भावाला संगीत दिग्दर्शनाचं काम दिलं नाही म्हणून लतादीदी राज कपूरवर चिडल्या होत्या…

राज कपूर हे बॉलिवुड मधील एक दिग्गज मानले जातात. आरके फिल्म स्टुडिओतुन अनेक सुपरहिट सिनेमे त्यानी दिले होते. त्याकाळी हिट सिनेमांची मांदियाळी देणारा दिग्दर्शक म्हणून राज कपूर यांची ख्याती होती. पण राज कपूर यांच्या एका सिनेमाच्या संगीत दिग्दर्शनावरून लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे दोघे राज कपूर यांच्यावर नाराज झाले होते. तर जाणून घेऊया काय किस्सा होता.

राज कपूर हे जरी बॉलिवूडचा एक ट्रेडमार्क करण्यात बिजी होते तरी ते इतर भाषांमध्ये काय काय चाललंय यावर बारीक लक्ष ठेवायचे. सगळ्या कलाप्रकारांच्या समकालिन नोंदी स्वत:कडे ठेवण्याची त्यांना आस असायची. निरनिराळ्या भाषेतलं साहित्य, कथा, कविता, गाणी ह्याचा ते जातीने धांडोळा घेत. मराठीत पुलं काय लिहिताहेत, विजय तेंडुलकरांची कोणती नाटकं चालू आहेत, बंगालीत काय घडतंय, मल्याळीमध्ये काय होतंय ह्याची ते आपल्या पध्दतीने चाचपणी करत. श्रीनिवास खळे यांची भावगीते ऐकून तर राज कपूर अक्षरशः वेडे झाले होते. भेटी लागी जिवा तर त्यांनी अगणित वेळा ऐकलेलं होतं.

याच काळात सत्यम् शिवम् सुंदरम्’ची निर्मिती करण्याच्या तयारीत राज कपूर गुंतले होते. ‘मेरा नाम जोकर’सारख्या महत्वाकांक्षी सिनेमात मार खाल्ल्यामुळे नंतर ‘बॉबी’ पडद्यावर आणताना काही गोष्टीत राज कपूरनी सावध पावलं टाकली होती. उदाहरणच द्यायचं तर बॉबीचं संगीत त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलालवर सोपवली होती. बॉबीसकट बॉबीतली गाणीही सुपरडुपर चालल्यामुळे राज कपूरचा आत्मविश्वास दुणावला होता. आता सत्यम शिवम सुंदरममध्ये लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांचंच संगीत असणार याची सगळ्यांना खात्री होती.

हा सगळा खरंतर चर्चांचा भाग होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सहायकांना खात्री होती की ह्या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन लक्ष्मीकांत प्यारेलाल हेच करतील. पण इथं एक डेंजर ट्विस्ट होता. भेटी लागी जिवा या गाण्याचे संगीतकार होते खळेकाका पण त्यांच्याबरोबर हृदयनाथ मंगेशकरांकडेसुद्धा राज कपूर यांचं लक्ष होतं. ह्या संगीतकाराची संगीतातली वाट नेहमीच्या संगीतकारांसारखी मळलेली नाही हे राज कपूरच्या दर्दी मनाला त्यांचं संगीत ऐकताना केव्हाच लक्षात आलं होतं. लता मंगेशकरांकडे त्याबद्दल त्यांनी अगदी मुक्त कंठाने तारीफ केली होती. राज कपूरसारखा दर्दी माणूस आपल्या भावाच्या संगीताची तारीफ करतो म्हणून लता मंगेशकरांचं मनही सुखावलं होतं.

सत्यम शिवम सुंदरम या सिनेमासाठी शास्त्रीय संगीताचा बाज राज कपूर वापरू इच्छित होते. असा संगीतकार कोण आहे याचा शोध ते घेऊ लागले तोच त्यांना हृदयनाथ मंगेशकरांची आठवण झाली आणि ते थेट लता मंगेशकर यांच्या घरी जाऊन पोहचले. लतादिदींनाही त्यांच्या त्या येण्याचं आश्चर्यही वाटलं आणि कौतुकही. त्याच्या आगामी सिनेमाच्या संगीतासाठी आपल्या लहान भावाची निवड करावी ह्याचं त्यांना कौतुकही वाटलं होतं. आपला कलावंत भाऊ राज कपूरसारख्या कलावंताने केलेल्या निवडीसाठी पात्र ठरावा ह्याने त्या सुखावणं साहजिक होतं.

लता दीदी त्याकाळात प्रचंड व्यस्त होत्या. रेकॉर्डिंग, दौरे यामुळे त्यांना उसंत नव्हती. आपल्या भावाने स्वतःच्या बळावर काम मिळवलं याचा त्यांना अभिमान होता. पण इकडे राज कपूरने आपला प्लॅन बदलला आणि सत्यम शिवम सुंदरम साठी हृदयनाथ मंगेशकरांऐवजी आपल्या नेहमीच्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना संगीत दिग्दर्शक म्हणून घेतलं.

लता मंगेशकर परदेशातून आल्यावर त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्या नाराज झाल्या. कारण स्वत: हृदयनाथ मंगेशकर राज कपूरकडे काही काम मागायला गेले नव्हते तर खुद्द राज कपूरच कामाचा प्रस्ताव घेऊन हृदयनाथांच्या घरी आले होते. त्याला काम द्यायचंच नव्हतं तर तुम्ही मुळात आलातच कशाला, असा लता मंगेशकरांचा सवाल होता. त्या नाराज झाल्या आणि राज कपूर यांच्या सिनेमात त्या गाणार नाही असं त्यांनी डिक्लेर करून टाकलं यामुळे पुढचं सगळच मॅनेजमेंट बिघडलं.

शेवटी हृदयनाथ यांनी लता मंगेशकरांना समजावलं. ते म्हणाले, ‘दिदी माझ्यासाठी हा सिनेमा तू सोडू नयेस असं मला वाटतं, कदाचित मला ह्या सिनेमासाठी न घेण्यामागे त्यांचीही काहीतरी बाजू असेल!’

लता मंगेशकरांना आपल्या भावाचं हे म्हणणं पटलं आणि त्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चं गाणं गाण्यासाठी राजी झाल्या.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.