आता तरी ‘बालचित्रवाणी’ आठवतेय का ?

नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीचं एक भारी आहे. त्यांनी पत्रं, टेलिफोन, नोकिया मोबाईल फोन आणि आत्ताचा स्मार्टफोन हि सगळी फेज अनुभवली. म्हणजे काय कोरोनाकाळातली बाळं जेवताना सुद्धा मोबाईल लावून बसतात हे बघताना आपल्याला साधा फोन लावता यायचा नाही याच जाम टेन्शन होतं.

पण आधीच सांगितल्या प्रमाण एक भारी होत. आपली सकाळ रेडिओ वरच्या गाण्यांनी व्हायची. मऊ उबदार पांघरूणातून उठल्यावर शाळेला जायची आवराआवर सूर व्हायची. आईचा स्वैपाक नाष्टयाची गडबड असायची. पण एरवी आपला टीव्ही बघून बोटं मोडणारी आई सकाळी एक  कार्यक्रम बघायला आपल्याला हमखास बसवायची.

मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हमखास ओळखीचा एक आवाज ऐकू यायचा,

 मुलामुलांची मजे मजेची बालचित्रवाणी

आम्ही पाखरे आनंदाने गातो गंमत गाणी
बालचित्रवाणी

आणि उघडायचं एक वेगळंच विश्व. या पेटाऱ्यात गाणी असायची, गोष्टी असायच्या, हसत खेळत दिलेलं शिक्षण असायचं.  आपल्या वयाची लहान लहान मुलं टीव्हीवर आत्मविश्वासाने बागडताना दिसायची. मोठमोठी दिग्गज माणसं देखील आपल्या भाषेत, आपल्या पेक्षाही लहान होऊन गप्पा मारायचे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमधून १९८४ साली ‘बालचित्रवाणी’ची स्थापना झाली.

ज्यावेळी  संजय गांधींच्या मृत्यूनंतर राजकारणात राजीव गांधींची एंट्री झाली तेव्हा त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी भारतात आणायला भाग पाडलं. राजीव गांधींच्या आग्रहानुसारच भारतात संगणक धोरण, इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी, संचार क्रांती घडली. त्यांच्या आग्रहामुळेच भारतात आशियाई गेम्सच्या निमित्ताने कलर टीव्ही आले. 

टेक्नॉलॉजीचा वापर प्रत्येक ठिकाणी होण्यासाठी आग्रही असलेल्या राजीव गांधीनी उपग्रहाचा उपयोग शैक्षणिक कारणासाठी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु केले. 

विक्रम साराभाई यांच्या काळापासून सुरु असलेल्या इस्रोच्या साईट या प्रयोगाला खरी गती मिळाली ऐंशीच्या दशकात. भारताने स्वतःचा ऍप्पल हा उपग्रह सोडला होता आणि याचा वापर दूरदर्शनच्या माध्यमातून करायची कल्पना पुढे आली आणि बालचित्रवाणी स्थापन करण्यात आली.

अशा संस्था सुरू करणाऱ्या चार राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य मानले जात होते. १९८४ साली प्रथम मुंबई दूरदर्शनच्या वरळी येथील केंद्रातच बालचित्रवाणी स्थापन झाली. पण पुढच्या दोन वर्षात ती पुण्यात हलवण्यात आली. 

पुणे येथे हनुमान टेकडीच्या समोर बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालय, गोखले इकॉनॉमिक्स, भांडारकर इन्स्टिट्यूट या नामवंत संस्थांच्या परिसरातच बालचित्रवाणी स्थापन झाली. अगदी  सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या पासून ते प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर यांच्या पर्यंत अनेक थोर मंडळी बालचित्रवाणीच्या कित्येक भागात आपली उपस्थिती नोंदवून गेली. 

वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच महाराष्ट्रातील विविधतेने नटलेली संस्कृती ग्रामीण भागातील जगणं तिथले प्रश्न यांचीही देखील या बच्चेमंडळीना ओळख झाली. महाराष्ट्रातल्या कित्येक पिढ्या बालचित्रवाणी पाहत मोठ्या झाल्या. 

सर्वात महत्वाचं म्हणजे खेडोपाडच्या पोरांपर्यंत आधुनिक शिक्षण आणि शहरातील शिक्षणप्रणाली पोहचली. 

बालचित्रवाणी या संस्थेसाठी सुरुवातीच्या टप्प्यात पाच वर्षे केंद्राकडून आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने त्यासाठी २००२पर्यंत निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर केंद्राने हा निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारला कळवले होते. तत्कालीन राज्य सरकारने २००३मध्ये केंद्राकडे संस्थेविषयीची आपली भूमिका स्पष्ट करून, आर्थिक कारणास्तव ही संस्था चालवणे शक्य नसल्याचे कळवले होते. त्यानंतरच्या काळात या संस्थेला उतरती कळा लागली. 

या संस्थेत ३५ कर्मचारी कार्यरत होते. कोट्यवधींची सामुग्री, कॅमेरे याचाही बाजार उठला.

२०१४ सालापासून थकीत वेतन आणि समायोजनासाठी तेथील सुमारे ३२ कर्मचाऱ्यांना न्यायालयाची पायरी चढावी लागली होती. २०१२ पर्यंत शैक्षणिक कार्यक्रमांचे नि:शुल्क प्रक्षेपण करणाऱ्या दूरदर्शनने २०१४ नंतर असे प्रसारण थांबविले आणि १ जून २०१७ रोजी या ‘शैक्षणिक तंत्रज्ञान संस्कृतीचा कणा’ समजल्या जाणाऱ्या संस्थेने अखेरचा श्वास घेतला.

बालचित्रवाणीच्या ऐवजी ‘ई-बालभारती’ या नवीन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कोरोनाची कृपा म्हणा किंवा डिजिटल क्रांती सध्याची पिढी ऑनलाईन आली. शाळा ऑनलाईन, परीक्षा ऑनलाईन. खेळ सुद्धा ऑनलाईन. पण जवळपास डिजिटल क्रांती येण्याच्या अगोदर पण आपल्याला घरबसल्या शिक्षणाचा अनुभव दिला होता तो बालचित्रवाणीनेच.  

आता जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने प्रत्येक इयत्तेसाठी व प्रत्येक तुकडीसाठी एक चॅनेल सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. सरकार वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये जवळपास २०० टीव्ही चॅनेल सुरू होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशावेळी प्रश्न पडतो की मग बालचित्रवाणी का बंद पडली?

Leave A Reply

Your email address will not be published.