हा आहे महाराष्ट्रातला पहिला बार…

या ठिकाणी संध्याकाळ झालेली आहे. काम करुन, बॉस किंवा बायकोच्या शिव्या खाऊन दुनिया कंटाळलेली आहे. आपली कितीही इच्छा असली, तरी जगबुडी काय येणार नाही आणि आपली दुनियादारूच्या…  सॉरी सॉरी दुनियादारीच्या चक्रातून सुटका काय होणार नाही.

आजचा दिवस आपण कसाबसा ढकललाय, उद्याचाही ढकलाचाय… या ढकलाढकली दरम्यान निव्वळ उत्साह येण्यासाठी पोटात द्रव्य ढकलणंही तितकंच गरजेचं आहे.

आमच्या डोक्यात पाण्याचा विषय सुरू होता, पण मेजॉरिटी दारूला असते म्हणून आपण दारुबद्दल बोलू.

विकेंडला घरात बसलो (ही स्कीम सगळ्यांना लागू पडत नाय) तरी चालून जातं, पण आठवड्याच्या दिवसात मात्र, बसायचं का? असं म्हणलं… की ‘कुठल्या बारला?’ हा प्रश्न येतो. काहीकाही जण पट्टीचे पिणारे असतात, चावी न देताही त्यांची पावलं ठरलेल्या बारला, ठरलेल्या टेबलला जाऊन पोचतात. ठरलेला वेटर ठरलेली ऑर्डर आणि चखणा घेऊन येतो आणि ठरलेला कार्यक्रम सुरू होतो.

या समस्त भिडूंच्या बारव्रता विषयी आम्हाला प्रचंड रिस्पेक्ट आहे, पण जिंदगीत काय चेंज पाहिजे का नको?

तुमच्या बारबदलासाठी आम्ही पाऊल उचलायचं ठरवलं आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिल्या बारबद्दल सांगायचंही. म्हणजे कसं ऐतिहासिक ठिकाणी बसायचा फील येईल आणि आपल्या दारू विषयक प्रेमावर इतिहासाचा शिक्का बसेल.

लय पल्हाळ लावलं की खंबा संपेपर्यंत उतरते, असं एक भिडू सांगत होता. त्यामुळं आता मुद्द्याकडं येऊ-

महाराष्ट्रातला पहिला बार कुठंय? तर मुंबईत. आय नो, मुंबई फार ह्यूज आहे… फॉर दॅट मॅटर, एक्झॅट लोकेशन सांगायचं झालं, तर हॉटेल ताज महल पॅलेसमध्ये. कळलं का आमची भाषा का बदलली..? कारण भिडू ताज हॉटेल ए, साधा विषय नाही.

गेटवे ऑफ इंडियाच्या एकदम समोर अगदी थाटात उभं असलेलं ताज हॉटेल म्हणजे सगळ्या भारताची शान. हे हॉटेल सुरू झालं, १९०३ साली. गेल्या ११९ वर्षांत आपल्या आजूबाजूची दुनिया लय मोठ्या प्रमाणात बदलली, पण ताज हॉटेलचा दिमाख सरती वर्ष सोडा दहशतवादी हल्लाही मोडू शकला नाय.

याच ताजमध्ये १९३३ मध्ये क्रांती झाली, म्हणजे असं सूर्यबिर्य नाय उगवला.

तर एक बार सुरू झाला, त्याचं नाव हार्बर बार. 

महाराष्ट्रातला सगळ्यात जुना लायसन्स असलेला बार. आता तशी आणखी एक थेअरी सांगितली जाते, ती म्हणजे कॅफे लिओपोल्ड हा सगळ्यात जुना बार ए. पण लिओपोल्ड आधी कॅफे अँड स्टोअर्स होतं. तर हार्बर बार मात्र पहिल्यापासून ‘बार.’

आता हा बार आहे कसा?

आम्ही कधी गेलो नाय, पण फोटोत तर लय भारी दिसतो. म्हणजे एकदम लॅव्हिश. असं मऊ मऊ गादी असलेले सोफे, पिक्चरमध्ये दाखवतात तसलं लाकडाचं फ्लोअरिंग, अगदी नाद खुर्च्या आणि याचा अर्थ काय होतो असा प्रश्न विचारायला लावणारे पेंटिंग्स. अगदी रॉयल कारभार.

एवढा भारी बार आहे, तर तिथं जाऊन काय मागवायचं?

तुमच्या डोक्यात जर नेहमीचीच ऑर्डर आली असेल, तर जरा थांबा. तिकडं जाऊन जर एक ओल्ड मंक निप मागणार असाल, तुमचा मामा होईल. कारण इथं ओल्ड मंक मिळत नाय. निम्म्या जनतेचा मूड गेला असणार, कारण बारला बसायचं आणि ओल्ड मंक नाही, म्हणजे एफसी रोडला जाऊन हिरवळ न पाहण्यासारखं.

पण कसंय आपण पण कधीकधी एफसी रोड सोडून कॅम्प किंवा कोरेगाव पार्कमध्ये जातो, अगदी तसंच.

 इथं गेल्यावर भारी भारी गोष्टी मागवायच्या म्हणजे कसं, तर २६ वर्ष जुनी ग्लेनफिच, ३० वर्ष जुनी बॅलेंटाईन, हिबिकी जॅपनीज हार्मनी अशा स्कॉच, सिंगल माल्ट व्हिस्की असं कायतर मागवायचं. 

जॉनी वॉकर, चिवास रिगल, जॅक डॅनियल्स अशा ओळखीतल्या बाटल्याही इथं मिळतात. एक मात्र आहे, इथं जाताना पाकीट तेवढं पॉवरफुल पाहिजे कारण ३० वर्ष जुन्या बॅलेंटाईनच्या 30 चा पेग इथं पाच हजारालाय. लईच चिपमध्ये उरकायचं ठरवलं, तर किंगफिशर अल्ट्रा, बिरा व्हाईट अशा बिअर इथं ५०० रुपयाला मिळतात.

सोबत चकण्याला शेंगदाणे खायचं ठरवलंत, तर आणखी ५०० जाणार. शेंगदाणे??? ५०० रुपयाला??? बिकॉज दिस बार इज लोकेटेड इन हॉटेल ताज ब्रो.

इथं कधी जाणं झालंच, म्हणजे व्हावं असा आमचा आशीर्वाद आहे. तर ‘From The Harbour since 1933’ नावाचं त्यांची स्पेशालिटी असलेलं कॉकटेल नक्की ट्राय करा. 

कारण या कॉकटेलला इतिहास आहे. असं सांगतात की, दोन अमेरिकन खलाशी आनंद साजरा करण्यासाठी हार्बरमध्ये आले आणि तिथल्या बारटेंडरला म्हणाले, ‘आमच्या फ्यूजा उडतील असलं कायतर बनवून दे.’ बारटेंडरनं जे दिलं, तेच हे कॉकटेल. यात पीच, पायनॅपल आणि क्रॅनबेरी ज्यूसमध्ये आधी जीन आणि बर्फ मिक्स केला जातो. त्यानंतर ब्रँडी आणि ग्रीन शार्तरेझ टाकून आग लावली जाते.

 हे बघून तुम्ही हसत हसत १०५० रुपये देताय.

थोडक्यात काय, तर महाराष्ट्रातला पहिला बार म्हणजे अगदी रॉयल कारभार आहे. जिथं तुमच्या दारूच्या पैशांपेक्षा एक्सपिरीयन्सचे पैशे जास्त आहेत. आता दारू प्यायला आमचं शून्य टक्के प्रोत्साहन असलं, तरी प्रत्येक मराठी माणसानं इथं भेट दिली पाहिजे.

कारण हा महाराष्ट्रातला पहिला बार ए, इथं आपण चिअर्स नाय करणार तर कोण? अजून कुठला ऐतिहासिक बार हुडकायचा झाला, तर आम्हाला सांगा… एकमेका साहाय्य करु… पण रस्ता कुठला धरायचा ते आपलं आपण ठरवू…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.