एबी फॉर्म म्हणजे काय…? 

नमस्कार कार्यकर्त्यांनो तुमच्या नेत्याला AB फॉर्म मिळाला काय. बघितला काय AB फॉर्म कसा असतो. च्या गावात नेत्याचा डावा उजवा हात असून देखील तुम्हाला अजून AB फॉर्म बघायला मिळाला नाही. अवघडय लेकांनो. असो जिथ कमी तिथं आम्ही हे निर्विवाद सत्य आहे. 

आज तुम्हाला सांगतो AB फॉर्म म्हणजे काय ? 

अब्बास मस्तान माहिती आहेत काय. ते सिनेमाचे डायरेक्टर. आत्ता सांगा अब्बास मस्तान एक आहेत की दोघं. आजही अनेकांना अब्बास मस्तान एकच माणूस वाटतो. पण ते दोन आहेत. पांढऱी कपडे घालून एकसारखी दिसणारी दोन माणसं. सख्खे भाऊ.

असच AB फॉर्मच आहे. AB फॉर्म अनेकांना एकच वाटतो. पण AB फॉर्म म्हणजे A आणि B फॉर्म. A वेगळा आणि B वेगळा. 

आत्ता A फॉर्म म्हणजे काय ? 

A फॉर्म म्हणजे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मिळालेला फॉर्म. हा फॉर्म कुठलाही राजकीय पक्ष देवू शकतो. कुठलाही म्हणजे राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष किंवा निवडणुक आयोगाकडे नोंदणी केलेला पक्ष. या फॉर्मवर सही कुणाची असते तर पक्ष अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाने नेमणुक केलेल्या संबधित पदाधिकाऱ्याची. या A फार्मवर असणारी सही ही पक्की असावी लागली.

म्हणजे सहीची झेरॉक्स चालत नाही. सही सोबत पक्षाचा शिक्का असतो. तो देखील पक्षाचा असावा लागतो. त्याची देखील झेरॉक्स प्रत चालत नाही. खरं म्हणजे एकदम खरं लागत या फॉर्मवर. 

B फॉर्म म्हणजे काय ? 

A च सहाय्यकारी क्रियापद म्हणजे B फॉर्म. ज्याप्रमाणे मोदींसाठी अमितशहा त्याप्रमाणेच A साठी B फॉर्म. या फॉर्मवर पर्यायी उमेदवाराच नाव असतं. उमेदवारी फॉर्म भरणं म्हणजे सबसिडीचा गॅस मिळवण्यापेक्षा अवघड काम असत. त्यात एकही गोष्ट चुकली तर अर्ज थेट बाद.

माणूस निवडणुकीच्या रिंगणातून थेट घरला. आत्ता मॅटर असा असतो की विरोधक भरलेल्या फॉर्मची अचूक माहिती घेतात आणि आपले गुप्तहेर पेरतात. नावावर असलेल्या गुन्ह्यांपासून ते किती पैसे आहेत याची माहिती विरोधकांना असते. छोटी मोठ्ठी चूक देखील महागात पडू शकते. अर्ज बाद झाला की निवडणूकीतून थेट बाहेरचा रस्ता. एक रुपया खर्च व न करता उमेदवार घरी जाण्याची पाळी येवू शकते. म्हणून पक्षाला पर्यायी उमेदवारीची सोय करावी लागते.

A सोबत देण्यात येणारा पक्षाचा पर्यायी उमेदवार म्हणजे B फॉर्म. या फॉर्मवर पर्यायी उमेदवाराचं नाव असत. समजा मेन माणूस गळपटला तर पर्यायी माणूस म्हणून तो पक्षाचा अधिकृत उमेदवार होता. त्याला पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळतं. 

विधानपरिषद व राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये हेच AB फॉर्म AA किंवा BB म्हणून ओळखले जातात. AB फॉर्म पक्षाकडून मिळत नाही तोपर्यन्त पक्षाच तिकीट मिळत नाही अस असतय ते. पक्षाच तिकीट मिळालं म्हणजेच हा AB फॉर्म मिळाला. 

बर सर्वात महत्वाच म्हणजे AB फॉर्म ओरीजनल लागतो. फॅक्स चालत नाही. अर्ज जमा करण्याच्या शेवटच्या दिवशी ३ वाजेपर्यन्त AB फॉर्म जमा केला तरी चालतो. पण सही, शिक्का सगळं कस ओरीजनल पाहीजे. 

आत्ता त्याहून महत्वाचं म्हणजे,

जो उमेदवार पक्षाचा AB फॉर्म मिळवण्यासाठी वाट बघत बसला आहे त्याला ही माहिती वाचायला द्यायची. त्याचा सध्या वेळ जात नसेल. अशा वेळी हि माहिती अधिक गरजेची ठरेल. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.