भारतात सुरू झालेल्या पहिल्या वर्तमानपत्राला देखील सरकारविरोधी लिहिले म्हणून फटका बसला होता.

आज न्यूज चॅनेलच्या अँकरांचा धुरळा आणि पेपरांच्या बाजाराचा शिमगा यांच्या मध्ये अडकलेल्या माध्यमांना या टप्प्यावर पोचण्यासाठी भूतकाळात कितीतरी मोठमोठ्या लढाया लढाव्या लागल्या आहेत. आज एखादा अँकर इतक्या सहज आपल्या स्टुडिओत ओरडू शकतो किंवा एका पत्रकार वार्ताहर कोणत्याही कॅरिकेचर खाली कोणतीही स्टोरी लावू शकतो इतकं स्वातंत्र्य पत्रकारांना यायला भारतातल्या पत्रकारांनी रक्ताचे पाणी केलंय.

आणि याचा इतिहास अगदी शेवटपर्यंत म्हणजे भारतात पहिले वृत्तपत्र सुरू होण्याच्या ब्रिटिशांच्या काळापर्यंत जातो.

23 मार्च 1782 साली भारतातील एका वृत्तपत्र मालकाला अटक झाली होती आणि त्याचा पेपर कायमचा बंद करून टाकला होता. या मालकाचा गुन्हा होता की तो नव्या गव्हर्नर जनरल वॉरन हॅस्टिंग ला लॉर्ड लाईव्हचा लकूळा वारसदार म्हणला होता.

जेम्स ऑगस्ट्स हिकी ह्या भिडूला या गुन्ह्यासाठी थेट जेलमध्ये पाठवण्यात आले त्याच्या प्रिंटिंग प्रेसचे सगळे साचे काढून घेण्यात आले, त्याचा पेपर बंद करण्यात आला आणि त्याच्या प्रिंटिंग प्रेसच्या सामानाची जप्ती करण्यात आली.

हा होता भारताचा पहिला छापील पेपर- त्याचं नाव होतं बेंगाल गॅझेट

हीकी हा माणूस सरकारी अधिकाऱ्यांना लढण्याच्या आणि त्यांची टर उडविण्याचा उद्योगात ब्रिटीशांच्या सहनशक्तीच्या थोडा पुढे निसटला आणि कायद्याच्या तावडीत सापडताच ब्रिटिशांनी त्याचा बाजार उठवला.

तत्कालीन संदर्भांच्या अनुसार हा पेपर भारतातीलच नाही तर आशियातील पहिला छापील पेपर होता.

1780 मध्ये हिकी साहेबांनी या पेपर ची स्थापना केली आणि पुढची दोन वर्ष त्यांनी हा पेपर थोड्याफार पानांवरच कसेबसे भागवत थोड्याफार अंतराच्या फरकाने टप्प्याने छापतात सुरू ठेवला आधी हा पेपर दर आठवड्याला प्रसिद्ध होणे अपेक्षित असे मात्र ते नेहमीच शक्य झाले नाही.

साहेब दोन पानांचा हा पेपर आपल्या सर्व शक्तीनिशी स्वतः छापत असत आणि शक्य तेवढ्या स्पष्ट बातम्या देण्याकडे त्यांचा कल असे.

“सगळ्या पक्षांसाठी खुला पण कुणाच्या दबावाखाली नसणारा राजकीय आणि वाणिज्यविषयक दर आठवड्याला निघणारा पेपर”

अशी रोखठोक आणि सगळ्यात वरती ठळक लाईन लावून हा पेपर पब्लिश होत असे.

आत्ताच्या पेपर आणि चॅनेल चालवणाऱ्या लोकांचे उद्योग थोड्याफार फरकाने तेव्हाच सुरू झाले होते व या पेपरमध्ये ही त्या काळात कोलकात्यामध्ये असणाऱ्या मोठ्या लोकांच्या पर्सनल खाजगी आयुष्यातल्या काही घडामोडी कानावर पडलेल्या आणि कुणी उगाचच उठवलेल्या काही वावड्या आणि गॉसिप छापले जात असत.

त्याकाळात कोलकातामध्ये राहणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या काही ठराविक बित्तम बातम्या या पेपरात प्रकाशित होत.

आपल्या शेजारी इंग्रज माणसाच्या घरात नक्की काय शिजते आहे याचा छडा लावण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी हा पेपर आवर्जून घेत आणि नुकत्याच इंग्रजी शिकलेल्या काही ठराविक गर्भश्रीमंत भारतीय मंडळींनी त्या प्रकारात अजुनच स्वारस्य घेत पेपरचा खप दिवसेंदिवस वाढवतच नेला होता.

आमक्याच्या सभेमध्ये नक्की काय झालं आणि तमक्याने केव्हा पार्टी दिली आणि तिथे नक्की काय घडलं याच्या मागे कोणाचा हात आहे अशा कित्येक बातम्या पेपरात छापून येत.

पण जेव्हा पेपर चा मालक भारताच्या नवीन निवडून आलेल्या गव्हर्नर जनरलशी थेट नडला, तेव्हा मात्र हा सगळा खेळ बंद झाला.

हस्टिंग साहेबसुद्धा हिकी साहेबा प्रमाणेच एकट्यानेच समुद्रावरून या देशात उतरले त्यांच्या पाठीमागे कोणतेही पाठबळ नव्हते ना त्यांच्यामागे कोणी मोठी असामी उभी होती. 1750 सली भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी येथील परिस्थिती पाहिली जी मोठी स्फोटक स्थितीला जाऊन पोहोचली होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतभर आपला विस्तार हळूहळू वाढवत होती, मात्र भारताच्या निरनिराळ्या प्रांतांमध्ये कंपनीला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे देशभर संपूर्णपणे कंपनीचा एकच एक असा म्हणता येईल असा कोणताही कायदा अस्तित्वात आला नव्हता. त्यामुळे तेथील स्थानिक अधिकाऱ्यांच्या मर्जीवर कंपनीचा सगळा कारभार चालत असे.

कंपनीचे अधिकारी म्हणून हस्टींग साहेबांना अनेक घडामोडींना सामोरे जावे लागले.

बंगालच्या नवाबाबरोबर जेव्हा कंपनीची थोडीफार भांडणे व्हायला सुरुवात झाली तेव्हा ही परिस्थिती सांभाळण्यात त्यांना काहीसे अपयश आले.

एकदा तर त्या दोघांमधील वादावादी इतकी पुढे गेली की बंगालच्या नवाबाने सरळ-सरळ कंपनीची गचंडी धरली आणि साहेबांसकट कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना आपल्या सुप्रसिद्ध अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवले होते.

मात्र तेथील परिस्थिती एवढी भयानक होती की तेथे काम करण्यासाठी देखील पुरेसे लोक नव्हते आणि म्हणूनच हास्टिंग साहेब राजाच्या नकळत कोठडी मधून निसटून बाहेर सटकले. तेथून बाहेर पडताच त्यांनी मागच्या वेळी झालेली चूक परत केली नाही आणि काही दिवसांनी ते पुन्हा राजाजवळ आले मात्र यावेळी पद्धतशीर सैन्य आणि हुकुम घेऊनच. त्यांनी नवाबाला योग्य तो धडा शिकवला आणि असेच काही पराक्रम भारताच्या इतर प्रांतांमध्येही गाजवत ते हळूहळू कंपनीत आणि भारतीय प्रशासनातील एक एक पायरी चढत गेले

आणि लवकरच त्यांची नियुक्ती भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून करण्यात आली.

ह्याच काळात आपले वृत्तपत्रकार हीकी महाराज हेसुद्धा जेलमध्ये बंद होते कारण त्यांच्यावर शिपिंग बिझनेस च्या व्यवहारात अफरातफर केल्याचा आणि लोकांची कर्ज बुडववल्याचा आरोप होता. आपल्याला सोडवायला येणाऱ्या वकिलांवर त्यांचा राग इतका भयानक असे की जेव्हा ते अशाच एका कर्जाच्या मामल्यात जेलमध्ये अडकले तेव्हा त्यांच्या मदतीसाठी कोणताच वकील पुढे होईना.

तेव्हा त्यांनी कसेबसे भावनिक अपील करून आणि आपल्या वकिलाच्या काही शिव्या ऐकून कोर्टात माफी मागितली तेव्हा कोर्टाने त्यांना आपल्या कर्जमुक्त केले.

जेलमधून सुटून आल्यानंतर आता नवा कोणता उद्योग करायचा या विचारात त्यांना नवनवीन कल्पना सुचत होत्या व यातीलच एक होती स्वतःचा पेपर चालू करणे.
जेलमध्ये असतानाच त्यांनी या उद्योगाचा थोडाफार अभ्यास केला होता व इंग्लंडमध्ये काही जुळवाजुळव करून आपल्याला स्वतःची प्रेस उभारता येईल व त्यामार्फत आपला स्वतःचा पेपर सुरू करता येईल याची तजवीज करून ठेवली होती.

बंगाल गॅझेटचा वापर करून स्थानिक लोकांना चमचमीत बातम्या पुरवणे आणि त्याद्वारे आपला उदरनिर्वाह करणे हा प्रमुख उद्देश त्यांच्यासमोर होता.

या पेपर मध्ये कविता आणि साध्या इकडच्या-तिकडच्या काही जाहिराती हे सोडून मोठमोठ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आणि काही स्थानिक ब्रिटिश लोकांच्या घरांमध्ये केल्या जाणाऱ्या मेजवानी आणि पार्ट्या यांचे इतंभूत वर्णन छापून येत असे.

स्थानिक युरोपियन लोक त्याकाळी मोठ्या पार्ट्या झोडत आणि गोरी जनताही अशा पार्ट्यांना नटून-थटून जात असे तेव्हा वृत्तपत्रकार साहेबांनी आपली स्वतःची वेगळी शैली निर्माण करत या पार्ट्यांमध्ये होणाऱ्या खर्चावर आणि तेथे मिरवणाऱ्या लोकांवरती जहरी टीका करायला सुरुवात केली.

त्यामुळे त्यांच्या वाचकांकडून होतसे पार्टी देणाऱ्याच्या घरातील कोणतीही वस्तू चोरीला गेल्यास ते पार्टीत सहभागी असणाऱ्या लोकांची टोपण नावे वापरून कोणी नक्की कोणत्या वस्तूंची चोरी केली हे हे कापत असत आणि त्यासोबतच पार्टी देणाऱ्या यजमानांकडून माझी ही वस्तू परत करा असा संदेशही देत असत.

मोठमोठे अधिकारी या बालिश उद्योगाला इतके वैतागले होते की त्यांनी कंपनी सरकारकडे थोडीफार खटपट करून एक आदेश मान्य करून घेतला आणि या पेपराची मुख्य वहिनीच काढून घेतली ती होती भारतीय पोस्ट.

हा पेपर लोकांकडे पोस्टाने पोचत असे व त्यामुळे सरकारने एक आदेश काढून या पेपराच्या कोणत्याही प्रति पोस्टाने पाठवल्या जाऊ नये असा एक कायदा काढून घेतला.

मात्र त्याचाही वापर आपल्या व्यवसायासाठी खुबीने करत या जागत्या पत्रकाराने सर्व न्यायाधीश विकले गेले आहेत आणि एका प्रामाणिक पत्रकाराला नाकारत आहेत व त्यांच्यावर बंधने लावत आहेत असा आरोप केला.

नुकत्याच मराठ्यान बरोबर झालेल्या एका चकमकीत कंपनी सरकारला पराभव पत्करावा लागला होता.

या घटनेचा पुरेपूर वापर करत या साहेबांनी सरकार वरती टीकेची झोड उठवली व कंपनीच्या कारभाराला चव्हाट्यावर आणले. सरकारच्या विरुद्ध बातम्या छापायला सुरुवात करणारा भारतातील पहिला पत्रकार म्हणून या महाशयांची नोंद व्हायला हवी.

एव्हाना कंपनीने विविध कंत्राटे द्यायला सुरुवात केली होती व यातील मुलाची काही कंत्राटे हस्टिंग साहेबांच्या जवळच्या एका माणसाला मिळत होती. या प्रकारावर माहिती मिळताच पत्रकार साहेबांनी या माणसाला ‘पूल बंडी’ असे नाव देऊन टाकले ( कारण सरकार कडून निघणाऱ्या कंत्राटं मध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटे पुलाची असत) आणि आपल्या पेपर मध्ये त्याचा गवगवा केला.

नव्या गव्हर्नर जनरल साहेबांच्या हाताखाली राजकारणामध्ये घराणेशाही आणि गैरव्यवहार फोफावत आहे अशा प्रकारच्या बातम्या पेपरात छापून यायला लागल्या.

या पेपराला पहिल्यांदा दृष्ट लागली ते म्हणजे जेव्हा कंपनी सरकारने स्वतःचे वृत्तपत्र चालू करण्याचा निर्णय घेतला आणि इंडिया गॅझेट या नावाने आपले स्वतःचे अधिकृत वृत्तपत्र सुरू केले.

मात्र निष्पक्ष पत्रकार साहेबांचा भेजा तेव्हा भडकला जेव्हा भारतीय पोस्टाने या वृत्तपत्राच्या वितरणासाठी कंपनीला भरभक्कम सूट देऊ केली.

बंगाल गॅजेट वाचणारे काही लोक आता हळूहळू कंपनीच्या वृत्तपत्राकडे सरकू लागले आणि मी पण घेणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असल्याचे पाहून हिकी साहेबांचा राग अजुनच भडकला.

आपल्या भेदक शोध पत्रकारितेला अजूनच धार देत मग या साहेबांनी नवीन शोध लावला की गव्हर्नर जनरल यांच्या पत्नी च्या इंडिया गॅझेट वृत्तपत्राच्या संपादक मंडळासोबत काम करत आहेत आणि म्हणूनच सरकारकडून या पेपरला झुखते माप मिळत आहे.

बोलता बोलता ते एवढ्यावर घसरले की मागचा गव्हर्नर जनरल लॉर्ड क्लाइव्ह हा चांगला माणूस होता आणि आता आलेला गव्हर्नर जनरल मात्र फार बेजबाबदार उत्तराधिकारी आहे.

आता आपल्यासोबत नसणाऱ्या नवाबाला ही न सोडणाऱ्या गव्हर्नर जनरल साहेबांनी हे फारच मनावर घेतले आणि या पत्रकाराला त्यांनी थेट कोर्टामध्ये खेचले. मात्र इथेच खरी गोम घडली आणि गेम पलटी झाला – माझ्या विरोधातील माणूस सरकारदरबारी मोठे वजन असणारा आहे म्हणून न्याय नेहमी त्याची बाजू घेईल आणि मला गुन्हेगारच सिद्ध करेल यावर माझा विश्वास आहे, असे विधान पत्रकार साहेबांनी कोर्टात केले.

यावेळी त्यांना कोणताही वकील नव्हता आणि त्यामुळे कोर्टाने दया येऊन त्यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.

यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही पण लगेचच त्यांनी नव्या जोमाने सरकारविरुद्ध अजून प्रखर भाषेत बोलायला सुरुवात केली व ब्रिटिश लष्कराशी पंगा घेतला. लष्कराने अशा गव्हर्नर जनरल विरुद्ध उठाव केला पाहिजे, अशा अर्थाचे विधान आपल्या पेपर मध्ये केले. या विधानाला मात्र सरकारने आणि कोर्टाने ही खूपच गंभीरपणे घेतले आणि हिकी साहेबांची रवानगी यावेळी मात्र तुरुंगातच झाली.

मात्र तुरुंगात असतानाही काही जुगाड लावून त्यांनी आपल्या पेपरचे काम सुरूच ठेवले आणि ब्रिटिश सरकार मधील मोठ्या लोकांच्या विरुद्ध गरळ ओकायला सुरुवात केली. आपल्या डोक्यातील सुपीक कल्पना आणि मनात घडणाऱ्या अनेक घटना त्यांनी थेट पेपरामध्ये छापल्या आणि मोठ्या लोकांच्या नावांवर चिखलफेक करायला सुरुवात केली. याच्या मध्ये गव्हर्नर जनरल साहेबांच्या जवळचे खूप सारे अधिकारी होते. यावेळी त्यांनी भाषेची ही कोणती मर्यादा पाळली नाही आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांवरूनही बातम्या करायला सुरुवात केली.

परिणाम व्हायचा तोच झाला आणि ह्या पेपर विरुद्ध जवळपास सहा नवे खटले भरले गेले .

या सर्व खटल्यांचा माफीनामा आणि त्यांचा खर्च भागवता भागवता व त्यासोबतच आपल्याविरुद्ध लागणाऱ्या प्रत्येक निकालासाठी जामीन आणि दंड भरता भरता या पेपरची पूर्णपणे पुरेवाट लागली आणि पत्रकार साहेब लवकरच कंगाल झाले .यावेळी दंड भरण्यासाठी पैसा नसल्याने पहिल्यांदा तर कोर्टाने त्यांच्या प्रिंटिंग प्रेस ला कुणालाही हात लावायला नकार दिला आणि त्यासोबतच पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा माणूस म्हणून त्यांची प्रशंसा केली मात्र त्यांचे हे उद्योग दिवसेंदिवस वेगळ्या थराला जात गेले तेव्हा मात्र कोर्टाने ती ही सवलत काढून घेतली व आपल्या शब्दांच्या विरुद्ध जाणाऱ्या या माणसाची प्रिंटिंग प्रेसही ताब्यात घेतली.

शेवटी हास्टिंग साहेबांची माफी मागावी या अटीखाली हीकी साहेबांची मधून सुटका करण्यात आली.

ही घटना घडल्यानंतर या पत्रकार साहेबांचे भविष्यात काय झाले याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही मात्र अशा घटना परत घडू नयेत म्हणून कंपनी सरकारने कलम 124A अनुसार सरकारवर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांच्या विरुद्ध एक कायदा बनवून ठेवला आणि असे करणार्‍या कोणत्याही वृत्तपत्राची खोड जिरवण्याची पूर्ण तजवीज करून ठेवली.

या साहेबांची पत्रकारिता पूर्णपणे वाया गेली नाही आणि त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली व या केसचा निकाल लागण्यासाठी तब्बल सात वर्ष गव्हर्नर जनरल साहेबांची चौकशी झाली नंतरच्या काळात ही केस ब्रिटनच्या कोर्टातही गेली आणि तेथेही गव्हर्नर जनरल साहेबांना याचा कबुलीजबाब द्यावा लागला.

कदाचित ह्या पत्रकारितेमध्ये तेवढी ताकद नसेल मात्र या घटनेनंतर भारतात उगवणाऱ्या प्रत्येक पत्रकारितेने हा धडा गिरवला आणि सरकारच्या विरोधी भूमिका घेण्याचं धाडस वेळोवेळी दाखवलं.

ह्या पेपरचे वितरण कोलकात्यामध्ये राहणाऱ्या जवळपास फक्त दोनशे लोकांसाठीच केले गेले होते मात्र ज्या लोकांविरुद्ध बोलण्याची धमक त्याकाळी एका पत्रकाराने दाखवली ती धमक आज कोणताही पत्रकार दाखवण्यासाठी पुढे येत नाही व जर का असा कोणी पुढे आलाच तर कोणते सरकारही या प्रकारच्या पत्रकाराला काय वागणूक देईल, हे आपल्या सर्वांनाच चांगलेच ठाऊक आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.