लोणारच्या विवरात असणाऱ्या या देवीला ऐतिहासिकच नाही तर भौगोलिक महत्व देखील आहे

निसर्गाच्या सानिध्यातच देवाचे स्थान असते असे म्हणतात. आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश देवाचे स्थान असलेल्या ठिकाणांना नयनरम्य निसर्गाचे सान्निध्य लाभले आहे. काही देवस्थाने तिथल्या निसर्गामुळे प्रसिद्ध आहेत. बरेच भाविक देवदर्शना सोबत निसर्गाची हवा खाण्यास महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या देवस्थानाला भेट देत असतात.

आज अश्याच एका विदर्भातील देवस्थानास आपण भेट देऊ.

महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. सरोवराची निर्मिती ५२ हजार वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.६० मीटर रुंदीची व २० लाख टनांपेक्षा जास्त वजनाची उल्का येथे पडली होती. त्यातूनच या सरोवराची निर्मिती झाली.

लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. पौराणिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अशा सर्व बाजूंनी या सरोवराला महत्त्व आहे.

या परीसराबद्दल बऱ्याच अख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात. असे म्हणतात की, स्कंद पुराणात बालरूपात येऊन श्रीविष्णूने लवणासुराचा वध या ठिकाणी केला. त्या लवणासुराच्या वधाचा प्रदेश म्हणून लवणार आणि त्याचे अपभ्रंश होऊन लोणार हे नाव या भागाला पडलं. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.

त्यातलेच एक मंदीर म्हणजे कमळजा देवीचे मंदिर.

हे मंदीर कदंब काळातील आहे असे म्हणतात. हे मंदीर चुना व मातीत बांधलेले आहे. हे मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला तीन मुख आहेत. उत्तरेकडील महाद्वारातून गंगाभोवतीचे पडणारे पाणी दिसते. देवीचे मंदिर अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. मंदिरामध्ये स्तंभ नाहीत. देवीचा मुखवटा तांदळासारखा आहे. तिचा आकार माहूरच्या देवीसारखा आहे. पुराणामध्ये या देवीला पद्मावती देवी संबोधले आहे. ह्या देवीची मूर्ती एकाच काळया पाषाणात आहे.

कमळजादेवी ही अत्यंत प्राचीन दैवतांपैकी एक आहे. असे म्हणतात की, विष्णू ने जेव्हा लवणासुराचा वध केला तेव्हा कमळजा देवी विष्णु सोबत आल्या होत्या. वध झाल्यानंतर विनंतीवरून त्या येथेच राहिल्या.

वाल्मिकी रामायण सांगते की,प्रभू रामचंद्र वनवासात दंडकारण्यात असताना या देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते व सीता ने या देवीची ओटी भरली होती.

तसेच अनेक ऋषी-महंतांनी व संतांनी या ठिकाणी येऊन तपश्चर्या केली आहे. तसेच अध्यात्मयोगी महापुरुषांना सारी योगसिद्धी प्राप्त करुन देणारी ही देवी आहे.

या मंदिराच्या परिसरात सासू-सुनेची विहीर सुद्धा आहे. या विहिरीचे वैशिष्टय म्हणजे की याचा अर्धा भाग गोड्या पाण्याचा व अर्धा भाग खाऱ्या पाण्याचा आहे. म्हणून या विहिरीला सासू सुनेची विहीर म्हणून ओळखल जात.

तालुक्यातील अनेक कुटुंबाचे ही देवी आराध्य दैवत आहे.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.