शिवसेना महाविकास आघाडीत गेल्याने नाराज होऊन राजीनामा देणारा तो पहिला शिवसैनिक ठरला होता…

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला आता आठवडा उलटून गेलाय. हा बंडखोर गट आजही याच वर ठाम  आहे ते म्हणजे, “महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजप सोबत सरकार स्थापन करा”. हा गट वारंवार सांगतोय कि आमचं हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे आणि आम्ही याच खऱ्या हिंदुत्वासाठी वेगळे होतोय. 

मात्र यात प्रश्न असा निर्माण केला जातोय कि, या बंडखोर आमदारांना अडीच वर्षानंतर कशी काय जाग आली ?  

जेंव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होत होतं तेंव्हाच त्यांनी सरकारमधून किंव्हा पक्षामधून बाहेर पडायला हवं होतं.

याच बंडखोरीच्या राड्यात आम्हाला एक नाव आठवलं ते रमेश सोळंकी !

हे नाव अनेकांच्या आठवणीत नसेल किंव्हा ओळखीचं नसेल मात्र २०१९ मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करून ऐतिहासिक निर्णय घेतला त्याच निर्णयाच्या विरोधात रमेश सोळंकी यांनी शिवसेना सोडली होती. होय उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार त्याच्या आदल्याच रात्री एका कट्टर शिवसैनिकाने पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. 

महाविकास आघाडीवर नाराज होऊन राजीनामा देणारे रमेश सोळंकी पहिले शिवसैनिक ठरले होते.

कोण आहेत हे रमेश सोळंकी ?

रमेश सोळंकी हा काय फार मोठा नेता होता अशातला भाग नाही मात्र त्या सत्तासंघर्षाच्या दरम्यान हे नाव बरंच गाजलेलं. ते शिवसेनेच्या आयटी सेलचे सदस्य होते तसेच शिवसेनेच्या युवासेना शाखेचे सदस्य होते.

रमेश सोळंकी यांची ओळख म्हणजे, वयाच्या अगदी १२व्या वर्षापासून ते बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक. त्यांच्या २१ व्या वर्षांपासून एकच उद्दिष्ट होते, ते म्हणजे ‘काँग्रेस मुक्त भारत’. 

तेच दुसरीकडे कट्टर हिंदुत्वाच्या विचारावर पुढे जाणाऱ्या शिवसेनेने एकेकाळी आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला अनेकांच्या पचनीच पडत नव्हतं, तशीच काहीशी घालमेल रमेश सोळंकींची झालेली. 

याच निर्णयाविरोधात शिवसेनेच्या रमेश सोळंकी यांनी आयटी सेल, युवासेना  शाखेचा आणि शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

“जो मेरे श्री राम का नहीं है, वो मेरे किसी काम का नहीं है”.

थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं कि,  त्यांचा विवेक आणि त्यांची विचारधारा त्यांना काँग्रेससोबत काम करू देत नाही.

२०९ च्या दरम्यानचा सत्ता संघर्ष आपण विसरू शकत अशा रीतीने तेंव्हा अनपेक्षितपणे चक्र फिरत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात वाद झाला आणि युती फुटली.  अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी पार पाडला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रपदाचा राजीनामा दिला. 

त्या ७० तासांत फडणवीस सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला.  मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी शिवसैनिकांना फारशी आवडली नसल्याचं दिसून आलं, गेली अडीच वर्षे कसं बसं सरकार चालत होतं तितक्यात हे बंडखोरीचं नाट्य सुरु झालं. 

मात्र आपण परतुया २०१९ च्या रमेश सोळंकींच्या राजीनाम्यावर…

महाविकास आघाडीचं समीकरणच काही शिवसैनिकांना आवडलं नाही. याचदरम्यान महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या आदल्याच दिवशी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  त्यादरम्यान त्यांचं ट्विट असं होतं कि, 

मी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझे मत जाणून घ्यायचे होते. आता मला माझी भूमिका मांडायची आहे. जो माझ्या श्रीरामाचा नाही (काँग्रेस), तो माझ्या काही कामाचा नाही आहे”.

राजीनामा देताना त्यांनी ही गोष्ट देखील स्पष्ट केली कि, कोणत्याही पदाची किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही.

 “जेव्हा जहाज बुडायला लागते तेव्हा पहिले उंदीर उड्या मारायला लागतात. पण मी माझा पक्ष सर्वोच्च उंचीवर असताना सोडत आहे. हा निर्णय घेणं खूप कठीण जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली.

तसेच ते सांगतात की, माझ्या ट्विटरवर दीड लाख ट्विट आहेत, त्यापैकी एक लाखाहून अधिक ट्वीट राहुल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आहेत. माझा पक्ष काँग्रेससोबत गेला असला तरीही ज्यांच्या विरोधात माझी भूमिका राहिलीय त्या काँग्रेसची स्तुती मी करू शकत नाही.

त्यांच्या राजीनाम्याच्या ३ वर्षानंतर रमेश सोळंकी यांनी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीवर  प्रतिक्रिया दिली,  “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला मागे टाकल्यामुळेच पक्षात फूट पडली आहे”. 

 बाळासाहेबांची शिवसेना ही भगवी आहे, ती तुम्ही ‘हिरवी’ करू शकता. तुम्ही पुरोगामी असू शकता, पण पक्षाचे मूळ स्वरूप बदलू शकत नाही. 

ते म्हणतात कि, “बाळासाहेबांचा मुलगा असो वा नातू, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारसरणीच्या विरोधात सरकार चालवले तर ते फार काळ चालणार नाही. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराने प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मुलभूत विचारधारेशी तडजोड करून चालणार नाही”.

मात्र कोणत्याही सैनिकासाठी सेनेशी फारकत घेणे हा सर्वात कठीण निर्णय असतो हे देखील सांगायला रमेश सोळंकी विसरले नाहीत. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.