सरकार अन् आघाडी कुठलीही असो, मुख्यमंत्री आणि सातारकर हे नातं चौथ्यांदा जमून आलंय…

राज्यातल्या सत्तानाट्याला पूर्णविराम मिळण्याची शक्यता असताना वेगळंच वळण मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात एकत्रित पत्रकार परिषद घेतली. ज्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि साताऱ्यात आनंदोत्सव सुरू झाला, कारण सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे.

पहिल्यांदा हा मान साताऱ्याला मिळाला तो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या रुपानं…

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्रेमध्ये. सामान्य घरातून पुढं आलेल्या यशवंतरावांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला. साताऱ्यातल्या कराडचं प्रतिनिधित्व करत यशवंतरावांनी द्विभाषिक मुंबई राज्याच्या विधानसभेत धडक मारली. पुढं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन पेटलं. राज्यात अनेक घडामोडी घडल्या आणि अखेर या लढ्याला यश आलं आणि १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली.

या मंगलप्रसंगी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. साताऱ्याचं प्रतिनिधित्व करणारा माणूस महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री झाला. यशवंतरावांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला, भविष्याला दिशा मिळाली. त्यांनी १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला.

त्यानंतर, साताऱ्याला दुसरे मुख्यमंत्री मिळाले ते म्हणजे, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले.

बाबासाहेब भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या तारळे इथल्या एका शेतकरी कुटुंबात झाला. बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण कलेढोण, वीटा इथं आणि माध्यमिक शिक्षण सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. बाबासाहेब भोसले यांना सुरवातीपासून राजकारणात रस होता. परदेशी उच्चशिक्षण पूर्ण करुन भारतात परतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करणं सुरू ठेवलं.

ए. आर. अंतुले यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर इंदिरा गांधींनी बाबासाहेब भोसलेंना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. इंदिरा गांधीना अभयसिंहराजे भोसलेंना मुख्यमंत्री करायचं होतं पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले असं लोक छातीठोकपणे सांगायचे. 

मात्र बाबासाहेबांनी आपल्या कामातून नाव कमावलं. त्यांनी मंत्र्याच्या पगारात कपात केली आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ केली. श्रमजीवी कुटुंब योजना, मच्छिमारांसाठी विमा योजना सुरू करण्याचे निर्णय बाबासाहेबांच्या काळात झाले. त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली, सोबतच औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना केली. बाबासाहेब २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.

तिसरं नाव येतं, ते पृथ्वीराज चव्हाण यांचं

११ नोव्हेंबर २०१० ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये झाला असला, तरी त्यांची कर्मभूमी साताराच राहिली. त्यांच्या आई आणि वडिलांनी कराडचं प्रतिनिधित्व केलं.  हा राजकीय वारसा पृथ्वीराज चव्हाणांनी पुढं चालवला.

अशोक चव्हाण यांना आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळ्यानंतर राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर काँग्रेस हायकमांडला स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री हवा होता. अशातच १० नोव्हेंबर २०१० च्या मध्यरात्री सूत्रं हलली.

 मध्यरात्रीचे तीन वाजलेले. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा पीएमओ ऑफिसचा कारभार पाहत होते. मध्यरात्री ३ वाजता पृथ्वीराज चव्हाण यांना सोनिया गांधीचा फोन आला. फोनवर त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याचं कळवण्यात आलं. २६ सप्टेंबर २०१४ पर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.

राज्याचे मुख्यमंत्री झालेले सातारचे चौथे सुपुत्र म्हणजे एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातल्या दरे गावचे. काही कामानिमित्त त्यांचं कुटुंब ठाण्यात स्थायिक झालं. मात्र त्यांची आपल्या मूळ गावाशी असलेली नाळ कायम ठेवली.

खरंतर एकनाथ शिंदे प्रचंड सत्तानाट्य आणि दिवसादिवसाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींनंतर राज्याचे मुख्यमंत्री झालेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ठाण्यात शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून झाली, त्यानंतर त्यांनी नगरसेवक, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री आणि थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. 

त्यांचा कार्यकाळ कसा असेल, याबाबत फक्त साताऱ्याच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उत्सुकता आहे.

आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी, ‘आपलं मूळ गाव साताऱ्यातलं कोरेगाव असल्याचं सांगत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं सातारा जिल्ह्याची लॉटरी लागली,’ असं वक्तव्य केलं.

लातूरनं निलंगेकर आणि विलासराव देशमुख, यवतमाळनं वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक, नांदेडनं शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण असे प्रत्येकी दोन मुख्यमंत्री दिले आहेत. मात्र राज्याला सर्वाधिक चार मुख्यमंत्री देत सातारा जिल्ह्यानं आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.