थोरल्याचा दंगा कितीही असुद्या, पण छोटा फ्लॉवरही मोठा धमाका होता…

जशी दर १२ मैलांना भाषा बदलते, तसं प्रत्येक पिढीसाठी क्रिकेटही बदलतं. म्हणजे बघा सध्या शाळेत जाणाऱ्या पिढीसाठी आयपीएल म्हणजे लय भारी, कॉलेजात जाणाऱ्या पोरांचा देव धोनी आणि जॉबला लागलेल्या पोरांच्या देव्हाऱ्यात तेंडुलकर, तिकडं वडील अझरुद्दीनचं कौतुक करणार आणि आजोबा कपिल देव आणि गावसकरचं. बरं आपल्याच काळातलं क्रिकेट कसं भारी, हे प्रत्येकजण छाती ठोकून सांगू शकतो.

सगळ्या पिढ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर म्हणजे, जसे पोरांना आपल्या टीमचे कार्यकर्ते आवडतात… तसे समोरच्या टीमचेही. आता सध्या कुणाला कोण आवडतं, हे सांगत बसत नाही… पण दोन नावं सांगतो… जी तुम्हाला डायरेक्ट भूतकाळात नेतील…

अँडी फ्लॉवर आणि ग्रँट फ्लॉवर

दोन भाऊ एकत्र आले, की काय राडा घालू शकतात हे दाखवून देणारी जोडी म्हणजे हे फ्लॉवर बंधू. झिम्बाब्वेला क्रिकेटच्या नकाशावर ओळख मिळवून देण्यात सगळ्यात मोठा वाटा या जोडीचा आहे. मोठा अँडी फ्लॉवर धडाकेबाज होता, तर धाकटा ग्रँट म्हणजे शांतीत क्रांती.

झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये ताकद मिळवावी लागली. त्यांना टेस्ट स्टेट्ससाठी, वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी लय लडतरी कराव्या लागल्या. १९९० मध्ये आयसीसीची स्पर्धा झाली, ती स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार होतं. त्यामुळं झिम्बाब्वेसाठी ती स्पर्धा प्रचंड महत्त्वाची होती. त्यावेळी ग्रॅंटचं वय होतं फक्त १९. पण गड्यानं स्पर्धेच्या सुरुवातीच्या मॅचेसमध्येच धुव्वा करायला सुरुवात केली आणि झिम्बाब्वेनं स्पर्धा जिंकली. 

नशीब कसं असतंय बघा… दुखापत झाल्यामुळं ग्रँटला वर्ल्डकपमध्ये खेळताच आलं नाही.

वर्ल्डकपमध्ये खेळल्यामुळं मात्र, झिम्बाब्वेला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी लवकर मिळाली. आपल्या देशाकडून पहिलीच टेस्ट खेळताना ग्रँट ओपनिंगला आला आणि खणखणीत ८६ रन्सही केले. तिथून पुढं कॅलेंडरची पानं बदलत राहिली आणि झिम्बाब्वेचा दबदबाही वाढत गेला.

या दोन फ्लॉवर भावांनी, क्रिकेटमध्ये दंगा केला होताच. पण एकदा त्यांनी आपल्या भारतीय बॉलर्सला लय घाण टेन्शन दिलं होतं…

तुमच्यापैकी लय जणांना आठवत असेलच, पण आपण जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. २००१ मधला जून महिना. भारताची टीम झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेली होती. पहिलीच टेस्ट मॅच. झिम्बाब्वेनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आशिष नेहरा, झहीर खान आणि हरभजन सिंग या तरण्याताठ्या कार्यकर्त्यांनी खुंखार विषय केला. पहिला दिवस संपायच्या आतच झिम्बाब्वेचा १७३ रन्सवर ऑलआऊट केला.

आपली बॅटिंग कभी हा, कभी ना करत होती. पण आधी सचिन आणि मग द्रविड, समीर दिघे आणि भज्जी या तिघांनी किल्ला लढवला आणि भारतानं तीनशेपार झेंडा रोवला. दुसऱ्या इनिंगमध्ये झिम्बाब्वेची टॉप ऑर्डर धापा टाकत होती, असं वाटत होतं की यांनी पन्नास रनांचं लीड दिलं तरी डोक्यावरुन पाणी.

अँडी फ्लॉवरनं नेहमीप्रमाणं नांगर टाकला. तो म्हणजे झिम्बाब्वेचा सईद अन्वर होता… भारता विरुद्ध खेळणार म्हणजे खेळणार. मोठा फ्लॉवर आऊट होत नसला, की इतर कळ्या खुडायच्या आणि झिम्बाब्वेचा विषय क्लिअर करायचा असा नेहमीचा शिरस्ता. पण त्या दिवशी झालं भलतंच.

एक फ्लॉवर आऊट होत नव्हता, त्यात छोट्या फ्लॉवरनं पण नांगर टाकला. या फ्लॉवर ब्रदर्सच्या जोडीनं सहाव्या विकेटसाठी १०१ रन्स जोडले. आता १०१ रन्स काय लय मोठा स्कोअर नाही, पण टीम संकटात असताना ३४ ओव्हर्स खेळून काढणं काय सोपं नाही. ग्रँट फ्लॉवरनं २३० बॉलमध्ये ७१ रन्स केले. अँडी आऊट झाल्यानंतरही त्यानं टीमचा झेंडा पुढं नेला. शेवटी झिम्बाब्वेनं भारताला १८३ रन्सचं लीड दिलं. भले आपण मॅच जिंकलो, पण छोट्या फ्लॉवरनं आपल्याला दिलेलं टेन्शन आपण काय अजून विसरलो नाही.

२००४ मध्ये क्रिकेट बोर्डाशी झालेल्या वादावेळी ग्रँटनं बंड केलं आणि रिटायरमेंट जाहीर केली. पुढं २०१० मध्ये, तो पुन्हा आला पण पूर्वीसारखा करिष्मा दाखवू शकला नाही. आपला मोठा भाऊ आणि विकेटकिपर बॅटर असणाऱ्या अँडीच्या सावलीत धाकटा अष्टपैलू ग्रँट काहीसा झाकोळला गेला खरा… पण त्याची संयमी, प्रभावी बॅटिंग, झिम्बाब्वेच काय पण श्रीलंका आणि पाकिस्तानला केलेलं कोचिंग आणि राजबिंडं व्यक्तीमत्व अनेकांच्या लक्षात राहिलं!

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.