वडिलांनी विवाहबाह्य संबधांच्या विरोधात निर्णय दिलेला, आत्ता मुलाने तो पलटवला आहे !

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने आपल्या ऐतिहासिक निर्णयात  भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ रद्दबातल ठरवताना विवाहबाह्य संबंध बेकायदेशीर नसल्याचं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयात न्या.चंद्रचूड यांची अतिशय महत्वपूर्ण भूमिका राहिली.

न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी हा ऐतिहासिक निर्णय देताना या विषयावर आपल्याच वडिलांनी १९८५ साली दिलेला निर्णय पलटावून लावला आहे.

विवाहबाह्य संबंध हे गुन्हा असू शकत नाहीत. आपल्या जोडीदाराचे  दुसऱ्या कुणाशी विवाहबाह्य संबंध असतील, तर दुसऱ्या जोडीदारासमोर घटस्पोट घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो, असं न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हंटलंय.

१९८५ साली याच विषयावर न्या.यशवंत विष्णू चंद्रचूड अर्थात सिनीअर चंद्रचूड यांनी निर्णय देताना विवाहबाह्य संबंधांना गुन्हा ठरवलं होतं. विशेष म्हणजे विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणात कलम ४९७ अन्वये फक्त पुरुषांनाच सजा देण्याची तरतूद होती. विवाहसंस्थेच्या बळकटीसाठी विवाहबाह्य संबंध हे गुन्हा मानले जावेत असं त्यावेळी न्यायालयाने म्हंटलं होतं.

कलम ४९७ रद्द करताना कायद्यासमोर स्त्री-पुरुष दोघेही समान असल्याचं सांगत पुरुष हा स्त्रीचा मालक असू शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सद्यस्थितीतील १५० वर्षांपूर्वीचा कायदा कालबाह्य असल्याचं देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय.

न्या. चंद्रचूड यांनी आपल्या वडिलांचा निर्णय पालटवून लावण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही.

यापूर्वी देखील त्यांनी असाच कारनामा घडवलाय. १९७५ साली न्या. यशवंत चंद्रचूड यांच्या खंडपीठाने गोपनीयतेसंदर्भातील निर्णय देताना ‘गोपनीयता हा नागरिकांचा मुलभूत अधिकार नाही’ असा निर्णय दिला होता.

२०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयता हा नागरिकांचा मुलभूत अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय देताना १९७५ सालच्या निर्णयात गंभीर त्रुटी असल्याचं सांगत हा निर्णय पालटवून लावला होता. या निर्णयात देखील न्या. धनंजय चंद्रचूड यांची महत्वाची भूमिका राहिली होती.

कुठल्याही सभ्य समाजात वावरताना नागरिकांच्या गोपनियतेच्या अधिकारावर आक्रमण करण्याचा विचार केला जाऊ शकत नाही. सरकारला तसा अधिकार नाही. नागरिकांची गोपनीयता हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे, असं न्या. धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या निर्णयात म्हंटलं होतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.