पेशव्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला इंग्रजांनी झाडाला बांधून जाळून ठार केलं…

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या धामधुमीचा काळ. बंडाचा वणवा देशभरात पेटला होता. ब्रिटिश सत्तेला हादरे देण्याचे काम या बंडकर्त्यानी केलं होतं. या उठावाचं नेतृत्व मात्र मराठी व्यक्ती करत होते. यात प्रामुख्याने नाव येत झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे.

नानासाहेब म्हणजे मराठा रियासतीचे शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे दत्तक पुत्र.

त्यांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ सालचा.त्यांच्या जन्मापूर्वीच बाजीराव युद्ध ऋण पुणे गमावून बसले होते. मराठ्यांची सत्ता संपुष्टात आल्यावर या पेशव्याला इंग्रजांनी ताब्यात घेतले आणि महाराष्ट्रापासून दूर बिठूर येथे रवानगी केली.

दुसरे बाजीराव पेशवे हे शिंदे होळकर यांच्याशी संधान बांधून ब्रिटिश सत्तेविरुद्ध योजना आखू नयेत यासाठी त्यांना बिठूर सोडण्यास परवानगी नव्हती. पेशव्यांनी तिथे दुसरा शनिवारवाडा बांधला आणि इंग्रजांनी दिलेल्या पेन्शनवर आपलं शेवटचं काळ व्यतीत केला.

बाजीराव पेशवे यांनी या भागात अनेक मंदिरे बांधली. गंगाकिनारी सुंदर घाट उभारले. त्यांनी तिथे चांगलेच ऐश्वर्य उपभोगले. इंग्रजांच्या तनख्याचा पैसा असाच खर्च करून टाकला. मात्र त्यांना एकच दुःख होते की हा वारसा चालवण्यासाठी पुत्र नाही. मुलगाच व्हावा म्हणून दुसऱ्या बाजीरावानी तब्बल ११ लग्ने केली. त्यांना दोन मुली होत्या.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील माधवराव भट हे देखील बिठूर येथे गेले होते. माधवराव भट यांच्या मुलाचे नाव धोंडोपंत उर्फ नानासाहेब. ७ जून १८२७ साली दूसऱ्या बाजीरावाने धोंडोपत या मुलाला दत्तक घेतले.

बाजीरावाच्या मृत्यूनंतर धोंडोपत म्हणजेच नानासाहेब बाजीराव हा पेशवा झाला. पण ब्रिटिशांनी हे दत्तक विधान मान्य करण्यास नकार दिला आणि दुसरे बाजीराव पेशवे यांना देत असलेली आठ लाखाची पेन्शन पुढच्या पिढयांना देण्यास नाकारली.

नानासाहेब पेशवे यांनी अनेक इंग्रज अधिकाऱ्यांची भेट घेतली, आपली बाजू मांडण्यासाठी अजीमुल्ला नावाच्या वकिलाला इंग्लंडला पाठवले पण काही उपयोग झाला नाही. ब्रिटिशांच्या या अन्यायातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी नानासाहेब पेशवे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला.

या नानासाहेब पेशवे यांना एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव नानासाहेबांच्या आईच्या नावावरून मैनावती असे ठेवले होते. नानासाहेब पेशवे यांच्या पत्नीचं अकाली निधन झालं होतं. आईविना वाढलेली हि मैनावती त्यांची प्रचंड लाडकी होती.

पेशव्यांच्या रीतीप्रमाणे लिहिणे, वाचणे, पत्रे तयार करणे इत्यादीचं तीच शिक्षण झालं. मैनावती जात्याच हुशार होती. आपल्या घराण्याची परंपरा आणि संस्कार याचे धडे तिने अगदी लहान वयातच  घेतले.

बिठूर येथे त्यांचा राहता वाडा ब्रिटिश कॅम्पच्या भागात होता. बाजीराव पेशवे हयात असल्याच्या वेळेपासून अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचा या वाड्यात राबता असायचा. मैनावती ही याच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मुलींसोबत वाढल्या. त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान होते असे म्हटले जाते. त्या कामचलाऊ इंग्रजी बोलायच्या देखील.

१८५७ साली जेव्हा उठावास सुरवात झाली तेव्हा पेशव्यांनी कानपुरवर विजय मिळवला. बंडातल्या शिपायांनी इंग्रजांचे कानपूर लुटले. बिबिका घर, सतीचौरा ही ठिकाणे जाळली. इंग्रज बायका व मुले यांना कैद केले. गोऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांच्या बायका पोरांनाही यमसदनी धाडण्याचा या शिपायांचा इरादा होता.

नानासाहेब पेशव्यांनी मात्र याला नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून युद्धात स्त्रियांच्या कत्तली करायच्या नाही, त्यांचा सन्मान करायचा ही मराठ्यांची परंपरा होती. त्यामुळे पेशव्यांनी सैनिकांना खलिता पाठवला की,

‘इंग्रज मुला-बायकांना सन्मानाने बिठूरला पोहोचवावे व त्यांची व्यवस्था आपण जातीने करू’

बिठूरला आलेल्या इंग्रजांच्या जनानखान्याचा नानासाहेब पेशवे यांनी दोन दिवस पाहुणचार केला. गोऱ्या अधिकाऱ्यांच्या कुटूंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या लेकीच्या मैनावतीच्या स्वाधीन केली होती. इतकेच नव्हे तर या कुटूंबकबिल्याला सुरक्षितपणे ब्रिटिश छावणीमध्ये पाठवण्याची जबाबदारी त्यांनी मैनावतीकडे दिली.

मैनावती पेशवे स्वतः या कुटूंबाच्या पाठवणीसाठी गेल्या. स्वतः पेशव्यांची लेक या प्रवासात होती म्हणून बंडकर्त्या सैनिकांनी इंग्रज कुटूंबानां त्रास दिला नाही. ते सुखरूपपणे आपल्या आश्रयस्थानी पोहचले. 

पण दुर्दैवाने दरम्यानच्या काळात सगळी परिस्थिती बदलून गेली. १८५७ च्या युद्धाचं पारडं पलटलं होतं.  उठावकर्त्या सैनिकांना हरवून इंग्रजांनी कानपुर वर विजय मिळवला. त्यांनी पुढचे लक्ष्य बिठूरला केले होते. इंग्रज येण्यापूर्वी नानासाहेब पेशवे यांना बिठूर सोडावे लागले.

मैनावती बिठूरला परतल्या तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. बिठूरला येऊन इंग्रजांनी पेशव्यांचा शनिवार वाडा लुटला. पेशवे कुटुंबातील फक्त मैनावती व नोकर चाकर वाडय़ात होते. मैनावती सोडून सर्व पळून गेले.

इंग्रज सेनापती थॉमस याने वाडा बेचिराख करण्याकरता त्यावर तोफा डागण्याचा हुकूम दिला. तोफांची हलवाहलव मैनावतीच्या कानी पडली. ती तडक वाडय़ाच्या बाहेर येऊन उभी राहिली. तिला तिथं उभी पाहताच इंग्रज सेनापती थॉमसला आश्चर्य वाटले. कारण वाडा लुटताना तिथे चिटपाखरूही आढळले नव्हते. तिला पाहता क्षणीच थॉमसने तिला ओळखले. मैनावतीने त्याला इंग्रजीत पण नम्रपणे विचारले.

‘‘ज्या वाडय़ाला आपण बेचिराख करायला निघाला आहात त्या वाडय़ाने आपले काय वाकडे केले आहे? तो तर आश्रयदाता आहे. जड आहे. त्याने आपला असा कोणता अपराध केला आहे? ’’

थॉमसने उत्तर दिले, की वाडा न जाळण्याची परवानगी मला व्हाईस रॉयकडून तार करून मागवावी लागेल. त्यांनी परवानगी दिली तर वाडा जाळणार नाही.

तार लंडनला पोहोचली. लॉर्ड सभेत चर्चा झाली. त्यातील काही जणांनी अंदाज केला की थॉमस हा मैनावतीच्या प्रेमात पडला आहे म्हणून तो वाद पाडत नाही आहे. इंग्लंडवरून आदेश देण्यात आले की पेशव्याच्या पोरींकडून नानासाहेबांचा पत्ता विचारून घेणे जर ती सांगत नसेल तर तिला मृत्यूची शिक्षा देणे.

मैनावतीने विद्रोही सैनिकांच्या पासून इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवले होते. तरीही कंपनी सरकारने तिच्या बद्दल दयामाया दाखवली नाही. थॉमसच्या मुलीने तिच्या बाजूने बोलायचं प्रयत्न केला पण कोणीही तिच्या कडे लक्ष दिलं नाही.

पेशव्यांचा बिठूरमधला वाडा पाडण्यात आला. तिथे खजिना शोध बराच काळ चालला. मैनावतीला बंदिवासात ठेवले, नानासाहेबांचा पत्ता शोधण्यासाठी तिला बरेच छळले. अखेर कानपूरच्या कमिशनरने तिला मृत्यू दंडाची शिक्षा दिली.

पेशव्यांच्या मुलीला झाडावर बांधून पेटवून देण्यात आले. हा भीषण प्रसंग बघण्याकरता अख्ख कानपूर लोटलं होतं. दहशत बसवण्यासाठी मुद्दामहून केलेली हि कृती होती. शहरवासीयांस मुद्दाम हजर राहण्यास सांगितले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समर मध्ये हुतात्मा होणाऱ्यांमध्ये या १४ वर्षांच्या निष्पाप पोरीचा देखील समावेश झाला.

संदर्भ-कर्तव्यकठोर, शूर मैनावती पेशवे डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.