पुण्याचे लेले स्वयंपाक करत होते अन् द्रविड त्यांना भाजी चिरून देत होता ..

सुनंदन लेले यांना कोण ओळखत नाही? सुप्रसिद्ध क्रीडासमीक्षक. आपल्या खास पुणेरी स्टाईलने चुरचुरीत फोडणी देऊन त्यांनी सांगितलेले क्रिकेटमधील ‘अफलातून’ किस्से गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड हिट झाले आहेत.

असाच त्यांनी क्रिकेटर राहुल द्रविड याच्या बद्दल सांगितलेला एक गंमतीशीर किस्सा.

गोष्ट आहे २००६ सालची. भारतीय टीम वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली होती. राहुल द्रविड आपला कप्तान होता. सचिन दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. ग्रेग चॅपल सोबतच्या वादामुळे गांगुलीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.  या सिनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत सेहवाग, धोनी, जाफर, कैफ, युवराज या तरुण खेळाडूंच्या भरवश्यावर आपली टीम विंडीजला आली होती.

तेव्हा त्यांचा कप्तान ब्रायन लारा फुल फॉर्म मध्ये होता. विंडीजची देखील टीम तगडी होती. वनडे सिरीजमध्ये तर त्यांनी आपल्याला ४-१ने धूळ चारली होती. मात्र तरीही भारताच्या या तुलनेने अननुभवी टीमने त्यांना कसोटीत चांगली लढत दिली.

पहिल्या तीन ही  कसोटी अनिर्णयीत राखल्या.

फायनल कसोटी जमैकाचा सबिना पार्क वर होणार होती. द्रविडने काहीही करून हा सामना जिंकायचं ठरवलं होत. सबिना पार्कची खेळपट्टी भल्याभल्याना चितपट करणारी होती. हि कसोटी लो स्कोरिंग अशी झाली. पहिल्या डावात  भारताची सुरवात चांगली नव्हती. सेहवाग १, जाफर ० असे ओपनर लवकर परतले. भरवश्याचा लक्ष्मण देखील काही चमत्कार करू शकला नाही. संपूर्ण बॅटिंग लाइनअप कोसळली.

एकटा राहुल द्रविड अनिल कुंबळेला साथीला घेऊन नांगर टाकून उभा राहिला. त्याने केलेल्या ८१ धावांमुळे आपण कसेबसे दोनशेच्या आकड्यापर्यंत पोहचलो. विंडीजची अवस्था आपल्या पेक्षा वाईट होती. त्यांनी  घरच्या मैदानात फक्त १०३ धावा बनवल्या.

दुसऱ्या डावात पुन्हा सगळे बॅट्समन फेल गेले. फक्त द्रविडने परत फिफ्टी ठोकली. कुंबळे, हरभजनच्या बॉलिंगच्या जोरावर आपण सहज विजय मिळवला.

राहुलने कसोटी मालिका विजयाचा कप उचललाच पण सोबतच त्यासोबतच मॅन ऑफ दि मॅच, मन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी सुद्धा खिशात टाकली. सुनंदन लेले आपल्या आठवणी सांगताना म्हणतात,

“खुद्द वेस्ट इंडिजचा कप्तान ब्रायन लारा त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल द्रविडचं भरभरून कौतुक करत होता.”

याच मॅचमध्ये द्रविडने आपल्या कसोटी करियरमधील ७ की ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.  वेस्ट इंडिजच्या भूमीत मिळवलेल्या या दुर्मिळ विजयामुळे राहुलने बॅटिंग पाठोपाठ आपल्या कप्तानीच नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं.

तो दिवस त्याच्यासाठी सर्वात संस्मरणीय अशी होती.

हि सिरीज कव्हर करण्यासाठी सुनंदन लेलेदेखील वेस्ट इंडिजला आले होते. मॅच झाल्यानंतर ते राहुलला भेटले. या दोघांची फार जुनी मैत्री आहे. लेले यांनी त्याला घरी जेवायला येतोस का असं विचारलं. राहुल गंमतीमध्ये त्यांना म्हणाला,

“का येथे पण तुझी काही फिल्डिंग आहे का ?” 

सुनंदन लेले यांचा एक मनीष वेद नावाचा नागपूरचा मित्र तिथे राहायचा. त्याचा फ्लॅट सबिना पार्क पासून जवळच होता. लेले त्याच्याकडेच उतरले होते. त्यांचं आमंत्रण द्रविडने स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी राहुल, त्याची पत्नी विजेता आणि आपल्या छोट्या बाळाला बाबा गाडीत घालून चालत चालत वेद यांच्या फ्लॅटवर आला.

स्वयंपाकाची मुख्य जबाबदारी सुनंदन लेले यांनी उचलली होती.  म्हणजे काय तर साधं सोपं वरण भात , फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी असा मेनू बनवला होता. त्यांच्या मित्राने पोळ्या बनवल्या होता. राहुल फ्लॅटवर आला तेव्हा यांची तो सहज किचनमध्ये डोकावला तेव्हा लेलेंची स्वयंपाक करायची धडपड सुरूच होती.

राहुल म्हणाला,

“मी काही मदत करू का?”

सुनंदन लेले त्याला म्हणाले,

“सॅलेड आणि’कोशिंबीर करायची आहे. तू काकडी चिरून देशील ?” 

द्रविड हो हो म्हणाला. लेलेंनी त्याला काकडी, टोमॅटो,चाकू आणि चॉपिंग बोर्ड सोपवला. राहुल बाहेर हॉलमध्ये खाली बसून काकडीचे काप करू लागला. थोड्या वेळाने त्याची बायको किचन मध्ये आली आणि लेलेंना म्हणाली,

“सुनंदन जरा एक सेकंद बाहेर चल आणि मज्जा बघ ना तुझ्या मित्राची मज्जा “

तिने दाखवलं की राहुल द्रविड काकडीचे काप करतानासुद्धा हे सगळे काप २ एमएमचे कसे होतील हे एकाग्रतेने प्रयत्न करत होता आणि त्यामुळे त्याला वेळ लागत होता. विजेताने त्याचे काही फोटो काढले आणि म्हणाली,

“अरे राहुल सगळे काप अगदी २ एमएमचे व्हायला पाहिजेत असा नियम नाही. इथे परफेक्शन नाही चालणार. बिनधास्त काप.”

त्या दिवशी राहुल द्रविडच्या हातच परफेक्ट कोशिंबीर, लेलेंचा स्वयंपाक सगळ्यांनी एन्जॉय केला. भारताचा विंडीजच्या भूमीत विजय साकारणारा हा सर्वात मोठा कप्तान मैदानात आणि मैदानाच्या बाहेर तितकाच सिम्पल आहे याचा अनुभव त्या दिवशी सुनंदन लेले यांना आला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.