महेंद्रसिंह धोनी खरंच फिनिशर आहे का..? प्रश्न साधाय, पण उत्तर डिपाय

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सची मॅचमध्ये आयपीएलची जत्रा. एकाच घरात राहणाऱ्या बाप-पोराला चार तासांसाठी विरोधक बनवायची ताकद या एका मॅचमध्ये असते. एका गाभड्यानं या मॅचला भारत-पाकिस्तानची उपमा दिली म्हणून लोकांनी सोशल मीडियावर त्याची मापं काढली.

पण भावाच्या लॉजिकमध्ये एक टक्का तरी खरेपणा होता. कारण सिम्पल ए, या मॅचमध्ये जो भारी खेळतो तो आयुष्यभरासाठी हिरो ठरतो आणि ज्याला फटके पडतात तो व्हिलन. एक सिक्सर खाल्ला म्हणून चेतन शर्माला अजूनही नावं ठेवणारी लोकं आहेत आणि बाप ओव्हर टाकली म्हणून जोगिंदर शर्माला डोक्यावर घेणारी जनताही आपल्याकडेच आहे.

यंदाच्या मुंबई विरुद्ध चेन्नई मॅचनंतर मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससमोर जयदेव उनाडकटला आणला, तर एखादी शिवी निघणारच. तेच चेन्नई फॅन्सच्यासमोर धोनीला आणला, तर ते गडी थेट लोटांगण घालत असतात… सुट्टी नाही.

धोनीनं मुंबईला शेवटच्या ओव्हरपर्यंत झालेल्या मॅचमध्ये हरवलं आणि सगळं जग एका सुरात म्हणालं…
The greatest finisher is back!

आता धोनीचं टोपणनावच फिनिशर आहे, त्यानं मुंबई विरुद्धची मॅचही थाटात फिनिश मारली. पण त्याला मीडिया आणि चाहत्यांनी दिलेलं फिनिशर हे नाव खरंच सार्थ आहे का? याबाबत आकडे काय सांगतात आणि लॉजिक काय सांगतं… हे बघणंही महत्त्वाचं आणि लय भारी आहे.

क्रिकेटमध्ये फिनिशर म्हणजे नेमकं काय?

तर समजा तुमची टीम धावांचा पाठलाग करतीये, तर सहाव्या-सातव्या नंबरला येऊन टीमची नौका पार लावणारा गडी म्हणजे फिनिशर.

समजा तुमची टीम पहिल्यांदा बॅटिंग करतीये, तर असाच लोअर ऑर्डरमध्ये येऊन हाणामारी करत मोठा स्कोअर उभारुन देणारा गडी म्हणजे फिनिशर.

मग धोनी अण्णाचं काय?

पुढं वाचायच्या आधीच एक मॅच डोळ्यांसमोर आलेली असेल, २०११ च्या वर्ल्डकपची फायनल. तेंडुलकर, सेहवाग, कोहली गेलेले, धावांचा डोंगर समोर आणि इनफॉर्म युवराजच्या ऐवजी क्रीझवर आलेला धोनी. त्या दिवशी धोनीनं काढलेला प्रत्येक रन, मुरलीच्या फिरकीला मारलेला चव्वा, किंचित हवेत उडी मारुन मारलेले छकडे, जीव तोडून पळणं आणि सगळ्यावर कळस म्हणजे वर्ल्डकप जिंकण्यासाठी मारलेला सिक्स. विषय एन्ड.

माहीनं तो गेम असा काही फिनिश केला की गंभीरचे ९७ रन्स फार कमी जणांच्या लक्षात राहिले. अर्थात तो पब्लिक मेमरीचा विषय होता, पण माहीचं फिनिशिंग मिडास आहे, ते त्याच दिवशी नक्की झालं.

पण विषय इथंच थांबत नाही…

२०११ च्या वर्ल्डकपमध्ये धावांचा पाठलाग करताना धोनीची बॅट फक्त फायनलमध्येच चालली होती. २०११-१२ च्या सिझनमध्ये भारतानं वनडे क्रिकेटमध्ये १५ वेळा धावांचा पाठलाग केला. त्यातल्या १० वेळा भारत जिंकला खरा, पण धोनीची बॅट अगदी पद्धतशीरपणे फक्त दोनदाच बोलली. बाकी वेळेस त्याला अपयश आलं.

पण ऑस्ट्रेलियामध्ये झालेली कॉमनवेल्थ सिरीज, भारताचा श्रीलंका दौरा इथं त्याच्या फॉर्मनं परत उचल खाल्ली आणि त्यानं कठीण वाटणाऱ्या मॅचेस जिंकवून दिल्या.

२०१८-१९ ला ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे सिरीजमध्ये तो मॅन ऑफ द सिरीज होता. पण सगळ्यात मेन विषय होता, वर्ल्डकपचा. २०१५ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धोनी मॅच फिनिश करेल अशी लय आशा होती, मात्र तो ६५ रन्सवर रनआऊट झाला. हीच गत २०१९ लाही झाली, धोनी जिंकवेल असं वाटत राहिलं, पण तो ५० रन्सवर रनआऊट झाला. दोन्ही वेळेस भारतीयांचं स्वप्न भंगलं.

हे इतकं वाचून तुम्हाला वाटलं असेल, की २०११ ची वर्ल्डकप फायनल सोडली तर महत्त्वाच्या मॅचमध्ये धोनीचा कार्यक्रम गंडलाय.

पण विषय इथंही संपत नाही…

कारण आकडेवारीच्या पलीकडंही दुनिया असते. काही मॅचेसमध्ये अपयश आलेलं असलं, तरी धोनीनं भारतीय संघाला अनेकवेळा कठीण परिस्थितीतून सावरलंय. वरच्या विकेट्स खपाखप गेल्या की त्यानं एक बाजू लाऊन धरत भारताला लाज राखण्याइतपत स्कोअर उभारुन दिलाय.

आता मुद्दा येतो आयपीएलचा…

धोनी आयपीएलमध्ये दोन टीम्सकडून खेळला. चेन्नई आणि पुणे. टीम कुठलीही असली, तरी त्याचा बॅटिंग नंबर कायम सहा, सात किंवा आठ, यांपैकीच असतो. टी२० मध्ये इनमिन १२० बॉल्स असतात. वरची गँग त्यातले ७०-८० बॉल्स सहज संपवते. धोनीच्या वाट्याला येतात शेवटचे ३०-४०. पण ह्यो भाऊ त्याच्यात पण कल्ला करतो.

आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं, तर २००८ पासून धोनीचा स्ट्राईकरेट एकदाही १०० च्या खाली आलेला नाही.

त्याचा फॉर्म गंडल्यावर त्याला कितीही टुकूटुकू प्लेअर म्हणून ट्रॉल केलं, तरी वेळ आली की तो हाणामारी करतोच. १५ वर्ष खेळून, वय ४० च्या पलीकडे जाऊनही त्याचं ऍव्हरेज ३९.८८ आहे. जे रनमशीन विराट कोहली, स्फोटक रिषभ पंत आणि हिटमॅन रोहित शर्मापेक्षाही जास्त आहे.

२०१८ ते २०२२ (आयपीएल सुरू व्हायच्या आधी) या कालावधीत धोनी ३० इनिंग्स खेळला आणि त्यातल्या १३ वेळा त्यानं चेन्नईला मॅच जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये २३ रन्स हवे होते. धोनीनं स्ट्राईक फिरवली नाही आणि अक्षर पटेलला तुडवत २३ रन्स चोपले. मुंबईला चोपल्याची तर आठवण करुन द्यावी लागणार नाही.

पण धोनी इतका बाप फिनिशर कसा बनला..?

याचं उत्तर सोपं आहे. जेव्हा धावांचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा धोनी कधीच घाई करत नाही. मॅच शेवटपर्यंत घेऊन जातो, कधी सिंगल-डबल काढत रन्सचा फ्लो सुरू ठेवतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम करतो. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आणि धोनी स्ट्राईकवर असला की सगळ्यात जास्त प्रेशर बॉलरवर असतो.

धोनी आधी हा माईंडगेम जिंकतो आणि मग मैदानावरचा खेळ जिंकतो!

धोनीच्या फिनिशिंगचा आणखी एक दाखला द्यायचा, तर आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सगळ्यात जास्त आठ वेळा मॅच जिंकायचं रेकॉर्ड चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. धोनीनं भले प्रत्येकवेळी विनिंग शॉट मारला नसेल, पण आपल्या धावांचं पाठबळ दिलंच.

इतकं वाचूनही धोनीच्या फिनिशिंगवर शंका असेल, तर त्यानं रिटायरमेंट कशी जाहीर केली हे आठवा… उत्तर मिळून जाईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.