पानिपतानंतर मराठ्यांनी पुन्हा कमावलेल्या वैभवाची साक्ष म्हणजे वाईची दहा मंदिरे

छत्रपती शिवरायांनी शुन्यातून निर्माण केलेले मराठ्यांचे स्वराज्य शाहू छत्रपतींच्या काळात खंडप्राय देशाएवढे वाढले. उत्तरेत मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, यशवंतराव पवार, दाभाडे आणि गायकवाड यांनी मराठ्यांचे साम्राज्य आपल्या तलवारीच्या टोकाने राखले. पूर्वेस रघुजी भोसल्यांची घोडदौड तुफान वेगाने होत होती. तर दक्षिणेत राजपुत्र फत्तेसिंह बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पटवर्धनादी सरदार साम्राज्य वाढीसाठी लढत होते. एकप्रकारचे स्थैर्य महाराष्ट्राला लाभले, तो काळ.

या वैभवशाली काळात मराठ्यांनी अनेक सांस्कृतिक गोष्टींमध्ये आपले योगदान दिले. यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत निर्माण झालेली मंदिरे..

मराठा साम्राज्यात अनेक भव्य मंदिरांची निर्मिती झाली. महाराष्ट्राबाहेर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा मराठ्यांनी केला. पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या काळात तर भारतातील एकूण एक, लहानमोठ्या मंदिराला सुगीचे दिवस आले. त्यापैकीच एक महत्वाचे ठिकाण म्हणजे वाई शहर. शिवछत्रपतींच्या पराक्रमाने अजरामर झालेल्या प्रतापगडापासून जवळ असणारे हे ‘जगप्रसिद्ध’ गाव..

वाई खरेतर धार्मिक क्षेत्र म्हणून सर्वांना माहीत आहे, पण मराठ्यांच्या स्थापत्यकलेमुळे सर्वार्थाने हे गाव श्रीमंत आहे. मराठ्यांच्या ‘सांस्कृतिक’ इतिहासाच्या वैभवशाली खुणा आजही हे गाव आपल्या अंगा-खांद्यावर मिरवत आहे.

सरदार ‘भिकाजीराव रास्ते’. मराठा साम्राज्यातील महान योद्धा बाजीराव पेशवे यांचे व्याही, नानासाहेब पेशव्यांचे सासरे. मराठा साम्राज्याचे सावकार..शाहू छत्रपतींचे मातब्बर सरदार.

रास्त्यांचा मोतीबाग येथील वाडा असो वा वाई शहरात बांधलेली मंदिरे.. मराठ्यांच्या श्रीमंतीचे दर्शनच या बांधकामातून दिसून येते. या भिकाजीराव रास्त्यांच्या चार पुत्रांनी वाई शहरात नदीकाठी काही मंदिरे बांधली तर काही जीर्णोद्धारित केली. त्या सर्वांचा जमाखर्च पाहील्यास तो एका प्रतिष्ठित खाजगी कंपनीमधे उच्च पदावर काम करणाऱ्या माणसाच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे हे पुर्ण स्थापत्य ‘मराठा शैलीतले’ आहे, त्याचमुळे हे बांधकाम महत्वाचे ठरते.

भिकाजीराव रास्ते यांना चार पुत्र.. गणपतराव, गंगाधरराव,रामचंद्रराव आणि आनंदराव. या चारही पुत्रांनी मिळून एकूण दहा मंदिरे बांधली.

यातील सर्वात महागडे मंदिर म्हणजे ‘महालक्ष्मी मंदिर’ आणि ‘महाविष्णु मंदिर’.. ह्या दोन्ही मंदिरांचा प्रत्येकी खर्च 2,75,630 आणि 2,16,215 इतका होता. ‘काशी विश्वेश्वर’ आणि वाई शहरातील प्रसिद्ध ‘गणपती’ मंदिराचे बांधकाम प्रत्येकी 1,50,000 रूपयांत झाले. ‘उमामहेश्वर पंचायतन मंदिर’ 60 हजारांत बांधून पुर्ण झाले. बाकी घाटाच्या आजूबाजूला असलेली गंगारामेश्वर, बहिरवदेव उर्फ़ भैरोबा, सटवाई देवी, रामचंद्र आणि भवानी मंदिर यांचाही खर्च जवळ जवळ 2 लाखांपर्यंतचा आहे.

ही सर्व मंदिरे इसवी सन 1761 ते इसवी सन 1784 ह्या 24 वर्षांच्या दरम्यान बांधण्यात आली. कृष्णा नदीच्या घाटावर बांधलेली ही सर्व मंदिरे आजही अत्यंत भक्कमपणे उभी आहेत. या मंदिराच्या भिंतीवर मराठ्यांच्या कलेचे खास आकर्षण असलेली ‘भित्तिचित्रे’ आपल्याला पाहायला मिळतात.

या सर्व मंदिरांच्या उभारणीचा, बांधकामाचा खर्च आला होता, तब्बल 9 लक्ष 4 हजार 347 रुपये..!! 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांचे पानिपतावर महाभयंकर युद्ध घडले. त्यात संबंध एक पिढी खर्ची पडली. तरीही एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे मराठ्यांनी पुन्हा एकदा भरारी घेतली.

अडीचशे वर्षांपूर्वी एकाच गावात, एकाच ठिकाणी मंदिरे बांधण्यासाठी मराठ्यांनी दहा लाख रुपये खर्च केले होते. साऱ्या महाराष्ट्रात आज हजारोंच्या संख्येने मराठा शैलीतील मंदिरे उभी आहेत. यावरूनच मराठ्यांच्या गर्भश्रीमंतीचे दर्शन आपल्याला होते.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.