पुणे विद्यापीठातल्या ABVP च्या आंदोलनात थायलंडची पोरगी काय करत होती?

देशभर नागरिकता सुधारणा कायद्याबद्दल चर्चा सुरु आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्तावर उतरून आंदोलने करत आहेत. सोशल मिडियापासून प्रत्येक ठिकाणी या कायद्याबद्दल प्रचंड वाद विवाद होत आहेत. आज पर्यंत भारतात असे कधीच पाहायला मिळाले नव्हते एवढे या कायद्याचा उहापोह सुरु आहे.

दोन्ही बाजू आक्रमक झाल्या आहेत आणि आपल्या पाठीशी बहुसंख्य लोक उभे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातून काही ठिकाणी या आंदोलनामध्ये हास्यास्पद प्रसंग घडताना आढळून येत आहे.

नुकताच ५०० विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. विद्यापीठातील अनिकेत कँटीनपासून हा मोर्चा निघाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या मोर्चाचे आयोजन केले होते. त्यात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. हातात मशाल, भगवे झेंडे, तिरंगा घेऊन या कार्यकर्त्यांनी नारे देत मोर्चा काढला.

यावेळी या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की गुंड मवाली अतिरेकी आंदोलनाच्या नावाखाली देशभर दंगे भडकवत आहेत तर नागरिकता कायद्याच्या बाजूने देखील जनता आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. संसदेतील लढाई तर जिंकली आता रस्त्यावरची लढाईसुद्धा जिंकून दाखवू.

या मोर्चावेळी एकमुलगी हातात CAA आणि NRC च्या समर्थनार्थ घोषणा देणारे पोस्टर घेऊन सगळ्यात अग्रभागी चालत होती.

तिच्या दिसण्यावरून अनेकांना गैरसमज झाला की नॉर्थइस्ट राज्यातील ही मुलगी नागरिकता कायद्याच्या बाजूने आंदोलन करत आहे. सध्या ईशान्य भारतमधील अनेक राज्यात या कायद्याच्या विरुद्ध जोरदार प्रदर्शने होत आहेत असे मिडीयावर चित्र आहे अशावेळी या मुलीचे एबीव्हीपीच्या आंदोलनात सहभागी होणे हे विशेष मानल जात होतं.

म्हणूनच त्या मुलीला तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या वतीने काही प्रश्न विचारण्यात आले, पण यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. ती मुलगी थायलंडची होती आणि तिला या आंदोलनाबद्दल काहीच ठाऊक नाही. मग ती या आंदोलनात कशी आली हा प्रश्न विचारण्यात आला, तर तिचं उत्तर होतं की,

“मी विद्यापीठात फिलोसॉफीमध्ये मास्टर्स करत आहे. हे माझे फर्स्ट इयर आहे. मला हे आंदोलन कशाबद्दल आहे याची काहीच कल्पना नाही.”

 कुठल्यातरी आंदोलनकर्त्यांने सहज तिच्या हातात पोस्टर देऊन मोर्चामध्ये पुढे उभा केलं होतं. जेव्हा ऑर्गनायझरनां हे लक्षात आले तेव्हा त्यांनी तिला आंदोलनातून बाहेर जाण्यास सांगितले.

या प्रकारामुळे चर्चा सुरु झाली आहे की आपली आंदोलने यशस्वी आहे हे दिसावं म्हणून ज्यांचा या आंदोलनाशी संबंध नाही अशानाही यात सहभागी करून घेतल जात आहे का? हा प्रकार दोन्ही बाजूनी होत असलेला आढळून येतो. मात्र या प्रकारामुळे आंदोलने हिंसक होऊन हाताबाहेर गेली तर जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातोय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.