शेतकऱ्यांना मालक बनवणारा सतीश “दादा” आणि त्यांचा : मगर पॅटर्न.

माझा पॅटर्नच वेगळाय. मी ठोकत नाय वो, मी ना तोडतो. वेगळा असणारा मुळशी पॅटर्न अजून थेएटरात राडा करतोय. एका तालुक्याची नाही तर अख्या देशाची कथा सांगणारा हा चित्रपट. नान्या भाय, राहूल्या, पिट्या अशा कित्येक दादांची कर्मकहाणी मुळशी पॅटर्नमध्ये मांडलेय. पण या सगळ्या राड्यात एक दादा माणूस सुटला. खरतर तो माणूस या राड्यातून सुटला म्हणूनच आज खरा दादामाणूस आहे. 

गळ्यात सोन किंवा गुठाभर जमिन नाही तर आज त्या दादा माणसाकडे अख्खी एक सिटी आहे. त्या सिटीत ८४ हजार लोक काम करतात, त्यांचा एकूण पगार पाच हजार कोटींच्या घरात जातो. एकट्या सिटीतून परदेशात १२ हजार कोटींचा व्यवहार होतो. 

आणि हे सगळं मुळशी पॅटर्नच्या राड्यात उभा करणारा एकच दादा, 

सतिशदादा….! 

सतिशदादा मगर. हा खरा डॉन माणूस, जेव्हा शेतकरी शेती विकत होते तेव्हा या माणसानं शेतजमीन विकून दिली नाही तर शेतकऱ्यांना मालक बनवण्यास सुरवात केलं. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये शेतकरी मालक असणार असा निर्धार या दादाने केला.

आज सतिश मगर या दादा माणसासोबत असणारे तब्बल ३००० च्या दरम्यान “शेतकरी मालक” आहेत. 

हि गोष्ट मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी घडवणारे सतीश मगर यांची ज्यांनी, शेतकऱ्याचं पोरगं म्हणून नांगरासकट बैल लावले नाहीत, ज्याने हातात बंदुका घेवून रस्त्यांवर राडा केला नाही तर त्याने हजारों शेतकऱ्यांच्या पोरांना कंपनीच मालक बनवलं. 

सतिशदादा मगर एका शेतकऱ्याचं पोरगा. पुणे सोलापूर रोडवर हडपसर भागात मगर कुटूंबाची दिडशे एकर जमीन. शेतकऱ्याचा पोरगा आणि जमीनदार. सतिश मगर यांचे काका राजकारणात होते. काकांच पोरावर विशेष लक्ष होतं.  जमिनदारी डोक्यात न गेलेल्या काकांनी आणि वडिलांनी त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवला.

पुण्यात शिक्षणासाठी राहून सतिश मगर कृषी पदवीधर झाले. कृषी पदवीधर झाल्यानंतर आत्ता प्रशासनात जायचं म्हणून त्यांनी राज्यसेवेची मुलाखत दिली. तिथ अपयश आल्यानंतर वेगळं काहीतरी करायचं म्हणून सतीश मगर पुन्हा आपल्या मातीकडे आला. आपल्या दिडशे एकरच्या जमिनीच्या जीवावर त्याने दोनशे गाई विकत घेतल्या. दुग्धउत्पादन चालू झालं. पुण्यातलं पहिलं मिल्किंग मशिन त्यांनीच बसवलं होतं.

याच काळात आपल्या आजूबाजूच्या जमिनी बिल्डरांच्या घशात जात असल्याचं सतीश मगर या तरुणाला दिसत होतं.

एकीकडे जवळच असणाऱ्या पुण्यात गुतंवणूकीतून उत्तम पैसा मिळवणाऱ्या कंपन्या दिसत होत्या, नवनवे व्यवसाय दिसत होते तर कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमीनी घेवून त्यावर प्रकल्प उभा करणारे दिसत होते. आज्या, पणज्यापासून कसत असलेल्या जमिनी विकून त्यातून आलेला पैसा उडवणारी पिढी देखील त्यांच्याच पुढे होती. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्या आजूबाजूला मुळशी पॅटर्न ची पहिली पिढी जन्म घेत होती. 

Screen Shot 2018 12 17 at 8.13.01 PM

१९८५ सालाच्या सुमारास या तरुण पोराच्या पुढच चित्र गुठेंवारीच होतं. जमिन विकावी आणि मज्जेत जगाव हे जगण्याचं सोप्प गणित त्याच्याही पुढे होतं. पण त्या शेतकऱ्याच्या पोराला कळलं,

जमीन हि विकायची नसती, ती राखायची पण नसते, ती डेव्हलप करायची असते. ती पण आपल्याच नावानं.. 

सतिश मगर वेगवेगळ्या ठिकाणी हातपाय मारत असतानाच डोक्यात मगरपट्टा सिटीची आयडिया आली होती. १९९० च्या सुमारास हि आयडिया कागदावर येण्यास सुरवात झाली. स्वत:ची दिडशे एकर जागा सुद्धा खूप मोठ्ठी होती पण या माणसानं आसपासच्या १२० कुटूंबाना विश्वासात घेतलं. 

चटकन पैसै होवू आणि मोकळे होवू म्हणून अनेकांनी विरोध केला पण सतीश मगर नावाचा तरुण त्यांना मालक बनवण्याचं स्वप्न घेवून मैदानात उतरला होता. त्याला माहित होतं प्रश्न हातात कोयते, दगड आणि बंदुका घेवून सुटत नाहीत. आपल्याच आजूबाजूच्या शेतकऱ्यांसोबत त्याने बोलण्यास सुरवात केली. कित्येक बैठका घेतल्या. लोकांच्या बांधाबांधावर गेला आणि १२० कुटूंबाना तयार केलं. ४३० एकरच्या जागेवर १२० कुटूंबानी दोन दिवसामध्ये सह्या केल्या. तेव्हा त्यांना देखील माहित नव्हतं आपली पुढची पिढी या इतक्या मोठ्या कंपनीची मालक होणाराय. 

सगळे कागदपत्र घेवून हा तरुण शरद पवारांच्या पुढ्यात उभा राहिला. शरद पवारांनी त्याला विचारलं सिरीयस आहात का? तरुण हो म्हणाला आणि कागदावर सह्या झाल्या. पुण्याच्या आजूबाजूच्या जमीनी बिल्डरच्या घश्यात जात असताना हजारो शेतकरी एका कंपनीचे मालक होत होते. 

आजचं हडपसर १९९९ साली देखील तस नव्हतं हे एखाद्याला सांगितल तर पटणं अवघड. या तरुणाने शहराबाहेरच शहर म्हणून मगरपट्टा सिटी डेव्हलप करण्यास सुरवात केली. 

अखेर ३ डिसेंबर १९९९ रोजी मगरपट्टा सिटीची पहिली कुदळ पडली. २००० साली निवासी प्रकल्प आणि २००१ साली पहिली आयटी कंपनी या सिटीत आली.

आज मगरपट्टा सिटीत १५ स्क्रिनच भारतातील पहिलं आतंराष्ट्रीय स्तरावरचं थिएटर आहे, मगरपट्टा सिटी पब्लिक स्कुल, नोबेल हॉस्पीटल, सिझन मॉल अशा कित्येक गोष्टींनी परिपुर्ण असणारी मगरपट्टा सिटी हा आश्वासक ब्रॅण्ड आहे. अब्दुल कलाम यांच्या टार्गेट थ्री बिलीयन या पुस्तकात मगरपट्टा सिटीवर खास प्रकरण आहे. इंग्लडमधून सर्वात आश्वासक ब्रॅण्ड म्हणून या सिटीला गौरवण्यात आलं आहे. 

मगरपट्टाची महती ऐकून सिंहगडच्या पायथ्याला असणाऱ्या नांदेड गावच्या शेतकऱ्यांनी देखील मगर यांच्याकडेच धाव घेतली. त्यातून नांदेड सिटी या नव्या प्रकल्पास सुरवात झाली. २०१० सालापासून नांदेड गावचे ९०० शेतकरी कंपनीत भागीदार झाले. मोठ्या विश्वासाने शेतकरी जमीन विकायला नाही तर मालक व्हायला सतीश मगर यांच्याकडे येवू लागले. 

या यशोगाथेमुळे काय झालं तर शेतकऱ्याची कित्येक पोरं मालक झाली. आपल्या धोतराचा सोगा संभाळत हक्कानं माझी कंपनी म्हणणाऱ्या म्हाताऱ्याने आपल्या गावात सिटी आणली होती. ते पण मालक होवूनच. आणि हे सगळं त्या एकट्या दादामुळे शक्य झालं होतं. मुळशी पॅटर्नच्या राड्यात हातात बंदुक न घेता लढलेल्या सतीशदादा मगर यांच्यामुळे  मगर पॅटर्न नावाच मॉडेल जगङभऱात गौरवलं गेलं.

हे ही वाचा. 

4 Comments
  1. Chetan pandit says

    Satiesh dada city Pune’s only one good

  2. Sanjay Khandare says

    खरच सतिषददा ग्रेट आहेतच …Oroud of you dada
    दादा आमच्या विधर्भा मधे असे काहीतरी करा

Leave A Reply

Your email address will not be published.