जगातले टॉप टेन वोडके, जे पिऊन साक्षात पुतीन पण लक्कास होऊ शकतोय…
ए हे रे, काय विषय निवडलाय, वोडका. चार बॉटल वोडका, काम मेरा रोजका म्हणणाऱ्या हनी सिंगला आणि त्यावर डोलणाऱ्या सनी लिओनीला बघत बघत आपण मोठे झालो. त्यामुळं टेस्टला का होईना, म्हणून वोडका पिलेली लय जण असणार, फिक्स.
आमचं एक ओळखीचं भिडू मध्यंतरी गोव्याला गेलं, बिअर पिली चढली नाय, ओल्ड मंक प्यायला गरम लय होत होतं म्हणून याला भारत-रशिया दोस्ती आठवली आणि हा पिला वोडका. याला वोडका इतका आवडला की हा पडला प्रेमात, वोडक्याच्या.
मग हा आम्हाला म्हणला, जगातले लय भारी वोडके कोणते आहेत, हे जरा हुडक. पुढं मागं परत बसलो, तर ऑर्डर द्यायला. म्हणलं माहिती देणं हे आपलं काम ए, आपण दिली पाहिजे. म्हणजे कसं पोरांना कुठून काय मागवायचं हे सोपं पडतंय.
लय पाल्हाळ लावायला नको, डायरेक्ट बाटलीला, सॉरी सॉरी मुद्द्याला हात घालू…
दहाव्या क्रमांकाचे मानकरी – Stolichnaya 100
तर स्टोलिचनाया शंभर हा आहे रशियन वोडका, ज्याला ब्लु लेबल पण म्हणतात. हा वोडका बनतो गहू आणि साळीपासून. याचं प्रॉडक्शन रशियात होतं, पण पुढच्या प्रोसेससाठी हे मटरेल येतं लॅटव्हिया देशात. एक एक्स्ट्रा माहिती देतो या लॅटव्हिया देशात दारू पिणं हे अनुवांशिक आहे. म्हणजे बाप-पोरगा जोडीनं चिअर्स करत असणार, फिक्स. विषयांतर नको, दहा नंबरवर असणाऱ्या या वोडक्यात अल्कोहोल कंटेंट असतोय ५० टक्के, म्हणजे तारा नुसत्या हलणार नाहीत, तर वाकड्या तिकड्या होणार.
नवव्या क्रमांकाचे मानकरी- Smirnoff No. 57 100 Proof
सिमरनऑफ (चुका काढू नका, कुठल्याही बारमध्ये असंच म्हणतात.) त्या सिमरनची जितकी आठवण राजला येत नसेल, तितकी वोडका पिणाऱ्या पोरा-पोरींना या सिमरनची येती. पण नंबर ५७ हा जरा धडाकेबाज मामला आहे. ५० टक्के अल्कोहोल कंटेंट असणाऱ्या हा वोडका बनण्याची सुरुवात रशियामध्ये झाली, पण आता प्रॉडक्शन अमेरिकेत होतंय. आपली प्रियांका चोप्रा आणि रशियाचा वोडका दोन्ही तिकडंच गेलंय, चालायचंच. तर हा वोडका तीनदा डिस्टील होतो आणि दहावेळा फिल्टर आणि मग भरला जातो बाटलीत. तुम्ही डायरेक्ट पण मारु शकताय किंवा कॉकटेलमध्ये पण घेऊ शकताय. तुमच्या तुमच्या लिव्हर आणि घशाचा प्रश्नय. एक नम्र सूचना- याचं अतिसेवन तुम्हाला आयुष्यात दारु पिण्यापासून बाद ठरवू शकतं, त्यामुळं टेक इट लिटिल लिटिल.
पहिल्या प्रेमाला आठवा, कारण नंबरही आहे आठवा – Belvedere Intense 100 Proof
पहिलं तर आम्हाला मराठी आडनाव वाटलेलं. पण मग कळलं हा ऐवज पोलंडमध्ये बनतो. जगात या वोडक्यापेक्षा शुद्ध दारू कुठं मिळती, हे बघावं लागेल. कारण जे काय अशुद्ध मटरेल आहे, ते निघून जावं म्हणून या वोडक्याला दोनदा कोळशातून फिल्टर केलं जातं. ५० टक्के अल्कोहोल असलेल्या या वोडक्यात त्याच्या लेव्हलच्या वोडक्यांपैकी सगळ्यात कमी पाणी असतं. ते १०० प्रूफ त्यासाठीच लिहिलंय, कारण पाणी कमी आणि अल्कोहोलची घनता जास्त. पिल्यावर माणूस सनाट स्पीडमध्ये सोडून गेलेल्या विषयाच्या आठवणीत जाणार फिक्स. कधी ही घेऊन बसलात, तर रिकामी बॉटल देण्यासाठी नक्की संपर्क साधा.
हम सात, सात है – Absolut 100
हा तर पिलाय की, असं वाटत असेल तर थांबा. तुम्ही जो वोडका मारता, हे त्याचं नेक्स्ट व्हर्जन आहे. काळ्याशार बाटलीत सिल्व्हर नाव असलेली ही बॉटल म्हणजे सुंदरी आहे. स्वीडनमध्ये बनणारा हा व्होडका, कॉकटेलमध्ये मिक्स करतात नायतर लिटिल लिटिल मारतात, यात अल्कोहोल कंटेंट ५० टक्के असतंय आणि घनता १००. म्हणजे पिणारा गडी डुलणार हे फिक्स.
नंबर सहा, भिडू ही बाटली पहा – Svedka 100
हा वोडका आहे गोड. तर कसंय यात पण ५० आणि १०० चं गणित आहे. स्वीडिश गव्हातून बनणाऱ्या या वोडक्यात यीस्ट आणि पाणीपण वापरलं जातं. पाच टाइम डिस्टील केलेला हा वोडका, कॉकटेलसाठी एकदम बेस्ट असतोय. पण सगळं सोडा, बॉटल दिसायला लय वांड आहे. वोडका संपला की, शोपिस म्हणून घरात लावायची आहाहाहा पाहुणा इम्प्रेस.
नंबर पाच- Devil Springs Vodka
बॉटलवर जाऊ नका. साधा चेहरा पण अंदाज गेहरा म्हणजे हा वोडका. अमेरिकेत बनणाऱ्या या वोडक्याची खासियत म्हणजे यातली सामुग्री, ८० टक्के अल्कोहोल कंटेंट आणि १६० प्रूफ. म्हणजे दारुची व्हॉल्युम इतकी की शॉट्स म्हणून मारलात, तर नारळपाणी घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये भेटायला यावं लागणार. हा वोडका म्हणजे चार पेग डाऊन झाल्यावर, येणाऱ्या दिलजले विषयाच्या आठवणीसारखा आहे… जालीम!
नंबर चारचा अंगार – Good Ol’ Sailor
बॉटल बघून बसायची इच्छा झाली पाहिजे. गुड ओल्ड सेलर, नावातच गोडवा असलेली हा वोडका स्वीडनमध्ये तयार झालेला पहिला वोडका आहे. याच्या बॉटल भारी असल्या, तरी त्या पर्यावरणपूरक असतात.यात अल्कोहोल कंटेंट असतो ८५ टक्के आणि प्रूफ १७०. सुट्टीच नाही. हा वोडका प्यायचा पण नियम असतोय, स्ट्रेट मारायचा नाय… मिक्स करून मारायचा. नायतर डोळ्यांसमोर अंधारी येत्या, ब्लड प्रेशर वाढत्या थोडक्यात फ्लेक्स लागायची शक्यता.
इन, मीन, नंबर तीन- Balkan 176 Vodka
हे नाव ऐकलं की इतिहासात गेल्या सारखंच वाटतं. ही दारू पण ऐतिहासिक आहे, कारण हिला वास येत नाय. (पिऊन घरी गेलं तर? हा प्रश्न डोक्यात आला असेल तर स्वतःची पाठ थोपटा.) नुसता वास नाही, याला चव आणि रंग पण नसतो, म्हणजे पोटात जात नाही तोवर पिल्यासारखं वाटत नाही. मग कळतं, आपल्या पोटात ८८ टक्के अल्कोहोल गेलंय आणि व्हॉल्युम आहे १७६. या वोडक्याच्या बॉटलवर १३ प्रकारच्या आरोग्य सूचना लिहिलेल्या असतात, त्यामुळं वोडका पिला का औषध हे समजायच्या आधीच तुमच्या बत्त्या डीम झालेल्या असणार, फिक्स. लिहून दिलं असतं, पण वाचायला तुम्ही असाल कि नाही हे माहीत नाय…
‘दोन’ नंबर वन – Pincer Shanghai Strength
एक नंबरचा वोडका जर सूर्या असेल, तर ही आहे जाधव. कारण यात अल्कोहोल असतोय ८८.८८ टक्के. थेट गोल्डन नंबर. पिन्सर शांघाय वोडका, कसलं जपानी नाव वाटतं आणि बॉटल पण शिनचॅनच्या घरात असल्यासारखी. रानफुलं, स्वीडीश गहू यांच्यापासून बनवलेला हा वोडका फुलांसारखा सुगंधी आणि सुमधुर लागतो. म्हणून पिऊन घरी जायचा विचार अजिबात डोक्यात आणू नका कारण, याचे शॉट मारले तर तुमच्या फ्युजा उडतील आणि जरी निवांत पित राहिलात, तरी लिव्हरला चंदन फिक्स.
ये नंबर वन यारी है – Spirytus Rektyfikowany
कसंय नाव? प्यायच्या आधी नीट घेता येणार नाही, पिल्यावर तर संपलाच विषय. बरं हा जगातला फक्त स्ट्रॉंग वोडका नाही, तर जगातली सगळ्यात स्ट्रॉंग दारु आहे. नादखुळा. पण मॅटर असाय की यात ९६ टक्के दारु ए. इथं चार टक्यात फकाट होणारी गाभडी ओळखीची आहेत, तिथं ९६ म्हणल्यावर नुसत्या वासानं झिंगतील. यावर स्पष्ट लिहिलंय, नुसता मारु नका.. नायतर अल्कोहोल पॉयझनींग होऊ शकतंय. लोकं तीन पेग डाऊन असल्यावर दारू वाईट असं का म्हणतात हे आम्हाला, या वोडक्याबद्दल वाचून समजलं.
आता दहा बाटल्यांची माहिती दिलीये, कुठली प्यायची किंवा प्यायचीच नाय हा तुमचा विषय. पण सगळेच वोडके रशियन नसतात आणि सगळ्याच दारु पचवण्यासाठी नसतात हे धान्यात ठेवा. बाकी निदा फाजली सांगून गेलेत…
कुछ भी बचा न कहने को हर बात हो गई
आओ कहीं शराब पिएँ रात हो गई…
हे ही वाच भिडू:
- हातभट्टीच्या दारूत असा काय माल मिक्स केला जातो की थेट जीवच जातो ?
- मोहाची दारू भले बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक वाईन म्हणतात
- दोन अट्टल दारुडे एकत्र आले आणि त्यांनी दारू सोडणाऱ्यांची संघटना बनवली