१९३५ ला फर्ग्युसनवर विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा फडकवला आणि पुण्यात राष्ट्रवाद जागा झाला

पुण्याला क्रांतिकारकांचा मोठा वारसा लाभला आहे. शिवरायांचा वारसा लाभलेल्या या गावात अन्यायी सत्तेच्या विरोधात बंड उभारण्याची परंपरा जुनी आहे. मग ते उमाजी नाईक असोत वासुदेव बळवंत फडके असोत  ब्रिटीशांविरुद्धची पहिली सशस्त्र क्रांतिकारी चळवळ इथेच सुरु झाली. पुढे टिळकांच्या प्रेरणेतून चाफेकर, सावरकर असे क्रांतिकारी घडले. अशीच एक घटना पुण्याच्या राष्ट्रवादाच्या सुरुवातीची.

१९३५ हे वर्ष फर्ग्युसन महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. २१ एप्रिल १९३५ रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर डॉ. चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या अध्यक्षतेखाली पहिला कार्यक्रम झालेला होता. जवळ जवळ एक हजार विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात चांगली झालेली होती.

या कार्यक्रमाप्रमाणेच वार्षिक स्नेहसंमेलनाची देखील जोरदार तयारी सुरू होती. परंतु प्रत्यक्ष वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी ब्रिटिश ध्वजावरून झालेला गोंधळ व त्याची दैनिक लोकशक्तीमध्ये छापून आलेली बातमी यामुळे येथील कार्यक्रमास वेगळीच कलाटणी मिळालेली होती.

पुणे शहरातील २९१, शनिवार पेठ, येथून राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाच्या नेतृत्वाखाली दैनिक लोकशक्तीचा अंक प्रकाशित होत होता. त्याचे संपादक शंकर दत्तात्रेय जावडेकर होते. ह्या दैनिकातील लेखन राष्ट्रवादी विचारसरणीवर अधारलेले होते. शं. द. जावडेकर यांच्यासारख्या अनेकांनी लोकशक्तीमध्ये लेखन केलेले होते त्यामुळे ते थोड्याच दिवसांत पुण्यातील बुद्धिवादी लोकांमध्ये लोकप्रिय झालेले होते.

वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणाऱ्या सभागृहातील व्यासपीठाच्या एका बाजूस ब्रिटिश ध्वज ठेवण्यात आलेला होता. हा प्रकार तेथील विद्यार्थ्यांना आवडलेला नव्हता. तेथील विद्यार्थ्यांनी तो ध्वज काढून घेण्याचे प्राचार्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागणीवरून तो ध्वज खाली ठेवून व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंस भारताचा ध्वज फडकविण्यात आला.

सदर ध्वज प्रकरणाची बातमी २३ सप्टेंबर १९३५ च्या दैनिक लोकशक्तीमध्ये छापली गेली. या बातमीने ब्रिटिश ध्वजाची नाचक्की झालेली होती. त्यामुळे तत्काळ पुण्यातील पब्लिक इन्स्ट्रक्शन कार्यालयाचे डायरेक्टर ग्रीव इसक्वेअरने मुंबईतील शिक्षण विभागाच्या सचिवास पाठविलेल्या पत्रातून प्राचार्य महाजनींवर काही आरोप केले होते. पुढे स्वतः प्राचार्यांनी ग्रीवला पत्र पाठवून आरोपांचे खंडन केले. 

प्राचार्यांनी संपादकास विनंती करून ३० जुलैच्या अंकात आपले मत मांडण्याची परवानगी घेतली. त्यानुसार ३० जुलैच्या अंकात प्राचार्य ग. स. महाजनींचे मत पुढीलप्रमाणे होते.

“मी ब्रिटिशांचा ध्वज हलविला नाही. त्या ध्वजाचा आदर ठेवून उंच ठिकाणी लावण्यास सांगितले होते. या संदर्भाचा पुरावा हवा असेल तर त्या विद्यार्थ्यांचा पुरावा उपलब्ध करून देऊ शकतो. अध्यक्षांच्या भाषणाआगोदर सभागृहात काहीसा गोंधळ झालेला होता. त्यावेळी तो ध्वज एखाद्या उंच ठिकाणी ठेवण्यास सांगितले होते. परंतु कोणीतरी तो खालच्या बाजूस ठेवला. माझ्या लक्षात आल्याबरोबर तो उंच ठिकाणी ठेवण्यास सांगितले होते. “

प्राचार्यांनी असे जरी मत दिले असले तरी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील राष्ट्रवाद जागा झाल्यामुळे तो ब्रिटिश ध्वज इतर ठिकाणी ठेवावा लागला होता हे सत्य होते.

आजही फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या आठवणी राष्ट्रप्रेमाच्या भावना जागृत करण्याचं काम करत आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.