संगीत जर धर्म असेल तर रफी त्याचा देव होता.

पन्नासचं दशक. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचा काळ.

विजय भट्ट नावाचा दिग्दर्शक चित्रपटाची जुळवाजुळव करत होता. त्याला भारतात आता पर्यंत झाला नव्हता असा सर्वोत्कृष्ट म्युजीकल बनवायचा होता. चित्रपटाचं नाव होत बैजू बावरा. अकबराच्या दरबारातल्या नवरत्नापैकी एक तानसेनाचे गर्वहरण करणाऱ्या बैजू बावरा .

आधी या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी दिलीप कुमार आणि नर्गिसची निवड केली होती पण काही कारणामुळे त्यांना हा रोल करणे जमलं नाही. त्यांच्या ऐवजी आले भारतभूषण आणि तेव्हा नवोदित असणारी मीनाकुमारी. फिल्मच्या कास्टसाठी विजय भट्टने तडजोड केली पण संगीतासाठी त्याला तडजोड मान्य नव्हती. त्याला संगीतकार म्हणून नौशादच हवे होते.

शास्त्रीय संगीतावर पकड असणारे नौशाद हे त्याकाळातले सगळ्यात बेस्ट संगीतकार होते.

नौशाद यांच्या सोबत जेष्ठ शास्त्रीय गायक उस्ताद अमीर खां साहेब आणि डीव्ही पलूस्कर हे संगीताच्या बाबतीत सल्लागार म्हणून असणार होते. सुरवातीला अनेकांनी शुद्ध शास्त्रीय संगीत सामान्य प्रेक्षकाला कळणार नाही म्हणून विजय भट्टला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ठाम होता. नौशादवर त्याचा विश्वास होता.

नौशाद हे आपल्या कडक स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांना गाण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा आवडायचा नाही. संगीत हाच त्यांचा धर्म आणि रेकोर्डिंग स्टुडिओ हे मन्दिर असल्यासारखं होत.

असं म्हणतात तलत मेहमूद हा त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये गाणी गायचा पण एकदा नौशाद यांनी त्याला स्टुडीओमध्ये सिगरेट पिताना पकडलं आणि त्याला परत कधीच आपण दिलेल्या संगीतामध्ये गाण्याचा चान्स दिला नाही.

तलत मेहमूदच्या नौशादनी केलेल्या सुट्टीनंतर आला मोहम्मद रफी.

मोहम्मद रफी यांच्या रेशमी आवाजाला शास्त्रीय संगीताच्या रियाजाची बैठक होती. लहानपणी रस्त्यावर फकिराच गाणं ऐकून गाण्याची आवड निर्माण झालेला रफी खऱ्या आयुष्यात देखील एखाद्या फकिरासारखा राहायचा.  नौशाद यांच्या सोबत लगेच त्याचे सूर जुळले.

सिनेमामध्ये जवळपास तेरा गाणी होती. प्रत्येक गाण एका शास्त्रीय रागावर बांधलं होत. नौशाद यांनी रचलेल्या अवघड चाली गाताना लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांना सुद्धा मेहनत घ्यावी लागत होती. याच चित्रपटात एक भक्तीगीत होत,

“मन तडपत रे हरी दर्शन को आज.”

या गाण्याच वैशिष्ठ्य म्हणजे हे गाण लिहिणारा शकील बदायुनी याच शिक्षण उर्दू मिडीयम मध्ये झालं होत. तरीही शुद्ध हिंदीमध्ये त्यानं हे भक्ती गीत लिहून दिल होत.

मन तडपत रे हे गीत नौशाद यांनी मालकंस रागात बांधलं होत. त्याकाळात पूर्ण गाण एका टेक मध्ये रेकोर्ड केलं जायचं. गायक वादक आधी सराव करूनच मग रेकॉर्डिंग ला उभे राहायचे. एक छोटीशी चूक सुद्धा परवडणारी असायची नाही. मोहम्मद रफी यांचं हे सोलो गीत होत. याची तयारी बऱ्याच दिवसापासून सुरु होती.

रेकोर्डिंगच्या दिवशी एक वेगळाच माहोल बनला होता. “मन तडपत रे हरी दर्शन को” च्या शब्दांनी एक निराळीच जादू केली होती. त्या दिवशी रफी देहभान हरपून गात होते. गाताना एक ओळ आली ,

“तुम्हरे द्वार का मै हुं जोगी हमरी ओर नजर कब होगी”

मोहम्मद रफी यांच्या डोळ्यात पाणी आले. गळा दाटून आला. त्यांना पुढे गाताच येईना.रफीला कुठली तरी दैवी तंद्री लागली होती.

स्टूडिओ मधले सगळे कलाकार रफीचं हे रूप पहिल्यांदाच अनुभवत होते. नौशाद यांनी रेकॉर्डिंग थांबवलं. सगळ्यानाच कळेना नेमक काय होतय. रफींच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्यांनी सगळ्यांची माफी मागितली.त्या दिवशीच रेकॉर्डिंग कन्सल करण्यात आलं. रेकॉर्ड कॅन्सल म्हणजे बराच मोठा भुर्दंड होता मात्र रफीने स्वतःच्या खिशातून पैसे घातले. दुसऱ्या  दिवशी परत रेकॉर्डिंग झाली.

पिक्चर रिलीज झाल्यावर सगळी गाणी गाजली. मोहम्मद रफीच्या आवाजातलं ओ दुनिया के रखवाले सुपरहिट झालं. पण मन तडपत रे हरी दर्शन को ने इतिहास घडवला. तिन्ही मुस्लीम कलाकारांनी बनवलेलं हे भक्ती गीत गावोगावच्या मंदिरात वाजवलं जात होत. भारतीय सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाचा हा अविष्कार होता.

याचं गीतानं मोहम्मद रफीला भारताच्या चित्रपटसंगीतातला देव म्हणून स्थान मिळवून दिलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.