एकामागून एक पुरातन वास्तू मायदेशी परत येतायेत यामागे इंडिया प्राईड प्रोजेक्टचा वाटाय

कोणत्याही देशाचा इतिहास त्या देशाची खरी कहाणी सांगत असतो. जितका समृद्ध इतिहास तितकं समृद्ध राष्ट्र म्हणून जग संबंधित देशाकडे बघत असतो. हा इतिहास समजतो तो त्याच्या मागे पडलेल्या  पाऊलखुणांमधून. म्हणजेच पुरातन वास्तू, कलाकृतींमधून. जितके जुने संदर्भ तितका बलशाली आणि समृद्ध देश, असं एकंदरीत समीकरण असतं.

भारत तर यामध्ये बराच श्रीमंत दिसतो. कारण फक्त एकच नाही तर अनेक संस्कृतींचा इतिहास भारताला लाभला आहे. जैन, बौद्ध, हिंदू अशा धर्मांच्या पौराणिक वास्तूंचा त्यात वाटा आहे. मात्र यातील बऱ्याच मूल्यवान गोष्टी परदेशीयांनी लुटून नेल्या. त्याच परत आणण्यासाठी सध्या भारत सरकार जीवाचं रान करत असल्याचं दिसतंय. 

आज ऑस्ट्रेलियानं असंच एक ऐतिहासिक पाऊल टाकलंय. ऑस्ट्रेलियाने २९ पुरातन वास्तू भारताला परत केल्या आहेत. यांचं वर्गीकरण सहा मोठ्या श्रेणींमध्ये करण्यात येतंय. भगवान शिव आणि त्यांचे शिष्य, शक्ती, भगवान विष्णू आणि त्यांची रूपं, जैन परंपरा, चित्रे आणि सजावटींच्या वस्तू यांचा त्यात समावेश आहे. या पुरातन वास्तू वेगवेगळ्या कालखंडातील आहेत, ज्या ९-१० शतकं इसवी सन पूर्वीच्या आहेत.

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील अशा भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील या वास्तू असून त्या लुटून नेण्यात आल्या होत्या. 

 

या सगळ्या वास्तू भारताला परत केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे धन्यवाद मानले आहेत. मात्र ही काही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा एखाद्या देशाने भारताला वास्तू परत केल्या आहेत. तर…

हे सगळं शक्य होतंय ‘द इंडिया प्राईड प्रोजेक्ट’मुळे.

इंडिया प्राइड प्रोजेक्ट (IPP) म्हणजे जगभरातील कलाप्रेमींचा एक गट आहे. भारतातून चोरलेल्या कलाकृती ओळखून त्यांना परत मिळवणं हा या गटाचा उद्देश्य आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर ते करतात.

२०१४ मध्ये कलाप्रेमी एस. विजय कुमार यांनी हा गट स्थापन केला.

कुमार यांना त्यांच्या आजीमुळे इतिहासाची आवड निर्माण झाली होती. त्यांची आई त्यांना अनेक ऐतिहासिक पुस्तकं वाचायला द्यायची. त्यातूनच त्यांचा भारतीय पुरातन संस्कृतीबद्दल अभ्यास सुरु झाला.

तसं करिअरच्या दृष्टीने एका शिपिंग कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून ते काम करत होते. मात्र इतिहासाची आवड स्वस्त बसू देत नसल्याने त्यांनी करिअर सोबतच ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी २००२ मध्ये भारतभर प्रवास सुरु केला.

भारतीय मंदिर कला समजून घेण्यासाठी त्यांनी प्रवास सुरु केला होता. मात्र त्यांचं ज्ञान त्यांनी शेअर करावं, असा सल्ला त्यांच्या मित्रांनी दिला. त्यानुसार त्यांनी ‘पोएटरी इन स्टोन’ नावाने इंग्लिश आणि तामिळ भाषेतील ब्लॉग सुरु केला. या ब्लॉगमुळे त्यांना त्यांच्यासारखे समविचारी लोक भेटत गेले. त्यांनी मिळून गट अभ्यास सुरु केला. वेगवेगळ्या साईट्सला भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, अनेक शिल्प, वास्तू आहेत ज्यांची नोंदणी तर पुरातत्व विभागाकडे आहे मात्र त्या भारतातून हरवलेल्या आहेत. 

तेव्हा सुरु झाला त्यांचा हरवलेल्या पुरातन वास्तू शोधण्याचा प्रवास… 

WhatsApp Image 2022 03 21 at 6.19.06 PM

इंडिया प्राईड गटात सगळे हौशी कलाप्रेमी कार्यकर्ते आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून असा हरवलेला, लुटून नेलेला भारतीय पुरातन खजिना शोधतात आणि त्यांना परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करतात. 

याच गटाच्या कार्यामुळे बिहारच्या संग्रहालयातून चोरलेली १२ व्या शतकातील बुद्धाची मूर्ती युकेकडून परत मिळवणं आणि ऑस्ट्रेलिया नॅशनल गॅलरीला विकलेली तामिळनाडूतील बृहदीश्वर मंदिरातील ९०० वर्ष जुनी नटराजन मूर्ती परत भारतात आणण्यास मदत झाली आहे. 

याच प्रोजेक्टच्या मदतीने ऑस्ट्रेलियातून आज २९ पुरातन वास्तू भारतात आणण्यासाठी सरकारला मदत झाली आहे. तर याआधी देखील अमेरिकेतून अशा वास्तू आणण्यात त्यांनी मदत केली होती.

सप्टेंबर २०२१ मध्ये अमेरिकेने १५७ पुरातन कलाकृती आणि वास्तू भारताला परत केल्या होत्या. या वास्तू मुख्यतः ११ ते १४ व्या शतकातील होत्या. तर जवळपास ४५ वास्तू बिफोर कॉमन इराच्या होत्या. त्यातील जवळपास अर्ध्या म्हणजेच ७१ कलाकृती सांस्कृतिक होत्या. तर उर्वरीत अर्ध्यांमध्ये हिंदू धर्माच्या ६०, बौद्ध धर्माच्या १६ आणि जैन धर्माच्या ९ कलाकृती होत्या.

लक्ष्मी-नारायण, शिव-पार्वती,  बुद्ध, २४ जैन तीर्थंकरांच्या सुप्रसिद्ध आसनांच्या सुशोभित मूर्ती, अनामिक देवी-देवतांच्या मूर्तींसहित इतर वास्तूंचा समावेश होता.

तर केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाच्या माहितीनुसार, मार्च २०२१ पर्यंत भारतीय पुरातत्व खात्याला परदेशात गेलेल्या भारताच्या तब्बल ३६ वास्तू परत मिळवण्यात यश आलं होतं. ज्यामध्ये राम, सीता, लक्ष्मण यांच्या धातूच्या मूर्ती, नटराज यांचे दगडी शिल्प, ब्रह्मा आणि ब्राह्मणी यांची दगडी शिल्पे, बोधिसत्वाचे मस्तक, एक नटराज, धातूची गणेशमूर्ती आणि चोल काळातील श्रीदेवी कलाकृती यांचा समावेश होता. आता त्यात अजूनच भर पडली आहे.

या वस्तू चोरी, बेकायदेशीर व्यापार, तस्करी करत भारतातील वेगवेगळ्या भागांतून पळवण्यात आल्या होत्या.

भारताचं वैभव परत आणण्यासाठी शासनाने आणि इंडिया प्राईड ग्रुपने सुरु केलेला हा उपक्रम खरंच वाखाणण्याजोगाच आहे..!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.