदतीसाठी केंद्र सरकारशी पहिला करार 

अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत चार तासांच्या आत ते गरजू रुग्णापर्यंत पोहचणे आवश्यकच असते. पण अनेकदा डोनरचे अवयव आणि गरजू रुग्ण यांच्यातील भौगोलिक अंतरामुळे अवयव प्रत्यारोपण शक्य होत नाही. केवळ अंतराच्या अडथळ्यामुळे अवयव उपलब्ध असूनही ते रुग्णास मिळू शकत नाहीत.

या तळमळीतून ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’चा देशातील पहिला प्रकल्प मंदार यांनी साकारला आणि केंद्र सरकारशी त्यासंबंधातील पहिला करार करून ‘तातडीच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी कमीत कमी वेळात अवयव वाहून नेण्याकरिता परवडणाऱ्या दरात विमानसेवा’ उपलब्ध करुन दिली आहे.

नव्या स्वप्नांच्या दिशेने जात सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न 

विमानाचा उपयोग याआधी बॉम्ब टाकण्यासाठी केला गेला असेलही, पण जंगल वाढवण्यासाठीही विमानाचा वापर करता येतो, हा विचार मंदार यांनी आपल्या आणि सहकाऱ्यांच्या मनात रुजवला आणि सुरु झाली नवी स्वप्न. हवेतून उडणाऱ्या पक्ष्यांच्या विष्ठेतील बिया एखाद्या माळरानावर पडतात, पाऊस पडला की त्यांना नवे अंकुर फुटतात. पुढे त्याचे वृक्ष होतात आणि जंगल वाढत जातात.

यातुनच ‘क्लाऊड सीडिंग’ ची कल्पना त्यांनी मांडली आणि त्यावर काम देखील सुरु केलं आहे. प्रकल्प जवळपास अंतिम टप्प्यात आहे.

आपल्याकडे अनेकदा कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले. पण नियोजनाचा आभाव आणि नैसर्गिक स्थितीचा नेमका अभ्यास नसल्याने ते निरुपयोगी ठरतात. आखाती देशांमध्ये मात्र नियमितपणे कृत्रिम पाऊस पाडला जातो, हे त्यांनी त्या देशांतील वास्तव्यात अनुभवलं आहे.

त्यामुळे यासाठीही तज्ञांची मदत घेवून आपल्या ताफ्यातील विमानांचा त्यासाठी कसा उपयोग केला जावू शकतो यासाठी ही अभ्यास सुरु केला आहे.

मुंबईसारख्या महानगरांत साथीच्या आजारांचा कोणत्या ना कोणत्या कोपऱ्याला सदैव वेढा असतो. त्यामुळे विमानातून प्रतिबंधात्मक औषधांचा फवारणी करण्याची परवानगी मिळाली, तर त्यासाठी शास्त्रशुद्ध रीतीनं पुढाकार घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तो प्रयोग जमला, तर हवाई सेवा ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांशी नाते जोडणारी सेवा ठरेल, असे देखील मंदार सांगतात.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.