पुरस्कार जिंकले, पुस्तकं लिहिली पण गडी लॉकडाऊनमध्ये भारतीयांचं पोट भरायला विसरला नाही

लय नाही पण काही वर्षांआधी एक मराठी सिनेमा आलेला. त्यातला हिरो एका आजीबाईंना स्वयंपाक शिकवाल का असं विचारतो? आजीबाई त्याला म्हणतात… ‘कशाला बाईलवेडी कामं?’ आता आजींचे विचार टिपिकल जुनाट. त्यांना कोण सांगणार, की स्वयंपाक ही कुणा जेंडरची जबाबदारी नाहीये. तर स्वयंपाक हे एक आर्टय, जग जिंकण्याचा मार्गय.

आता कसं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर आहे विकास खन्ना.

अमृतसरमध्ये जन्मलेले विकास खन्ना आज जगातल्या टॉपच्या शेफ्स पैकी एक आहेत. ‘विकास भाऊ, तुमच्या हातासारखी चव कुणाच्याच हाताला नाही’ हे त्यांना नरेंद्र मोदी, ओबामा आणि फॅमिली सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू पोप या सगळ्यांनी सांगितलंय. साधं काम नाहीच.

खन्ना यांनी भारतातल्या अनेक मोठ्या हॉटेलमध्ये काम केलं, स्वतःचं हॉटेल काढलं, भरपूर पुस्तकं लिहिली, अनेक मानाचे पुरस्कार मिळवले, तरीही त्यांच्या मते त्यांचं सगळ्यात मोठं यश म्हणजे लॉकडाऊनच्या काळात लाखो भारतीयांना दिलेलं जेवण.

छटाकभर यशानं माणूस हवेत गेला की गापदिशी आपटत असतोय, खरं यश पाय जमिनीवर ठेवण्यात असतंय भिडू. असं आम्हाला कुणीतरी सांगितलेलं, विकास खन्नांनी संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं.

आता तुम्हाला त्यांची लाईफ स्टोरी सांगतो-

खन्ना यांच्या जन्मानंतर त्यांना लाकडी पायांचा सपोर्ट लावावा लागला होता. डॉक्टरांनी हे कधीच चालू शकणार नाहीत असा अंदाज बांधला होता; मात्र खन्नांच्या इच्छाशक्तीनं हा अंदाज खोटा ठरवला. वयाच्या अकराव्या वर्षाआधीच ते कुणाच्याही आधाराशिवाय पळू लागले.

त्यांच्या पायांमुळं शाळेतली पोरं त्यांची टिंगल करायची. म्हणून खन्ना आपला जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये आपल्या आजीसोबत घालवू लागले. तिथंच त्यांना स्वयंपाकाची गोडी लागली आणि ती त्यांनी आयुष्यभर जपली. पुढं त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि भारतातल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केलं.

या कामादरम्यान त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. ज्यामुळं खन्ना शिकले की, माणूसकीच हा सगळ्यात मोठा धर्म आहे. १९९२ च्या दंगलीत विकास खन्ना यांना एका मुस्लिम कुटुंबानं आश्रय दिला होता. भिडूनं सगळं लिहिलेलं असतंय…

वाचा-

१९९२ च्या दंगलीतून एका मुस्लीम कुटूंबाने त्यांचे प्राण वाचवले होते, आणि २६ वर्षांनंतर…

तर पुन्हा एकदा आपल्या विषयाकडं येऊ. भारतात काम केल्यानंतर खन्ना पॅरिसमध्ये गेले. तिथं एका मोठ्या शेफच्या हाताखाली काम करताना त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला. त्यामुळं गडी इरेला पेटला.

त्यानंतर खन्ना यांनी मागं वळून पाहिलं नाही. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये जुनून नावानं हॉटेल सुरू केलं आणि अवघ्या १० महिन्यांत ‘मिशेलिन स्टार’ नावाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवला. खन्ना सेलिब्रेटी शेफ म्हणू ओळखले जातात. मोदी, पोप, ओबामा, बायडेन अशा अनेक सेलिब्रेटींसाठी त्यांनी जेवण बनवलंय.

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या शोमध्ये त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. खन्ना यांनी अनेक पुस्तकं लिहिली. मात्र त्यांचं ‘उत्सव’ हे पुस्तक चांगलंच गाजलं. १५ किलो वजन असलेल्या या पुस्तकाची लिलावातली किंमत आठ लाख होती. पुस्तकाचं उद्घाटनही कान्स फिल्म महोत्सवात झालं. एवढंच काय, इंग्लंडची राणी एलिझाबेथलाही खन्ना यांनी हे पुस्तक भेट दिलंय.

आता येऊयात लॉकडाऊनमधल्या किश्श्याकडे…

भारतात लॉकडाऊन पडलं, तेव्हा खन्ना न्यूयॉर्कमध्ये होते. त्यांनी भारतीयांची मदत करा असं सांगणाऱ्या ईमेलवर आलेल्या लिंकला उत्तर देत काही पैसे डोनेट केले. नंतर त्यांना समजलं की त्यांचा सुभाष झालाय. म्हणजेच त्यांना गंडवलंय. त्यानंतर खन्ना यांनी ट्विट करत मदतीची गरज असणाऱ्या वृद्धाश्रम, अनाथाश्रम यांना संपर्क करण्याचं आवाहन केलं.

काळ खन्नांसाठीही कठीण होता. लॉकडाऊनमुळं त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. जवळचे मित्र आणि नातेवाईक त्यांना गमवावे लागले होते. तरीही त्यांनी ‘फीड इंडिया’ नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. वाराणसी आणि मॅंगलोर या दोन शहरांपासून त्यांनी सुरुवात केली. नेमका त्यांचा खाण्याची सामुग्री असणारा ट्रक कुणीतरी लुटला आणि मदत करावी का नको या पेचात खन्ना अडकले.

पण त्यांच्या आईनं त्यांना धीर दिला. आपल्या देशाच्या आशिर्वादांची परतफेड करण्याची हीच वेळ आहे, असं सांगितलं.

त्यानंतर, खन्ना यांनी एनडीआरएफचे प्रमुख एसएन प्रधान यांच्याशी चर्चा करत त्यांच्या साथीनंच हा प्रोजेक्ट चालवायला घेतला. देशभरातल्या लाखो मजूर, सेक्स वर्कर, एचआयव्ही पेशन्ट्स, वृद्ध, अनाथालय यांच्यापर्यंत त्यांनी मदत पोहोचवली.

आपल्या घराच्या गच्चीतुन खन्ना यांनी दिलेला मदतीचा हात अनेक मोठ्या कंपन्यांनी ही उचलून धरला आणि भारतातल्या लाखो लोकांच्या पोटात अन्नाचा घास गेला.

आपल्या या मदतीबद्दल बोलताना खन्ना म्हणाले होते, ‘जर माझी आजी जिवंत असती, तर ती म्हणाली असती; तू मिशेलिन स्टारसाठी नाही तर ही मदत करण्यासाठी जन्माला आलायस.’

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.