विश्वास ठरावासाठी लपून राहिलेल्या आमदारांच्या चट्ट्यापट्टयाच्या चड्ड्या टिव्हीवर झळकल्या.

राजकारणातली सर्वात अवघड गोष्ट कोणती. आमदार निवडून आणणे, तिकीट वाटप करणे, सभा गाजवणे, मतदार फोडणे तर नाही. या गोष्टी राजकारण्यांसाठी शुल्लक असतात. त्यांच्यासाठी सर्वात झिट आणणारी गोष्ट असते ती म्हणजे निवडून आणणारे आमदार टिकवून ठेवणे. 

कुठला आमदार कसा फुटेल हे कुणाच्या बापाला सांगता येत नाही. विधानसभेत जेव्हा विश्वासठराव मांडण्यात येतो तेव्हा आपल्या पक्षाच्या आमदारांना सुमडीत कुठेतरी घेवून जाण्याचा डाव प्रत्येक पक्ष करतो. राज्याची सध्याची वाटचाल देखील त्याच दिशेने चालू आहे. शिवसेनेचे आमदार फुटतील अशी भिती भाजपनेच घातली आहे. त्यात भाजप काठावरून बराच लांब असल्याने भाजपचं लक्ष इतर पक्षांच्या आमदारांवर असणार हे साहजिक आहे. अशा वेळी आपले आमदार फुटू नयेत म्हणून प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. 

असाच किस्सा २००२ साली झालेला.

तेव्हा कॉंग्रेस राष्ट्रवादीची चांगलीच लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना विश्वास ठराव जिंकायचा होता. त्यांच्याकडे काठावरचं बहुमत होतं. टोटल १० अपक्षांपैकी हर्षवर्धन पाटील आणि शिवाजी कर्डिले हे दोनच अपक्ष कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून होते. अशा वेळी आपले आमदार सुमडीत गायब करणं हा एकच ऑप्शन सत्ताधाऱ्यांकडे होता. 

ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने आपले आमदार मध्यप्रदेशात पाठवले. कॉंग्रेसच्या आमदारांची जबाबदारी तत्कालीन संसदिय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. 

कॉंग्रेसने सर्व आमदारांची रवानी बंगलोरच्या संजय खान यांच्या गेस्टहाऊसवर केली. आत्ता तुम्ही म्हणाल हे सगळं फुकट असेल. तर भिडूंनो हर्षवर्धन पाटील सांगतात त्या प्रमाणे हे विश्रामगृह काय फुकटात नव्हतं. इथे रोजचं भाडं तीन लाख होतं.

ठरलं, सर्व कॉंग्रेसचे आमदार संजय खान यांच्या विश्रामगृहावर आले. 

इथे आल्यानंतर पहिला प्रश्न आला तो म्हणजे कमी खोल्यांचा. अशा वेळी प्रत्येक आमदार पिकनिकला आल्याप्रमाणे वागत असतो. तो जर म्हणला इथे काय आपल्याला करमत नाही तर बसा बोंबलत. म्हणून आमदारांच्या सर्व सोयी कराव्या लागतात. पण खोल्या कमी असल्यामुळे रिक्वेस्ट करुन एका खोलीत दोन आमदारांच्या मुक्कामाची सोय कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली. आमदरांनी देखील नाही होय म्हणत मोठ्या उदार मनाने या एकत्र राहण्यास मंजूरी दिली. 

झालं आत्ता दोन चार दिवसात मुंबईला जायचं आणि मतदान करायचं असा बेत ठरलेला. तोपर्यन्त प्रत्येकासाठी ही पिकनिकच होती. अशातच हे गेस्टहाऊस म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलच होतं.

इथे भल्लामोठ्ठा स्विमिंगपूल होता. 

सकाळ पहायची नाही का दूपार पहायची नाही मस्तपैकी स्विमिंगटॅंकमध्ये गावाकडच्या विहरीत गड्डे मारतो तसे मारायचे आणि मधुकर चव्हाण, आनंदराव देवकाते असे आमदार तर धोतर नेसायचे. धोतर सोडून स्विमिंगपूल शेजाची ललनांना बिकनीवर झोपण्यासाठी जे आडवे स्टाईलीश बाकडे असतात त्यावर असे धोतर वाळत घातलेले असायचे. गॅलेरीतून एक्स्ट्रा चट्ट्यापट्ट्याच्या चड्या आणि बंड्या तर असायच्याच. 

थोडक्यात सांगायचं झालं तर एका फाईव्ह स्टार जागेचा आठवडी बाजार करण्यात आला होता. पण अशा वेळी एटिकेक्ट्स सांगून धावती गाढवं अंगावर कोण घेणार. अगोदरच आमदारांची किंमत वाढलेली होती. त्यात एखाद्याला नाराज करणं म्हणजे सरकार घालवल्यासारखं होतं. 

आत्ता बिकनी घालून ललना झोपायच्या ठिकाणी उघडेबंब देश घेवून चट्टापट्यांवर बसलेले आमदार अचूक टिपले ते मिडीयाने. आजतकचा कॅमेरामन तिथे पोहचला व सर्वकाही शूट करून मस्तपैकी हिंदीत पॅकेज तयार केलं. 

काही वेळातच उन्ह खात बसलेले आमदार, वाळत घातलेले धोतर. रंगेबेरंगी चड्या टिव्हीवर झळकू लागल्या. 

बातमी लागल्या लागल्या सोनिया गांधींनी विलासरावांना फोन केला आणि म्हणाल्या,

काय चाललय हे, तुम्ही पाहताय का? 

विलासरावांनी तातडीने हर्षवर्धन पाटलांना फोन केला. हर्षवर्धन पाटलांनी टिव्ही लावला. टिव्हीवरची बातमी पाहून त्यांच्या — फ्यूजा उडाल्या ओ. 

हर्षवर्धन पाटलांनी प्रत्येकाला बाजूला घेवून न दुखावता तुमच्या चड्या टिव्हीवर गेल्याची माहिती दिली. प्रत्येकाने मनातल्या मनात चांगल वागायचा पण केला आणि प्रकरणावर धोतर टाकण्यात आलं. पुढे सर्वजण मुंबईच्या ताज हॉटेलला राहिले आणि कॉंग्रेसचं सरकार तरलं. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.