फडणवीसांच्या पहिल्या मंत्रीमंडळात असणाऱ्या “यांना” आज कोण शक्यतेतही घेत नाही..

अखेर राज्यात मंत्रीमंडळाची शक्यता वर्तवली जावू लागलेय.

चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव लोणीकर, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, नितेश राणे या भाजपच्या नेत्यांची तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामार्फत दिपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले तर अपक्ष असणाऱ्या बच्चु कडू आणि राजेंद्र यड्रावकर यांचा समावेश मंत्रिमंडळात असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पण मुद्दा आहे भाजपचा. २०१४ च्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रींमडळातून आज कोणते चेहरे साधे स्पर्धेतही नाहीत हे पाहूया.. 

१) विनोद तावडे  

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मधील लक्षात राहणाऱ्या नावा पैकी एक म्हणजे विनोद तावडे. राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात येत होता. फडणवीस सरकार मध्ये तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही महत्वाची खाती होती. मात्र,  २०१९ मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट सुद्धा देण्यात आलं नाही. 

तावडे दोन वर्ष अडगळीत पडले होते. २०२१ मध्ये भाजपने त्यांचे पुनर्वसन केले. सध्या विनोद तावडे हे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी आहेत. राज्याच्या राजकारणापासून दूर असणाऱ्या तावडे यांच्याकडे त्रिपुरा आणि हरियाणा राज्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

कधी काळी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जात होत. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात ते कुठेच नाहीत. 

२) महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असणारे महादेव जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचा पदभार होता.        

जुलै २०१८ मध्ये महादेव जानकर यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. मात्र २०१९ नंतर धनगर, ओबीसी आरक्षण या मुद्दावरून महादेव जानकर यांनी भाजप मध्ये वाद झाले. तेव्हा पासून जानकर यांनी भाजप पासून लांब राहणे पसंत केले आहे.    

३) राजकुमार बडोले 

२००९ आणि २०१४ मध्ये बडोले अर्जुनी मोरगाव मतदार संघातून निवडून आले होते. फडणवीस सरकार मध्ये राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरव्यवहार वा निष्क्रियतेचा आरोप होत असलेल्या सहा मंत्र्यांना शेवटच्या तीन महिन्यात घरचा रस्ता दाखविला होता. त्यात बडोले यांचा  समावेश होता. 

२०१९ मध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी राजकुमार बडलो यांचा पराभव केला. सध्या राजकुमार बडोले भाजपाच्या निवडणूक विभाग प्रदेश सहप्रमुख पदावर काम करत आहेत.  

४) प्रकाश मेहता 

भ्रष्टाचाराच्या आरोप झाल्याने फडणवीस सरकारमध्ये काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यात प्रकाश मेहता यांचा नंबर लागतो. मेहता हे गृहनिर्माण मंत्री होते. दक्षिण मुंबईतील इमारत पुनर्विकासात बिल्डरला झुकते माप दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

१९९० ते २०१४ या दरम्यान प्रकाश मेहता हे ६ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. २०१९ मध्ये भाजपकडून तिकीट मिळावे म्हणून प्रकाश मेहता यांनी बंड केलं होतं. मात्र, पक्षाने त्याची कुठलीही दखल घेतली नाही. घाटकोपर इस्ट मधून प्रकाश मेहता यांच्या ऐवजी भाजपने पराग शहा यांना तिकीट दिले होते.

कधीकाळी मंत्री, मुंबई भाजपचे अध्यक्ष राहिलेले प्रकाश मेहता यांना पक्षाने बाजूला ठेवले आहे.   

५)  बाळा भेगडे 

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात शेवटच्या तीन महिन्यात मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यात मावळ मतदार संघातील बाळा भेगडे यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती.  

कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री निवड करण्यात आली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी पराभव केला. त्यानंतर बाळा भेगडे यांची राजकीय सक्रियता कमी झाली आहे.   

६) दिलीप कांबळे 

फडणवीस सरकार मध्ये दिलीप कांबळे हे सामाजिक न्यायमंत्री होते. दिलीप कांबळे हे पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातून निवडून गेले होते. 

दारू दुकानाच्या परवान्यासाठीच्या प्रकरणात पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्यांच्याकडून मंत्री पद काढून घेण्यात आले. 

त्यानंतर दिलीप कांबळे सक्रिय राजकारणातून दूर फेकले गेले. २०१९ मध्ये दिलीप कांबळे ऐवजी सुनील कांबळे यांना भाजपने तिकीट दिले.

७) बबनराव लोणीकर 

जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघातून बबनराव लोणीकर आता पर्यंत तीन वेळा निवडून आले आहेत. २०१४ च्या फडणवीस सरकार मध्ये लोणीकर हे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचे मंत्री  होते.  

मधल्या दोन वर्षात बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने पक्षापासून काही लांब पडले आहेत. यामुळे बनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.  

८) अशोक उईके 

२०१४ आणि २०१९ मध्ये अशोक उईके राळेगाव मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार झाला होता. त्यावेळी उईके यांना आदिवासी विकास विभागाचे मंत्री करण्यात आले होते. 

सध्या अशोक उईके हे भाजपच्या आदिवासी मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. 

  हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.