टिळकांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला नाही… हा आहे खणखणीत पुरावा

इसवी सन 1818. मराठ्यांच्या साम्राज्याची राजधानी रायगड इंग्रजांच्या हातात पडला होता. कर्नल प्रॉथरने केलेल्या तोफांचा मारा आणि त्यामुळं गडावर लागलेली भीषण आग रायगडावरील कित्येक बांधकाम नष्ट करण्यास कारणीभूत ठरली. पुढे सन 1883 पर्यंत गड वनखात्याच्या ताब्यात गेल्यामुळे किल्ल्यावर कुणाला पायसुद्धा ठेवण्यास परवानगी नव्हती.

या मधल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये रायगडाची मोठी हेळसांड झाली.

1885 सालची गोष्ट आहे.

मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यू कमिशनर क्रॉफर्ड, कॅप्टन पिट आणि काही इंग्रज अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ रायगडावर गेले. तिथे गेल्यावर रिचर्ड टेंपलने बरीच चित्रे काढली, रायगडाचा नकाशा काढला.

रिचर्ड टेंपल शिवरायांच्या समाधीची दुरवस्था पाहून नाराज झाले आणि रायगडाच्या कलेक्टरला पत्र लिहून समाधीचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करण्यास सांगितले.

शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासंबंधित आढळून येणारा हा पहिला शासकीय उल्लेख..

पुढे दोन वर्षांनी, म्हणजेच 1887 साली गोविंद बाबाजी जोशी यांनी ‘आपले रायगड किल्ल्याचे वर्णन’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात समाधीची दुरुस्ती आणि त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम 45,046 रु. एवढी सांगितली.

हा खर्च कशाप्रकारे आणि कोणत्या गोष्टींसाठी होणार होता, याचे सविस्तर वर्णन पुस्तकात दिले. याचवर्षी लॉर्ड रे या इंग्रज अधिकाऱ्याने सरकारी खर्चातून समाधीच्या साफसफाईसाठी दरसाल 5 रु. देण्याचे मान्य केले.

शिवसमाधी जीर्णोद्धारविषयी रिचर्ड टेंपल, जेम्स डग्लस, गोविंद खरे आणि अनेक इंग्रज-एतद्देशीय लोकांनी 1883 ते 1895 सालापर्यंत कायम पाठपुरावा केला.

शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धार विषयाला तोंड फुटल्याच्या तब्बल बारा वर्षांनी, म्हणजेच 1895 साली लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ वृत्तपत्रामधून पहिला लेख लिहिला. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर कै. श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर यांनी शिवरायांच्या समाधीव्यवस्थेसाठी दरसाल 100 रु. देण्याची व्यवस्था लावून दिली.

शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी टिळकांनी पाऊल उचलण्याचे ठरवले.

दि. 30 मे 1895 ला हिराबाग मैदानात सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी लोकमान्य टिळक, चाफळचे स्वामी, दाभाडे सरकार, बापूसाहेब कुरुंदवाडजर, बॅरिस्टर गाडगीळ, उरवड्याचे पोतनीस इ. मान्यवर उपस्थित होते. या सभेमध्ये दोन मोठे निर्णय झाले.

शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धार आणि स्मारक उभारणीसाठी एक कमिटी आणि कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. ज्यात, शिवरायांच्या स्मारक पुतळ्यासाठी एक लाख तर समाधीवर छत्री बांधण्यासाठी 25,000 रुपयांच्या खर्चाचा आराखडा मांडण्यात आला. कार्यकारी मंडळात टिळक, दाभाडे सरकार आणि इतर काही जणांचा समावेश करण्यात आला.

सयाजीराव गायकवाड यांनी समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी रोख 1000 रु पाठवले. कोल्हापूरच्या छत्रपतींनी समाधी जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. परंतु, छत्रपती शिवराय हे समस्त भारताचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे साऱ्या भारताचा या शुभकामी हातभार असावा असे म्हणत लोकमान्य टिळकांनी समाधीच्या जीर्णोद्धारास लागणारी रक्कम वर्गणीतून गोळा करण्याचे ठरवले.

या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप यावे, वर्गणी लवकरात लवकर गोळा व्हावी म्हणून रायगड उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले.

पहिला उत्सव साजरा करण्याची तारीख ठरली 25 एप्रिल 1896. रायगडावर दोन दिवस मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले. टिळक जातीने सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष देऊन होते. या कार्यक्रमात समाधी जीर्णोद्धारासाठी तब्बल 16 हजारांची वर्गणी जमा झाली. लवकरच हा जीर्णोद्धार सोहळा पार पडणार, याची आता खात्री वाटू लागली.

पण,

दुर्दैवाने टिळकांवर 1897 मध्ये खटला भरण्यात आला आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. यामुळे, समाधी जीर्णोद्धार कार्यक्रमात 1906 पर्यंत म्हणजे तब्बल 9 वर्षे खंड पडला.

1907 मध्ये रायगडावर परत एकदा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. लॉर्ड लेमिंगन रायगडावर आला होता. त्याने समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी 5000 रु. व इतर साहित्य पुरवण्याची सोय लावून दिली. याप्रसंगी रायगडावर टिळक उपस्थित होते.

परत टिळकांवर 1908 साली खटला भरण्यात आला.

1911 सालापर्यंत समाधीचे काम मागे पडले. त्यानंतर टिळक विलायतेत गेले आणि समाधीचे काम रखडत राहिले. इसवी सन 1920 साली टिळकांच्या मृत्यूपर्यंत समाधीच्या कामाला सुरुवातसुद्धा झाली नव्हती.

एवढंच नव्हे, तर समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी 1896 सालापासून जमा करण्यात आलेली रक्कम डेक्कन बँकेत ठेवण्यात आली होती. ती बँकच 1911-12 च्या आसपास बुडाली. बँकेसोबत वर्गणीचे पैसेसुद्धा बुडून गेले आणि टिळकांच्या हयातीत हे महान कार्य होऊ शकले नाही.

पुढे टिळकांच्या मृत्यूनंतर चार-पाच वर्षांनी वर्षांनी न. चिं. केळकर, इंग्रज अधिकारी आणि रायगड स्मारक मंडळातील काही पदाधिकारी रायगडावर गेले. छत्रीचा नकाशा, आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक त्यांनी बनवले. छत्रीचा अंदाजे खर्च 19,000 रु. ठरवण्यात आला आणि त्याची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली.

12, 000 रु. स्मारक समितीने द्यावे..
5,000 रु. मुंबई सरकारने द्यावे..
2,000 रु. पुरातत्त्व खात्याने द्यावे,

असे एकमताने ठरले.

यानुसार, दि. 10 फेब्रुवारी 1925 साली स्मारक समितीने आपल्याकडे असणारे 12, 000 रु. मुंबई सरकारकडे भरले. श्री. बाळकृष्ण मोरेश्वर सुळे यांनी शिवरायांच्या समाधी जिर्णोद्धाराची कामगिरी स्वतःच्या शिरावर घेतली आणि दोन वर्षांनी सन 1927 साली रायगडावर शिवरायांच्या समाधीचे बांधकाम पूर्ण झाले.

लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धार करण्यासंबंधी जाहीर सभा घेत जनजागृती करण्याचे मोठे कार्य केले. परंतू, समाधी जिर्णोद्धाराचे आणि तिच्या देखभालीचे प्रयत्न इसवीसन 1885 सालापासून सुरूच होते.

महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ‘ Chhatrapati Shivaji Maharaj coronation tri centenary commemoration vol. 2 / Shivaji memorials – The British attitude’ या पुस्तकात हे सर्व प्रयत्न कागदोपत्री पुरावे देऊन स्पष्ट केले आहेत.

त्यामुळे, टिळकांच्या काळात जरी शिवसमाधीबाबत जागृती आणि मोठ्या प्रमाणात निधी संकलित झाला असला, तरीसुद्धा लोकमान्य टिळकांच्या काळात समाधी जिर्णोद्धाराची हालचाल सुरू झाली नसल्याचेच कागदोपत्री सिद्ध होते.

टिळक आणि शिवसमाधी जीर्णोद्धार या गोष्टींचा संबंध ओढूनताणून लावण्याचा जो प्रयत्न केला जातोय, तो अतिशय चुकीचा आहे.

जे कार्य इंजिनिअर सुळे यांनी केले, त्याची साधी कल्पनासुद्धा आपल्याला नाहीये आणि जीर्णोद्धार न करूनही टिळकांच्या माथी हे श्रेय मारण्याचा नादात त्यांनी समाधी जीर्णोद्धार करण्यासाठी घेतलेले जे कष्ट आहेत त्याकडे सहजतेने दुर्लक्ष होते आहे. यातून, टिळकांनी केलेल्या कार्याचीचा अवहेलना होत आहे का, अशी भीती वाटत आहे.

– केतन पुरी.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.