पुणेकरांना मिळालेल्या टॅक्स कन्सेशनमधूनच सदाशिव पेठ तयार झाली

अस्सल पुणेकर कुठे मिळतील? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर एकच उत्तर मिळेल भिडू ते म्हणजे  सदाशिव पेठ. पुणेरी पाट्या, पुणेरी मंडळी, पुणेरी जेवण, जुन्या पुण्याच्या खाणाखुणा अजूनही जिवंत ठेवणार असं हे ठिकाण. आता सध्या हे स्पर्धा परीक्षांच्या पोरा-पोरीचं राहण्याचं- खाण्याचं ठिकाण म्ह्णूनही ओळखलं जात. म्हणजे गल्लीबोळातलं हॉस्टेल आणि मेससाठी. 

असो, तर प्रत्येकाच्या मुखात आणि आठवणीत असणाऱ्या या इन्टरेस्टिंग सदाशिव पेठेच्या तयार होण्याची स्टोरी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. 

तर अडीचशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जेव्हा नानासाहेब पेशव्यांनी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची प्रथा सुरू केली होती. आणि हे फक्त पुण्यातल्याच नाही तर आसपासच्या भागातील विद्वान ब्राह्मण सुद्धा दक्षिणेसाठी पुण्याची वारी करू लागले. 

सुरुवातीला पेशवे शनिवारवाड्यातच दक्षिणा वाटप करायचे. पण या प्रथेच्या बोलबाल्यामुळे प्रचंड गर्दी वाढली. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्ह्णून रमणबागेत सोय केली गेली. पण तिथंसुद्धा जागा पुरेना म्हणून नानासाहेबांनी पर्वतीच्या पायथ्याशी प्रशस्त असा रमणा बांधला. 

दरम्यान, ही श्रावणमासातली दक्षिणा पदरी पाडून घेण्यासाठी अनेक परप्रांतीय ब्राह्मण सुद्धा पुण्याकडे वळायला लागले. तेलंगण म्हणजे सध्याच्या कर्नाटक प्रांतातून तर अशा ब्राह्मणांची मोठी रांग लागायची. ज्यांना ‘तेलंगी ब्राह्मण’ असं म्हंटल जायचं. आता या सगळ्यांना राहण्याचा प्रश्न उभं राहिला. 

त्या वेळी आंबिल ओढा भर गावातून, म्हणजेच सध्याच्या बाजीराव रस्त्याच्या मार्गावरून वाहत अमृतेश्वरापाशी मुठा नदीला मिळायचा. ओढ्याला भरपूर पाणीही असायचा. थोडक्यात काय तर हा ओढा पुण्याच्या परिसराची पूर्व-पश्चिम भागांत विभागणी करत असे.  म्हणजे पूर्वेला पुणे शहर आणि पश्चिमेचा सगळा परिसर डोळ्यांना सुखावणाऱ्या बागांनी व्यापलेला असल्याने, या भागात ब्राह्मणांनी तळ ठोकणे स्वाभाविकच होते.

कर्नाटकात ‘कारकल’ नावाचे गाव अद्यापही आहे. दगडी खोदकामाच्या सुंदर मूर्ती तयार करण्यात या गावाची मंडळी अग्रेसर आहेत. या गावातील ब्राह्मणांचा एक जथा एकमेकांच्या सोबतीने श्रावण महिन्यात दक्षिणेसाठी पुण्यात येत असे.

त्यांचा मुक्काम आंबिल ओढ्याच्या किनारी भागात व्हायचा. वर्षानुवर्षं ही प्रथा चालू होती. त्यामुळे या भागाला आपोआपच ‘कारकलपुरा’, असे नाव पडले. पूढे बोली भाषेतील उच्चारानुसार ‘कारकल’चे ‘कारकोळ’ झाले. तत्कालीन कागदपत्रांतून कारकोळपुरा असा उल्लेख अनेक ठिकाणी आहे.

 सध्याच्या खुनांनवरून सांगायचं झालं तर ही जागा शनीच्या पारापलीकडे खुन्या मुरलीधराच्या देवळापर्यंतच्या परिसरात होती असे म्हणता येईल. थोडक्यात सांगायचे तर सध्याची टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची इमारत ते बाजीराव रस्ता या भागात कारकोळपुऱ्याची सुरुवातीची वस्ती होती. 

या भागाला अगदी कालपरवापर्यंत ‘लोणीविके दामले आळी’ म्हणत. आता असे म्हणताना हे दामले कोण आणि ते लोणी का आणि कुठे विकायचे असा प्रश्न मनाला पडला, तर त्यांचे मंडईत लोणी विकायचे दुकान होते व ते या गल्लीत राहायचे हे उत्तर आहे.

इ.स. १७५५च्या सुमारास आंबिल ओढा गावातून वाहणे बंद करून त्याचा प्रवाह पर्वती तळ्यापाशीच वळवण्यात आला. पुण्याची या बाजूची वाढ थांबवणारा हा अडसर दूर झाल्याने पुण्याची वस्ती या बाजूला पसरणे साहजिकच होत . पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊंच्या स्मरणार्थ कारकोळपुऱ्याच्या जागी नवीन पेठ वसवायचे थोरल्या माधवराव पेशव्यांनी ठरवले आणि त्यानुसार दि. १९ ऑगस्ट १७६९ मध्ये त्यांनी सदाशिव पेठेत नवी वसाहत व बाजार उभारण्यासाठी कौल दिला.

 सदाशिव पेठ वसवण्याचा एक कौल इ.स. १७४५च्या आसपास दिल्याचे आढळते. त्याप्रमाणे नायगाव या गावी सदाशिव पेठ वसली, असा निष्कर्ष काहींनी गृहीत धरला आहे. दरम्यान हे नायगाव सांडस तालुक्यात होते. सांडस तर्फ ही पुण्याच्या विरुद्ध टोकाला असून उरळीकांचन, यवत या भागाला ते नाव होते. त्यामुळे त्या भागातील नायगावात सदाशिव पेठेची वस्ती करण्यासाठीचा हा कौल आहे. त्या नायगावचा पुण्याच्या सदाशिव पेठेशी काहीही संबंध नाही.

कारकोळपुऱ्याचा परिसर उत्तमोत्तम बागांनी वेढलेला होता. विश्रामबाग वाड्याच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या ठिकाणी सावकार दादा गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या पलीकडे रास्त्यांची बाग, अलीकडे नगरकरांची बाग अशी बांगाची रेलचेल असलेली ही जमीन, नवीन पेठ वसवण्याच्या दृष्टीने अगदी योग्य होती.

परंतु लोकांना ही जागा गावापासून लांबच वाटायची म्हणून माधवरावांनी नव्या वस्तीसाठी सात वर्षं करमाफी दिली. मग मात्र, सदाशिव पेठेची वस्ती हळू हळू वाढू लागली. सुपीक जमीन, मोकळे वातावरण, हिरव्यागार बागांची सोबत पुणेकरांना भावली. गावातल्या इतर पेठांतील गर्दीपिक्षा सदाशिव पेठेत वाडा बांधणे जास्त सुखाचे वाटू लागले.

आज जसे पुणेकर बावधन, पाषाण, सूस, आंबेगाव, धायरी अशा ठिकाणी हौसेने घरे बांधतात, तीच परिस्थिती दोनशे वर्षापूर्वी होती. तथापि, सदाशिव पेठ खऱ्या अर्थाने वसली ती सवाई माधवरावांच्या काळात, विशेषत: इ.स. १७८० नंतरच्या काळात.

माधवराव पेशव्यांच्या काळात, तेलंगणातील कृष्णशास्त्री व सदाशिवशास्त्री द्रविड हे दोन विद्वान पंडित पुण्यात स्थायिक झाले. तेव्हा पूर्वापार वहिवाटीप्रमाणे त्यांनी कारकोळपुऱ्यातच गद्र्यांच्या बागेसमोरील जागा पसंत केली. आपल्या घराबरोबरच त्यांनी श्रीकृष्णेश्वराचे देऊळही बांधले. सदाशिव पेठेचा हौद झाल्यावर त्यांनी हौदाकडे जाणाऱ्या नळाद्वारे पाणी मिळवून या जागी एक हौदही बांधला होता.

द्रविडांच्या हौदाच्या पश्चिमेला लागून नारो रघुनाथ साठे यांनीही आपल्या घराबरोबरच शरमीच्या झाडाखाली श्रीमोरेश्वर गणपतीचे सुरेख छोटेखानी मंदिर उभारले. आज मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नाही.

इ.स. १८०७ मध्ये पेठेच्या उत्तर नाक्यावर फडक्यांच्या बागेत दुसऱ्या बाजीरावाने सुप्रसिद्ध विश्रामबाग वाडा बांधला. त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांनीही आपापले वाडे बांधून पेठ सजवली. कारकोळपुऱ्याची आठवणही पुसट होत गेली.

शनिपार, गायआळीपासून चिमण्या गणपतीपर्यंतच्या भागात भरपूर वाडे बांधले गेले. पेठ गजबजली.  पेठेची वस्ती वाढत गेली तरी, इ.स. १९२५च्या सुमारासही पेरूगेट, पावनमारुती, टिळक स्मारक मंदिरापासून थेट भिकारदास मारुतीपर्यंतच्या परिसरात अजिबात वस्ती नव्हती, याचे आज आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.

वस्ती वाढूनही सदाशिव पेठ आपली ऐट बाळगून होती. कारण, या पेठेने पुणेकरांना अनेक थोर मंडळी दिली. राजकारण, समाजकारण, साहित्य, नाट्य, चित्र, कला, संशोधन अशा अनेकविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी सदाशिव पेठेतलीच. अनेक नावारूपाला आलेल्या संस्थांचीही मुळे रुजली ती याच पेठेत. म्हणूनच सदाशिव पेठेला आजही एक वेगळेच वलय आहे. 

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मात्र ओनरशिप स्कीम इमारतींमुळे सदाशिव पेठ आमूलाग्र बदलली. जुन्या गल्ल्या आता रुंद झाल्या तशाच त्या परक्याही वाटू लागल्या. गाय आळी, डोलकर आळी, लोणीविके दामले आळी, अशा जुन्या आठवणी बुजत चालल्या. पुष्करणी होदाच्या रस्त्याचा दिमाख संपला. महत्त्व लक्ष्मी रस्त्याला आले.

 नानांनी हौसेने उभारलेल्या हौदाचे अस्तित्व केवळ मोक्याची जागा अडवणारी अडगळ म्हणून शिल्लक राहिले. आपल्या पेठेचा अभिमान बाळगणारी सदाशिव पेठेतली पारंपरिक पुणेकर मंडळीही, दूरवरच्या कोथरूडसारख्या उपनगरात हलली.

आज द्रविडांचा हौदही नाही, भुताच्या वाड्याच्या जागी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची इमारत आहे. आता फक्त सदाशिव पेठेचे नाव आणि कर्तृत्वाचे अदृश्य वलय बाकी उरले आहे. ते पुढे चिरंतर राहीलही कदाचित; परंतु या पेठेचा पाया घालण्याचे काम करणाऱ्या चिमकुल्या कारकोळपुऱ्याची आठवण कोण जपणार?

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.