138 वर्षांपासून दोन देशात भांडण सुरुयत अन् मॅटर व्हिस्कीची बाटली देवून संपवला जातोय..

आपल्या नटीचं दुसऱ्यासोबत लग्न झालं, जवळच्या मित्राशी भांडण झालं, ऑफिसमध्ये लडतरी झाल्या, नुकतंच प्रमोशन झालं, नाचायला अंगात ताकद नाय… पाच प्रॉब्लेम्स असले, तरी एक सोल्युशन कायम असतंय.

“बसायचं का?”

बसल्यावर कित्येक प्रॉब्लेम्स सुटतात, कित्येक स्टार्टअपच्या आयडिया जन्म घेतात, कित्येक जण एका रात्रीपुरते F-1 ड्रायव्हर होतात. त्यामुळं (सहन होतंय तोवर) बसणं ही लय भारी गोष्ट आहे.

आता दारूपायी इतक्या भारी भारी गोष्टी होतात, त्या करायच्या सोडून दोन देश दारूचा वापर युद्ध करायला करतायत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, युद्धात वापरतात म्हणजे काय बाटल्या फेकून मारतायत का? तर नाय. त्यांची टेकनिक लय वाढीव ए. टेकनिक नंतर सांगतो आधी राडा कशामुळं झालाय ते बघू.

ग्रीनलॅंड आणि कॅनडा हे ते दोन देश आणि ज्यावरुन भांडणं झालीत, ती जागा म्हणजे हॅन्स आयलँड.

ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग ए. त्यामुळं ग्रीनलँडशी वाकडं त्यांची नदीवर लाकडं म्हणत, डेन्मार्कवाले मैदानात उतरलेत, तर लिटिल पंजाब असलेलं कॅनडाही हट्ट सोडायला तयार नाय.

एवढे मोठे देश लडतरी करतायत म्हणजे, हॅन्स आयलँड हा लय मोठा महसूल देणारा भाग असेल, इकडं लय दाट लोकसंख्या असेल. असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. हे आहे एक बेट, ज्याचं क्षेत्रफळ आहे. दीड किलोमीटर. आपला मिलिंद सोमण ५० एक राउंड किरकोळीत मारू शकतोय.

एवढ्याश्या जागेवरुन दोन देश खवळले का?

तर कारण लय डिपाय. म्हणजे झालं असं की, कॅनडा आणि ग्रीनलँडपासून हे बेट १२ किलोमीटरच्या अंतरावर आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार दोन्ही देशांचा १२ किलोमीटरपर्यंतच्या समुद्री भागावर हक्क असतोय. त्यामुळं याच्यावर मालकी नेमकी कुणाची हा वाद सुरू झाला.

हा मॅटर सुरू झाला १८८० मध्ये.

ब्रिटिशांनी कॅनडाला स्वातंत्र्य देताना हॅन्स आयलंडचा नकाशात उल्लेख केलाच नाही (ब्रिटिशांनी इथं पण काड्या केल्याच होत्या.) मग पुढं १९३३ मध्ये ग्रीनलँडवाले म्हणले, ‘आम्ही इथले जयकांत शिर्के ए.’ मॅटर पार वरच्या लेव्हलला गेला. दुसरं महायुद्ध आणि कोल्ड वॉरच्या दरम्यान या दोन देशांमध्ये चर्चा झाली अनेक किरकोळ प्रश्नांचा निकाल लागला, पण हॅन्स आयलँड मात्र राहिलं.

मग १९८४ मध्ये एक किस्सा झाला.

कॅनडाचे सैनिक विमानानं हॅन्स आयलँडवर गेले आणि तिथं आपला झेंडा लावला. पण तिथं आपला मालकी हक्क सांगण्यासाठी, ते फक्त झेंडा लाऊन थांबले नाहीत…

तर तिथं आपल्याकडच्या व्हिस्कीचा एक खंबाही ठेवला.

मग डेन्मार्कचे कार्यकर्ते पेटले, ते म्हणले तुमचा हुकूम तर आमचा एक्का. ते तिकडं गेले, कॅनडाचा झेंडा काढून तिथं आपला झेंडा लावला आणि 

आपल्याकडची व्हिस्कीची बॉटल ठेवली.

झालं मग ही परंपरा पडली, कोणतर काड्या करायचं, आपली बॉटल ठेऊन यायचं. आधीच्या बॉटलचं काय व्हायचं हे मात्र कुणाला समजलं नाय. आता सरळसाधा विषय आहे, तिकडं पडतोय बर्फ, त्यात हे बेट म्हणजे गारठ्यानं जीव बेजार होणार. जरा जीवाला उब मिळावी म्हणून घेतली असणार लिटील लिटील.

पुढं तिथं वेगवेगळे प्रकल्प सुरू झाले, एकदम वैज्ञानिक वातावरण झालं. दोन्ही देशांनी ठरवलं की आपण एक समिती नेमू आणि मॅटर मिटवून टाकू. पण तसं काय झालं नाही. २०१२ मध्ये एक बैठक झाली, त्यात इतर सीमांविषयी निर्णय झाला पण हॅन्स आयलँडचं नंतर बघू म्हणले. मग आता तिथं संशोधन सुरू असतंय, काय काय गोष्टी होत राहतात. 

व्हिस्कीची देवाणघेवाण अजूनही होती का नाय, याची एकदम परफेक्ट माहिती घावली नाही. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली. याच वर्षी डेन्मार्कमध्ये व्हिस्की बनवणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्यापारबंधूंना आवाहन केलेलं की, ‘जोवर हा मॅटर निल होत नाय, तोवर प्रॉडक्शन थांबवा. कारण हे लोकं युद्धासाठी व्हिस्की वापरतायत. आपण लोकांमध्ये मैत्री आणि प्रेम रुजावं म्हणून व्हिस्की बनवतो कारण त्याचा आनंद घेता यावा.’

बघा काय उच्च विचार आहेत…

भावकीची भांडणं, रशिया-युक्रेन युद्ध अशा मोठ्या लडतरींमध्ये रक्ताचे कितीतरी थेम्ब पडतात, पण या दोन देशांमध्ये राडा आहे, खुन्नस आहे आणि तरीही रक्ताचा थेम्ब नाही… कारण त्यांचं शस्त्र बाटलीत दडलंय, जे मॅटर वाढवत नाही, तर संपवतं. मग ते टेबल असो किंवा युद्धभूमी.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.