एका जैन माणसाने मुस्लिमांसाठी सत्यशोधक मंडळ सुरु करण्यात सिंहाचा वाटा उचलला.

२२ मार्च १९७०. पुण्यात भाई वैद्य यांच्या माडीवर इंडियन सेक्युलर सोसायटीच्या कार्यकर्त्यांची बैठक बसली होती. यात त्याकाळचे समाजवादी समतावादी नेते देखील हजर होते. महात्मा फुलेंच्या पासून सुरु झालेला प्रबोधनाचा सत्यशोधकी विचार अजूनही मुस्लिम समाजापर्यंत पोहचू शकलेला नाही,  सेक्युलरिझम, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मवादी राजकारण, परंपरा-अंधश्रद्धा याच्यवर मुस्लिम समाजात चर्चाच होता नाही याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.

यातूनच हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली एक नवी संघटना स्थापन करायचं ठरलं. बाबा आढाव यांनी नाव सुचवलं,

“मुस्लिम सत्यशोधक मंडळ” 

१९६६ साली हमीद दलवाई यांनी सात मुस्लिम महिलांना सोबत घेऊन तीन तलाकच्या विरोधात जे ऐतिहासिक आंदोलन केलं होतं त्याच पुढचं पाऊल म्हणून या संघटनेला ओळखलं गेलं. मुस्लिम स्त्रीपुरुषांचे संवैधानिक अधिकार आणि समान नागरी कायदा यांसाठी हे मंडळ आघाडीवर होतं. यासाठी त्यांनी मोर्चे काढले. परिषदा भरवल्या. तलाक-पीडित स्त्रियांना बोलतं केलं.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेत सिंहाचा वाटा असणारी हमीद हलवाई यांच्या पाठीशी उभी राहणारी मातृसंस्था म्हणजे इंडियन सेक्युलर सोसायटी. दलवाई तिचे उपाध्यक्ष होते तर अध्यक्ष होते अ.भि.शहा.

हमिद दलवाई ज्यांना आपले गुरु मानतात ते अ.भि. शहा कोण होते?  

२ सप्टेंबर १९२० रोजी गुजरातच्या कर्मठ दिगंबर-जैन कुटुंबात जन्मलेल्या अमृतलाल भिकाभाई शहा यांचा लहानपणापासून ओढा नास्तिकतेकडे होता. रूढी परंपरा कर्मकांडाचा भार त्यांनी खूप कवी वयात झुगारून लावला होता. त्यांची या सर्वाकडे पाहण्याची वृत्ती चिकीत्सक होती.

शाळेत मात्र ते प्रचंड हुशार होते. मॅट्रिकच्या परीक्षेत गुणवत्तायादीत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता.

शालेय जीवनात अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके याव्यतिरिक्त आपण कोणती पुस्तके वाचतो, याचा परिणाम विचारांवर होतो. शहा यांनी वयाच्या सतराव्या वर्षी हॅकेल यांचे ‘द रिडल ऑफ युनिव्हर्स’ आणि हेमन लेव्ही यांचे ‘द युनिव्हर्स ऑफ सायन्स’ वाचले होते. या वाचनाचा परिणाम म्हणजे- आत्मा किंवा देव या कल्पना फक्त मनात असतात; मनाबाहेरच्या जगात त्यांचे अस्तित्व नसते, हे त्यांना उमगले.

यासोबत ज्येष्ठ मानवतावादी विचारवंत एन.एम.रॉय यांच्या साहित्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकला. यातूनच ते प्रबोधनाच्या चळवळीशी जोडले गेले. 

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधन संस्थेची स्थापना १९५० मध्ये झाली.अ.भि. शहा या संस्थेच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होते. आधुनिक समाजाविषयीचे चिकित्सक विचार आणि मानवी मूल्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या संस्थेमार्फत करण्यात येत असे.

ए.बी.शहा यांनी हिंदू जैन मुस्लिम या धर्माचा चिकित्सक अभ्यास सुरु केला. यातूनच त्यांची आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांची मैत्री झाली. दोघांच्या अखंड चर्चा व वाद चालत असत. दलवाई यांच्यामुळे शहा हे मुसलीम जीवनपद्धती त्यांच्यातील समस्या याकडे ओढले गेले. 

१९६७ साली या दोघांनी मिळून इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना केली. 

हाराष्ट्रात १९७० साली जेव्हा धार्मिक दंगली झाल्यातेव्हा शहा यांनी सेक्युलॅरिस्टमध्ये हिंदू जमातवादाचे प्रणेते हा लेख लिहिला. त्यात त्यांनी दयानंद सरस्वतीवि.दा.सावरकर आणि गोळवळकर गुरुजी यांच्यावर कडाडून टीका केली. धर्मांधता माणसाच्या मनात रुजलेली असते. त्यामुळे जमातवादी मानसिकतेशी युद्ध मानसिक पातळीवरच केले गेले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.

धार्मिकतेबद्दल प्रखर विचार असणारे व तितक्याच कठोर शब्दात त्यावर प्रहार करणारे अ.भि.शहा हे हमीद दलवाई यांचे गुरु मानले जात.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेत शहा आणि इंडियन सोसायटीचा मोठा वाटा होता. या दोन संस्थांच्या वतीने अनेक कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्यात आले. समान नागरी कायदा, लोकसंख्यानियंत्रण, विज्ञाननिष्ठ आधुनिक शिक्षणावर मंडळाने घेतलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेवरील अनेक कार्यक्रम आणि या संदर्भातील लेखन इंडियन सोसायटीमार्फत प्रकाशित करण्यात आले.

 समान नागरी कायद्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते, मात्र या संदर्भातील मसुदा अद्याप कोणीही तयार केलेला नव्हता. सर्व धर्मीयांना आवश्यक असणाऱ्या आणि संविधानाच्या मूलभूत गाभ्याशी बांधील असणाऱ्या समान नागरी कायद्याचा मसुदा अ.भि शहा यांच्या इंडियन सेक्युलर सोसायटीमार्फत प्रकाशित करण्यात आला.

सत्तरच्या दशकात जेव्हा दलवाईनी दिल्लीत अखिल भारतीय आधुनिक विचारवादी मुस्लिम परिषद घेतली तेव्हा त्यांच्या विरुद्ध कर्मठ विचारांच्या मुस्लिमवादी संघटनांनी जोरदार टीका केली. अशावेळी ए.बी.शहा हे दलवाईंच्या पाठीशी उभे राहिले.

अनेकदा मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यक्रमांना शहा हे फरची टोपी घालून येत तेव्हा कित्येकजण त्यांना मुस्लिम समजत आणि हमीद दलवाई यांना हिंदू समजलं जाई.

दलवाई यांच्या अखेरच्या आजारपणात शहा यांनी अनेक खस्ता खाल्ल्या. त्यांचा जीव वाचवण्यासाठी शक्य ती सगळी मदत केली. शरद पवारांच्या मार्फत त्यांचा आर्थिक भार देखील उचलला. त्यांची किडनी फेल गेले असल्याची माहिती कळताच स्वतःची किडनी देखील देऊ केली मात्र हमीद दलवाई या आजारपणातून बाहेर येऊ शकले नाही. त्यांचे अकाली निधन झाले.

दलवाई यांच्या मृत्यूनंतर मुस्लिम सत्यशोधक चळवळ जिवंत राहण्यामध्ये ए.बी.शहा यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण संशोधनातून  Religion and Society in India आणि What Ails our Muslims? अशी अनेक पुस्तके लिहिली. देशभरात एक तत्ववेत्ता म्हणून त्यांना ओळखलं गेलं.

आपले बुद्धिप्रामाण्यवादी विचार आणि पुरोगामीत्व फक्त पुस्तकांपर्यंत ठेवलं नाही तर खऱ्या आयुष्यात देखील त्यांनी जगून दाखवलं. त्यांनी आपल्या मुलाचं लग्न ठरवून एका मुस्लिम मुलीशी केलं होतं. कट्टर जैन कुटूंबात जन्मूनही निरीश्वरवाद जपला आणि  मुस्लिमांच्या कल्याणासाठी प्रबोधनासाठी आयुष्य वेचलं. ११ ऑक्टोबर १९८१ साली त्यांचे निधन झालं.

संदर्भ- शमसुद्दीन तांबोळी साधना मासिक 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.