१४ वर्षाचा मुलगा ज्याला १० मिनिटांत मृत्युदंड दिला आणि ७० वर्षांनी तो निर्दोष असल्याचं समजलं

खोलीत सगळीकडे काळोख होता. फक्त एकाच कोपऱ्यात लाईटचा फोकस होता. त्या दिव्याखाली एक खुर्ची होती. खुर्चीवर एक लहान मुलगा बसलेला होता. त्याची अवस्था इतकी भयानक होती की बघणार्यालाही थरकाप सुटेल. खुर्चीसाठी ते पोर खूपच लहान होत. तरी त्याचे हात, पाय कसून बांधण्यात आले होते. अक्ख शरिर पट्ट्यांची जखडलेलं होतं. खुर्चीत फिट बसण्यासाठी त्याला बायबलवर बसवण्यात आलं होतं. तो घामाघूम होता, घाबरलेला होता, रडत होता. आपल्यासोबत काही तरी अघटित घडणार याची भीती त्याच्या डोळ्यात जाणवत होती.

अशात एक धिप्पाड माणूस तिथे आला. दगडाच्या काळजाचा असावा तो. येताच त्याने पोराचा आवाज बंद करण्यासाठी त्याच्या तोंडावर पट्टी बांधली आणि डोक्यावर एक अशी टोपी ठेवली ज्याला इलेक्ट्रिक वायर होत्या. तेव्हा गणित स्पष्ट झालं. ती खुर्ची सुद्धा साधी सुधी नव्हती तर विजेची म्हणजेच इलेक्ट्रिक होती. त्याला इलेक्ट्रिक झटके देण्यात येणार होते म्हणून हा सगळा खटाटोप होता. 

अन् बघता बघता जल्लादाने बटण दाबलं. २४०० व्होल्टचे झटके देऊन त्या मुलाला मारून टाकण्यात आलं.

का? कारण तो ‘गुन्हेगार नव्हता’

WhatsApp Image 2022 04 15 at 7.41.24 PM

घटना आहे १९०० च्या शतकातली आणि त्या मुलाचं नाव ‘जॉर्ज स्टिनी’. वय फक्त १४ वर्ष.

फक्त १४ वर्षाच्या पोराला मृत्यूची शिक्षा दिली जाते, हे ऐकूनच जरा विचित्र वाटतं नई? पण असं जगाच्या इतिहासात झालंय. जितक्या काळ्या आणि अन्यायकारक घटना जगात नोंदवल्या गेल्या आहेत, त्यातील अग्रगण्य नाव जर काढलं तर त्यात येईल ‘जॉर्ज स्टिनी हत्याकांड’. 

मार्च १९४४ मध्ये, पोलिस दक्षिण कॅलिफोर्नियाच्या अल्कोलू भागात जॉर्जला अटक करण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी त्याचे आई-वडील घरी नव्हते. पोलिसांच्या धापधाप पायांचा आवाज ऐकून आणि त्याच्या जोरात आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये शिरताना बघून जॉर्जची धाकटी बहीण कॅथरीन  कोंबड्यांच्या खुरटयाजवळ लपून बसली होती. धाडकन पोलीस घरात घुसले आणि जॉर्ज आणि त्याच्या मोठ्या भावाला जॉनला हातकड्यांसहित घरातून बाहेर काढलं. 

जॉनला सोडण्यात आलं मात्र जॉर्ज ताब्यातच ठेवलं.

का अटक करण्यात आली होती, याच कारण होतं २३ मार्च १९४४ हा दिवस.

जॉर्ज आपली बहीण कॅथरीनबरोबर घराबाहेर उभा होता. त्यावेळी ११ वर्षांची ‘बेट्टी जून बिनीकर’ आणि ८ वर्षांची ‘मेरी एमा थॉमस’ या दोन मुली अल्कोलूमध्ये सायकलवरून फुलांचा शोध घेत होत्या. फुल शोधत असताना त्यांनी जॉर्ज आणि त्याची बहीण कॅथरीन यांना बघितलं आणि थांबल्या. त्यांनी त्या फुलाबद्दल विचारले. मायपॉप्स असं त्या फुलाचं नाव. जॉर्ज माहित होतं म्हणून तो त्या मुलींच्या मदतीसाठी सोबत गेला. नंतर तो घरी परतला, पण दोन्ही मुली गायब झाल्या.

मुलींच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला होता. शोधात कळलं की त्या दोघी जॉर्जबरोबर शेवटच्या वेळी दिसल्या होत्या. अशा परिस्थितीत मुलींचे कुटुंबीय जॉर्जच्या वडिलांकडे आले. तेव्हा जॉर्जचे वडील देखील आसपासच्या परिसरात मुलींचा शोध घेण्यासाठी मदत करू लागले. पोरी काही केल्या सापडत नव्हत्या.

त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सापडल्या. रेल्वे रुळाजवळ चिखलात दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. दोघांच्याही डोक्याला खोलवर जखम झाली होती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. 

WhatsApp Image 2022 04 15 at 7.32.48 PM

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयावरून जॉर्जला ताब्यात घेऊन चौकशी केली. केवळ २ तास त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता, किंवा कोणताही साक्षीदारही नव्हता. मात्र रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना या हत्येचा दोष कुणावर तरी टाकावा लागला आणि त्यांनी जॉर्जला बळीचा बकरा बनला. 

जॉर्जवरील अन्यायाला सुरुवात…

पोलिसांनी सांगितले की, जॉर्जने आपला गुन्हा कबूल केला होता आणि सांगितले की त्याला ११ वर्षीय बेट्टीशी लैंगिक संबंध ठेवायचे होते, ज्याने नकार दिल्यावर त्याने दोघांनाही ठार मारले. 

पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या लेखी निवेदनावर जॉर्जची सही नव्हती. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. जॉर्जला नंतर सुमारे तीन महिने कोलंबियन तुरुंगात ठेवण्यात आलं.

WhatsApp Image 2022 04 15 at 7.33.00 PM

जॉर्जची केस ऐकण्यासाठी ज्युरीची स्थापना करण्यात आली होती आणि तीही अवघ्या एका दिवसात. कोर्टाच्या वतीने जॉर्जच्या बचावासाठी वकील चार्ल्स प्लोडॉन यांना स्थान देण्यात आले. ज्यांनी जॉर्जच्या बचावात एकच युक्तिवाद केला की, त्याला प्रौढासारखी वागणूक दिली जाऊ नये. पण त्यावेळी अमेरिकेत एका १४ वर्षांच्या तरुणाला प्रौढ मानलं जात होतं, त्यामुळे चार्ल्सचा युक्तिवाद फेटाळण्यात आला.

या प्रकरणात जॉर्जविरुद्ध तीन साक्षीदार तयार करण्यात आले होते, त्यापैकी एक साक्षीदार होता ज्याने मुलींचे मृतदेह शोधले होते. दुसरे दोन डॉक्टर होते ज्यांनी दोन्ही मुलींचे पोस्टमॉर्टम केले होते. पोस्टमॉर्टममध्ये दोन्ही मुलींवर बलात्कार झाला नसल्याचं सिद्ध झालं होतं. तर जॉर्जच्या वकिलाला एकही साक्षीदार कोर्टात सादर करता आला नाही.

या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉर्जच्या प्रश्नांची उलट तपासणीही घेण्यात आली नव्हती किंवा त्याला त्याच्या बचावासाठी बोलण्याची संधीही देण्यात आली नव्हती. या खटल्याची सुनावणी सुमारे अडीच तास चालली आणि अवघ्या १० मिनिटांत कोर्टाने त्याला दोषी ठरवत मृत्यूची शिक्षा सुनावली. जॉर्ज स्वत:ला निर्दोष म्हणवत असला, तरी ते सिद्ध करण्याची संधी त्याला देण्यात आली नव्हती.

त्या काळात लोकांना विद्युत खुर्चीने मृत्युदंड दिला जात होता म्हणून अशा परिस्थितीत जॉर्जलाही विजेच्या खुर्चीला बांधून ठेवण्यात आले होते. असं म्हणतात, त्याची हाईट पुरत नसल्याने त्याला बायबलवर बसवण्यात आलं. पुरोहिताने त्याच्यासाठी शेवटची प्रार्थना करताच त्याच्या पार्थिवाला २४०० व्होल्टचा शॉक देण्यात आला. 

त्याचं चेहऱ्यावरून मास्क निघालं, एक हात बेल्टमधून सुटला. तो मुलगा कापलेल्या कोंबडीसारखा फडफडत होता. काही क्षणातच तो शांत झाला. आत्मा देह सोडून गेला होता. तिथे उपस्थित असलेल्यांनी इतिहासातील सर्वात लहान गुन्हेगाराला (?) मारताना बघितलं होतं.

निर्दोष जॉर्जला व्यवस्थेनं ठार केलं होतं. प्रश्न होता का?

यासगळ्याचं गणित होतं ‘श्वेत आणि कृष्ण वर्ण’

जॉर्ज स्टिनी आफ्रिकन-अमेरिकन म्हणजेच ‘काळा’ होता.  तर त्या हत्या झालेल्या दोन्ही मुली ‘गोऱ्या’ होत्या.  त्याकाळी गोरे लोक रंगांच्या आधारे कृष्णवर्णीयांशी भेदभाव करत होते. खूप दहशत होती. इतकी की तीन महिने जॉर्ज जेलमध्ये जेलमध्ये असताना त्याच्या पालकांना त्याला भेटता आलं नाही. याचं कारण होतं ‘भीती’. 

घरातून गेला तसा आई-वडिलांना न भेटलेला जॉर्ज त्यांना न भेटतात मेला कारण त्याचे पालक त्याला भेटायला आलेच नाही. त्यांना घरातून निघायची भीती वाटत होती कारण तेव्हा हा मुद्दा असा काय तापला होता की, ते बाहेर पडले असते तर गोऱ्या समूहाकडून मारले जाण्याची दाट शक्यता होती.

तर याच गोष्टीमुळे जॉर्जला डायरेक्ट मृत्युदंड देण्यात आला होता. कारण तो काळा होता आणि ज्या मुलींच्या मृत्यूसाठी तो अडकला होता (?) त्या गोऱ्या होत्या. निर्णय एकतर्फी होता कारण  सगळी व्यवस्था पांढऱ्या लोकांची होती. जॉर्जला अटक करणारे पोलीस गोरे, त्याचा खटला लढणारे वकील गोरे आणि न्याय देणारे जज गोरेच! 

मात्र त्यांची मनं – सगळ्यात काळी.

याच वर्णद्वेषाचा बळी १४ वर्षांचा जॉर्ज ठरला होता. तो जेव्हा मेला तेव्हा न्याय त्या अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात अश्रू ढाळत उभा होता.  

जॉर्जला न्याय मिळाला मात्र तब्बल ७० वर्षांनी. २०१४ मध्ये हा खटला परत चालवला गेला तेव्हा जॉर्ज दोषमुक्त सिद्ध झाला. मात्र आता काय फायदा होता.

एक मात्र झालं… याने न्याय जगतातील सगळ्यात काळी आणि अमानवीय घटना समोर आली!

WhatsApp Image 2022 04 15 at 9.31.51 PM

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.