वृत्तपत्रांच्या स्पर्धेत चौथी पास व्यक्ती आला आणि सर्वांना चारीमुंड्या चित करुन गेला..

टिळकांचा केसरी, अत्रेंचा मराठा, पवारांचा सकाळ, जाधवांचा पुढारी, दर्डांचा लोकमत आणि ठाकरेंचा सामना.

एकाच नाव काढून दूसऱ्याचं घेतलं की दूसरा मुरलेला पहिलवान निघतो. दूसऱ्यांच काढून तिसऱ्यांच नाव घेतलं की तो त्यापेक्षा मोठ्ठा पहिलवान निघतो. वर्तमानपत्र म्हणलं की, त्यांची मालकी नेहमीच राजकीय, उद्योगपती नाहीतर विचारवंत यांच्या हातातच राहिलेली नावेच डोळ्यासमोर येतात.

अशा वेळी कधीकाळी पोटापाण्यासाठी मुंबईत येवून पडेल ती कामे करणारा, चौथी पास अस जुजबी शिक्षण असणारा आणि दूसऱ्यांचे पेपर वितरित करण्याची जबाबदारी घेणारा माणूस पुढे वर्तमानपत्रांचा बादशहा झाला तर… 

आज अशाच एका माणसाने आपल्यातून निरोप घेतला. मुरलीधर शिंगोट अर्थात बाबा शिंगोटे अस त्यांच नाव.

मुरलीधर शिंगोट हे जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर १ चे. जुजबी शिक्षण घेवून या माणसाने पोटापाण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला. सुरवातीच्या काळात पडेल ती कामे केली. फळविक्रेता म्हणून ते काही काळ काम करु लागले. त्यानंतरच्या काळात वर्तमान विक्रेता आणि हळुहळु वर्तमान वितरक अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. 

हळुहळु बस्तान बसत गेलं. त्या काळात गिरगावात दांगट नावाच्या एका व्यक्तीची देखील वर्तमान वितरणाची संस्था होती. शिंगोटे सुरवातीच्या काळात त्यांच्याकडेच पेपर टाकण्याच काम करत असत. पुढे दांगट आणि शिंगोटे या दोन जुन्नरच्या माणसांनी संपूर्ण मुंबईत वितरणाची साखळी उभारली. हळुहळु जम बसवत साधारण तीस वर्षांचा काळ सरला.

या काळात शिंगोटे वर्तमान वितरक म्हणून चांगलाच जम बसवून तयार झालेले होते.

त्या काळात नवाकाळ या वर्तमानपत्राची हवा होती. अग्रलेखांचा बादशहा निळकंठ खाडीलकर यांचा जितका नवाकाळ भरारीला घेवून जाण्यात वाटा होता तितकाच वाटा मुरलीधर शिंगोटे यांचा देखील होता. काही काळातच एका लाखांचा टप्पा ओलांडून पाच-सहा लाखांचा टप्पा या वर्तमानपत्राने गाठला. 

१९८०-९० या काळात गुजरात समाचार, इनाडू, संदेश अशा वर्तमानपत्रांना मुंबईत घरोघरी पोहचवण्याचं श्रेय शिंगोटे यांना दिलं जातं. वितरणाचं काम करणाऱ्या दोनशे तीनशे लोकांची एक फौजचं शिंगोटे यांनी तयार केली होती.

या दरम्यान नवाकाळची जबाबदारी पूर्णपणे शिंगोटे यांच्याकडे होती. अशातच कालनिर्णयचे जयंतराव साळगावकर यांनी देखील मराठी दैनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच्या वितरणाची जबाबदारी मुरळीधर शिंगोटे यांच्याकडे टाकण्यात आली. जयंतराव साळगावकरांच्या नव्या दैनिकांच्या वितरणाची जबाबदारी शिंगोटे यांनी घेतल्याचं समजताच नवाकाळच्या खाडिलकरांनी मुरळीधर शिंगोटे यांच्याकडून नवाकाळचे वितरण मागे घेतले. 

मुरळीधर शिंगोटे यांच्यावर हा एकप्रकारचा अन्याय होता. दोन तीनशे माणसांची फौज उभा करून ते वितरणं चोख पार पाडत असताना असा निर्णय घेण्यात आला. पण मुळातच वर्तमान पत्र कसे खपवायचा अभ्यास असणाऱ्या शिंगोटे यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपण स्वत: वर्तमानपत्र काढायचा. 

१९९४ साली आपलं देखील एक वर्तमानपत्र असेल आणि ते खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या घरात पोहचेल याचं स्वप्न मुरलीधर शिंगोटे यांनी बांधलं… 

१ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण बंद करण्यात आले आणि त्याच दिवशी शिंगोटे यांचा स्वत:चा पहिला पेपर छापून हाती आला, या वर्तमानपत्राचे नाव होते, 

मुंबई चौफेर…

मुंबई चौफेर हा खऱ्या अर्थाने सांजदैनिक होता. यात शब्दांचे कोडे असत. लोकलमधून जात असताना नजर मारण्यासाठी हा पेपर लोकांना आवडू लागला. आपल्या स्वत:च्या हातात असणारं वितरणाचं जाळ त्यांनी चोख वापरण्यास सुरवात केली आणि बघता बघता मुंबई चौफेर प्रसिद्ध झाला… 

वर्तमानपत्रांचा धंद्यात आजवर फक्त मातब्बर व्यक्तींनीच हातपाय पसरले. एकतर पाठीशी राजकारण हवे किंवा दूसरा मोठ्ठा उद्योग हवा. वर्तमानपत्राच्या धंद्यातून पैसा हाती लागत नाही हे साधं समीकरण होतं. तरिही शिंगोटे यांनी मोठ्ठा घास घेण्याचं ठरवलं होतं. 

याच वर्षीच्या दसऱ्यामध्ये त्यांनी दैनिक सुरू केलं. त्या दैनिकाचं नाव होतं, 

आपला वार्ताहर..  

एकदा अंदाज आला आणि पुढे भाषेची बंधने झुगारत वर्तमानपत्र सुरू करण्यात आली. पुण्यनगरी, कर्नाटक मल्ला, यशोभूमी, तामिळ टाईम्स, हिंदमाता अशी वर्तमानपत्रे सुरू करण्यात आली. १९९९ साली पुण्यनगरी सुरू करण्यात आले. हा एकमेव माणूस असा होता जो भाषेची बंधने झुगारून कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये देखील घुसला. पुण्यनगरीच्या जिल्हावार आवृत्ती सुरू करण्यात आली. त्यांच सर्वात मोठ्ठ यश हे होतं की स्वत: मुरलीधर शिंगोटे वर्तमानपत्रात काय छापून आलं आहे ते वाचत असत.

लोकांना कोणत्या बातम्यांची गरज आहे ते पहात असत. स्वत: फळविक्रेता म्हणून काम केल्यानं मजूर, कामगार, रिक्षाचालक यांच्या आवडीच्या बातम्यांचा ते आढावा घेत पहाटे पेपर आला की कुठल्याही पेपर विक्रेत्याच्या काऊंटरवर जावून ते लोकांच्या आवडीच्या बातम्या विचारत असत. व त्यापद्धतीने लोकांचा पेपर करण्याचं शिवधनुष्य ते पेलत असत. त्याचा फायदा पुण्यनगरीसह इतर वर्तमानपत्रांच्या वाढीसाठी होवू लागला.

अल्पावधीत मराठी वर्तमानपत्रांच्या पहिल्या फळीत ते जावून बसले. जिथवर जाण्यासाठी आजवर प्रचंड अभ्यास, विद्वत्ता किंवा राजकारण हा एकमेव निकष असायचा अशा फळीत बाबा शिंगोटे यांनी बाजी मारली. आज ग्रामीण भागातील मुलं जर्नेलिझममध्ये आली म्हणून आपण कौतुक करत असताना शिंगोटे यांनी हे आसमान कधीच ओलांडलं आहे याचा विचार आपण करायला हवा.

आमच्या सारख्या नव्या पिढीच्या काहीतरी करू पाहणाऱ्या कित्येक तरुणांसाठी बाबा शिंगोटे हे नाव नेहमीच आदबीने घेण्याचं असेल यात शंका नाही.

असामान्य भरारी घेण्याची शिकवण देणाऱ्या बाबा शिंगोटे यांना बोलभिडू टिमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.