आयआरसीटीच्या शेअरची ट्रेन नेमकी का घसरली?

तुम्ही शेअर मार्केटमध्ये खेळत असाल, तर गेल्या काही दिवसांत ‘आयआरसीटी’ हे नाव तुम्ही सारखंच ऐकत असाल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरनं मार्केटमध्ये चांगलाच कल्ला केलाय. गेल्या काही दिवसांत फुल फॉर्ममध्ये असणारा शेअर पडला आणि मार्केटमध्ये सन्नाटा पसरला.

हा शेअर बातम्यांमध्ये का आला?

मागच्या पाच दिवसांत हा शेअर जवळपास ३० टक्क्यांनी वाढला होता. ज्यामुळं कंपनीनं १ ट्रिलियनचा टप्पा ओलांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत २०२१ मध्ये या शेअरमध्ये ३१४ टक्के वाढ झाली आहे. या शेअरनं मंगळवारी ६,३९६.३० रुपयांपर्यंत झेप घेतली. बुधवारी मात्र हा शेअर ४,४१५ रुपयांपर्यंत कोसळला. साहजिकच आयआरसीटीच्या शेअरबद्दलच्या बातम्यांना उधाण आलं.

आयपीओ कधी आला होता?

आयरसीटीचा आयपीओ बाजारात २०१९ मध्ये आला. तेव्हा त्याची इश्यू किंमत ३१५-३२० रूपये प्रति शेअर इतकी होती. साहजिकच गेल्या दोन वर्षांत या शेअरनं जवळपास १९ पट नफा मिळवून दिला आहे. आयआरसीटीसीनं ३० सप्टेंबर २०१९ रोजी ६३८ कोटी रूपयांचा आयपीओ आला आणि चार दिवसांत बंद झाला.

हा आयपीओ ११२ वेळा सबस्क्राईब झाल्यानंतर आयआरसीटीसीनं १४ ऑक्टोबरला शेअर बाजारात प्रवेश करत ६४४ रुपयांच्या किंमतीवर शेअर लिस्टेड केला गेला.

आता गेल्या काही दिवसांत नेमकं काय झालं?

आता शेअर एवढा झटक्यात वाढलाय म्हणल्यावर खळबळ झाली असणारच. ती नेमकी काय झाली ती बघुयात. सप्टेंबर महिन्यापासून आयआरसीटीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळतेय. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास २,७३० रूपये होती. सप्टेंबर अखेरपर्यंत मात्र शेअरनं ४ हजार रूपयांचा आकडा जवळ पोहोचला. ऑक्टोबर मध्येही शेअर्समध्ये तेजीचं सत्र सुरूच होतं.

दीर्घ कालावधीसाठी आयआरसीटीचा शेअर २ हजार रूपयांच्या टप्प्यात होता. परंतु कंपनीनं शेअर स्प्लिट करण्याची घोषणा केल्यानंतर, शेअर्सच्या किंमतीनं उड्डाणं घेतली.

शेअर स्प्लिट झाल्यावर परवडणाऱ्या किंमतीत अनेक लोकं हा शेअर विकत घेतील अशी शक्यता आहे, त्यामुळं साहजिकच शेअरचा भाव वधारत गेला. यामुळं कंपनीचं मार्केट कॅप १ लाख कोटी रूपयांच्या पार गेलं. त्यात दिवाळी तोंडावर आल्यानं आणि कोविडचे बरेच निर्बंध शिथिल झाल्यानं रेल्वेनं विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे, त्यामुळंही शेअरचे भाव वाढत आहेत.

शेअर का कोसळला?

एका वृत्तानुसार रेल्वेमध्ये खासगीकरणाच्या दृष्टीनं विचार सुरू असण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळं, रेग्युलेटरची तयारी करण्यात येत आहे. आरआयटीईएसनं रेग्युलेटरची नियुक्ती करण्याचा रिपोर्ट दिल्यानंतर, आता कॅबिनेट नोट तयार केली जाईल. खासगी ट्रेन्ससाठी रेग्युलेटरची शिफारस करण्यात आली आहे. सोबतच पॅसेंजर ट्रेन्स आणि मालभाडंही रेग्युलेटरच्या कक्षेत येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेल्वेचं खासगीकरण झाल्यास त्याचा शेअरवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अनेकांनी चांगल्या किंमतीत शेअर विकणं पसंत केलं. त्यात शेअर उच्चांकावर गेल्यानं अनेकांनी शेअर्स विकत नफा कमावला. मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं शेअर गडगडला आणि ४, ४१५ वर थांबला. 

येत्या काळात आयआरसीटीचा शेअर आणखी वधारू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे भिडू लोक गुंतवणूक करा, पण विचार करून.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.