पुण्यात साथीचे रोग आले की लोक पद्मावतीच्या तळ्यात अंघोळीला जायचे..

फार पूर्वी पुणे हे अगदी छोटस गाव होतं. म्हणजे १९३० सालापर्यंत पुण्यामधील लक्ष्मी रोड व स्वारगेट च्या पलीकडे वस्ती नव्हती. सातारा रोडचा परिसर अगदी निर्मनुष्य होता. तो संपूर्ण भाग शेती आणि वृक्षांनी भरलेला होता. पण शहरापासून दूर अंतरावर काही छोट्या वस्त्या मात्र होत्या. अशाच एका वस्तीमध्ये दहा-बारा कुटुंब राहत असलेली एक वस्ती होती. याच वस्तीमध्ये बिबवे नावाचं एक कुटुंब होते. या कुटुंबात धर्माची तुकाराम बिबवे नावाचे मूळ पुरुष होते. ते देवीचे निस्सिम भक्त होते. कोकणातल्या पद्मावती देवीवर त्यांची अढळ श्रद्धा होती.

धर्माजी हे व्यापारी होते. कोकणातून तांदूळ विकत घेऊन पुण्यात येणे आणि ते इथे विकणे असा त्यांचा धंदा होता. कोकणात सतत जाणं-येणं असल्यामुळे कोकणातल्या पद्मावती देवीवर त्यांची प्रचंड श्रद्धा निर्माण झाली होती. या देवीचे ठाणे आपल्या परिसरात सुद्धा असावे असा विचार धर्माजी यांच्या मनात आला. ही देवी जर आपल्या परिसरात आली तर दररोज ह्या देवीचे दर्शन आपल्याला होईल अशी त्यांच्या मनामध्ये कल्पना आली.

या विचारावर त्यांचा भक्तिमार्ग सुरू झाला.

देवीच्या नावाने उपास सुरू झाले. एक दिवशी धर्माजी यांना सिद्धांत झाला. झोपेत त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये कोकणातली पद्मावती देवी त्यांच्या समोर आली आणि म्हणाली,

“मी तुझ्या इच्छेप्रमाणे इथे यायला तयार आहे. पण तू मागे पाहायचं नाही. तु ज्या क्षणी आणि ज्या ठिकाणी मागे पाहशील, त्याच क्षणी आणि त्याच ठिकाणी मी बसून राहील”.

धर्माजींना जाग आली. देवी आपल्याकडे येणार याचा त्यांना आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्यांनी गाडीला बैल जोडले आणि वार्‍यासारखी बैलगाडी पळवली. पण जशी जशी वस्ती जवळ आली तसा त्यांना मागे पाहण्याचा मोह आवरेनासा झाला. शेवटी त्यांनी मागे पाहिले आणि बैलाच्या खुरातून त्यांना देवीचे दर्शन झाले. ज्याठिकाणी दर्शन झाले त्याच ठिकाणी आज पद्मावती देवीचे मंदिर उभे आहे.

त्यावेळी पद्मावतीचा परिसर म्हणजे ओसाड रान होते. डोंगराच्या पायथ्याशी शेती होती. याच ठिकाणी देवीचे मंदिर उभारण्यात आले. पद्मावती देवीचे मंदिर डोंगरावर नसल्यामुळे भाविकांना डोंगर चढण्याचा तअसला कोणता त्रास न्हवता. त्यामुळे हे मंदिर सहलीचे फार मोठे केंद्र बनले. मंदिराचा मोकळा परिसर आणि शहरापासून अगदी जवळ असल्याने रविवारच्या व सुट्टीच्या दिवशी इथे अनेक कुटुंब येऊन सहलीचा आणि वन भोजनाचा आनंद लुटू लागले.

हे देवीचे मंदिर फार मोठे नाही किंवा भव्य सुद्धा नाही. अगदी साधे असे हे मंदिर आहे. या मंदिरात श्रीमंतीचा कुठलाही बडेजाव नाही. या मंदिराचे दोन भाग आहेत. एक गाभारा आणि दुसरा मंडप. मंडपामध्ये होमकुंड आहे. देवीची मूर्ती फार मोठी नाही. ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुर्वी नवरात्र उत्सवात बैलगाडी करून आसपासच्या भागातील लोक येथे उत्सवास येत.

पूर्वी या पद्मावती देवीच्या देवळाच्या परिसरात एक मोठे तळे होते. या तळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या तळ्यातल्या पाण्याने अंघोळ केली की खरूज, नायटे यासारखे त्वचारोग बरे होत असे. पूर्वी अशा त्वचा रोगांची साथ मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे या तळ्यात भरपूर भाविक आंघोळ करत असे. त्वचा रोगांचे किस्से आजही तिथले काही भाविक आपल्याला सांगताना आढळतात. सध्या हे तळे महानगरपालिकेच्या ताब्यात असून पालिकेच्या एका उद्यानात आहे.

महानगरपालिकेने मंदिराचा काही भाग व तळे आपल्या ताब्यात घेतल्यामुळे, या आनंदवनातील आनंदच नष्ट झाला अशी भाविकांची भावना आणि नाराजी आहे.

– कपिल जाधव

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.