काहीही झालं तर कोल्हापूरात एकच वाक्य ऐकायला मिळतं, पुढारीच्या जाधवांना बोलवा.

कोल्हापूरचा माणूस म्हणजे रांगड व्यक्तिमत्व. गल्लीत कोणाचं कोणाशी वांद होऊ दे, कोणाला पोलीस उचलून नेल, गणपती मंडळाची भांडाभांडी, भावाभावांचे वाद ते थेट राजकारणातील वाद कधी कोणाच काही विस्कटल तर मागचा पुढचा विचार न करता कोल्हापूरकर ते सोडवायला जातो. मग त्यात आपला फायदा तोटा याचा विचार करत बसत नाही.

त्यांचं कामच एवढ अफाट असत की बाहेरच्या लोकांना ते दंतकथा वाटत रहात. पण कोल्हापूरकराना कोण काय म्हणतील याची पर्वा नसते.

याच अस्सल उदाहरण म्हणजे पुढारीचे पद्मश्री प्रतापसिंह जाधव !

प्रतापसिंह जाधव यांचा जन्म एका कट्टर पत्रकाराच्या घरी झाला. कै.गणपतराव जाधव त्यांचे वडील. गणपतरावांचं शालेय शिक्षण फार झालं नव्हत पण परिस्थितीने त्यांना घडवल. मुंबईत काही ठिकाणी वार्ताहर म्हणून काम करून पत्रकारितेच ज्ञान मिळवल. तिथेच सत्यशोधक चळवळीमध्ये ओढले गेले, जेधे जवळकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले.

सेवक नावाच सप्ताहिक सुरु केलं. त्याला मिळणारा प्रतिसाद बघून त्याच रुपांतर एका दैनिकात केलं. त्याचच नाव “पुढारी” 

साल होतं १९३९. काही दिवसातच फक्त कोल्हापूर नाही तर बेळगाव सकट अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी पुढारी वाचला जाऊ लागला. गणपतराव जाधवांनी कधी आपली राजकीय भूमिका लपवली नाही. ब्रिटीशांच्या विरुद्धचा स्वातंत्र्यलढा असू दे, गोवा मुक्ती संग्राम असू दे अथवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ. पुढारीमधून परखड भूमिकाच त्यांनी मांडली. गांधीजींपासून आंबडेकरांच्या पर्यंत अनेकांशी त्यांचा सहवास लाभला होता. यशवंतराव चव्हाण ते वसंतदादा पाटील अशा मोठ्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते.

त्यांच्या पत्रकारितेतील जेष्ठ्त्वाचा मान ठेवून शिवाजी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरचा पहिला आमदार म्हणून त्यांची निवड राज्यपालांनी केली. केंद्रसरकारने त्यांना पद्मश्री सन्मान दिला.

अशा महान व्यक्तिमत्वाचे सुपुत्र म्हणजे प्रतापसिंह जाधव.

त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात वडिलांना आदर्श मानून वाटचाल केली. कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये शिकत असतानाच राजकीय चळवळीत भाग घ्यायला सुरवात केली. पुढे कायद्याच शिक्षण घेण्यासाठी पुण्यातील लॉ कॉलेजला आले तेथेही विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे या भावी नेत्यांशी ओळख झाली. पण त्यांचा ओढा राजकारणापेक्षा पत्रकारितेमध्येच होता.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी पुढारीची जबाबदारी उचलली. त्यांच्या येण्याने पुढारीमध्ये अनेक बदल झाले. विश्वसंचारसारखे तरुणांना आवडणारे सदर सुरु केले. नवी छपाई यंत्रे आणली, संगणकाचा वापर सुरु केला. पुढारीला रंगीत बनवलं. भांडवलदारांच्या व राजकीय व्यक्तींच्या  मालकी असलेल्या बड्या वर्तमानपत्रांच्या आक्रमणानंतरही पुढारीने हार मानली नाही.

पुढारीची जनतेशी नाळ जोडली असल्यामुळे संकटाशी सामना देत लोकप्रियताही टिकवून ठेवली.

पुढारीची वाटचाल सुरु होती मात्र सोबत प्रतापसिंह जाधवांनी सामाजिक व राजकीय जबाबदारी विसरू दिली नाही.

७३ साली सीमावाद पेटला असताना मराठी भाषिकांवर अत्याचार झाले तेव्हा पुढारीचे संपादक म्हणून प्रतापसिंह जाधवांनी “या हरामखोरांना आवरा” असा जळजळीत अग्रलेख लिहिला. त्यावरून प्रचंड वाद झाले, पुढारीवर कर्नाटकात हल्ले करण्यात आले. पण जाधवांनी माघार घेतली नाही.

कारगिल युद्ध असो वा किल्लारी, गुजरात भूकंप कोणतेही संकट येऊ दे पुढारीचा मदतीचा हात सर्वात पुढे राहिला. कारगिल युद्धावेळी सियाचीनसारख्या दुर्गम ठिकाणी सैनिकांसाठी अत्याधुनिक इस्पितळ उभारले. नुकताच आलेल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापुरात तब्बल पन्नास लाखाचा निधी उभा केला.

अंबाबाई मंदिरामध्ये पहिल्यांदा दलित दांपत्याच्या हस्ते अभिषेक असो किंवा ज्योतिबा मंदिराचा विकास असो, कोल्हापुरात झालेले मराठी साहित्य संमेलन प्रत्येकवेळी प्रतापसिंह जाधवांनी हे घरचं कार्य असल्याप्रमाणे जबाबदारी पार पाडली.

आपल्या सामाजिक कार्यातून प्रतापसिंह जाधवांनी कोल्हापूरकरांच्या प्रेमाचे आणि आदराचे स्थान निर्माण केले आहे, आजही तिथे त्यांचा शब्द खाली पडू दिला जात नाही.

याचे एक गाजलेलं उदाहरण सांगितलं जात.

१९८६ साली कोल्हापुरात संयुक्त महाराष्ट्र सीमा समिती परिषदेचे अधिवेशन आयोजित आले होते. ५ मे परिषदेच्या बैठकीत एस.एम.जोशी, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असे अनेक नेते उपस्थित झाले होते.

या परिषदेमध्ये शिवसेनाप्रमुखांनी एक प्रस्ताव मांडला की सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सगळ्या मराठी आमदार व खासदारांनी आपआपल्या पदाचा राजीनामा द्यायचा. बऱ्याच जणांना ही टोकाची भूमिका वाटली. शरद पवारांनी राजीनामा देण्याला विरोध केला. 

पवारांच्या भुमिकेमुळे बाळासाहेब संतापले. तडक त्यांनी बैठक सोडली आणि पन्हाळ्याला निघून गेले.

बाळासाहेबांच्या या कृतीमुळे अनेकजणांना धक्का बसला. सीमा परिषदेचे भवितव्य बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत अंधारात दिसत होते. बाळासाहेबांची समजूत काढण्याची जबाबदारी प्रतापसिंह जाधवांना देण्यात आली. त्यांनी पन्हाळ्याला फोन लावला. शरद पवार बाळासाहेबांच्या भेटीला तिकडे गेले. पाठोपाठ प्रतापसिंह जाधव देखील पन्हाळ्याला पोहचले.

अखेर बाळासाहेबांची समजूत काढण्यात आली व मोठा पेचप्रसंग टाळला गेला.

असे कोणतेही संकट येऊ देत आजही कोल्हापुरात एक वाक्य परवलीचे बनले आहे,

“पुढारीच्या जाधवांना बोलवा. “

एकेकाळी कोल्हापुरात गाजलेले मंडलिक मुश्रीफ वाद असो, बारामतीमध्ये झालेले राजू शेट्टीचे ऊसदर आंदोलन असो प्रत्येकवेळी या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रतापसिंह जाधवांना फोन फिरवण्यात आला आणि त्यांनी तो सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले.

एलबीटी असो, कोल्हापुरातील टोल असो,ऊस दुध प्रश्न असो अथवा मराठा आरक्षण मोर्चा असो प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या पुढाकाराने आंदोलन उभारण्यात आले आणि ते यशस्वी देखील झाले.

मनमिळाऊ समजूतदार स्वभाव, कोणत्याही विषयातील चौफेर अभ्यास, वयामुळे आलेले जेष्ठत्व यामुळे प्रतापसिंह जाधवांचा आदर प्रत्येक पक्षात केला जातो. सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांशी त्यांची मैत्री आहे. त्यांंच्या याच वैशिष्ट्यामुळे एकदा मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणाले होते,

“पुढारी म्हणजे पुढाऱ्यांचा पुढारी आहे”

गेली पन्नासवर्षे ते पुढारीचे जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनां ही त्यांच्या वडिलांप्रमाणे पद्मश्री सन्मान मिळाला आहे.

पुढारीच्या सुवर्णमहोत्सवाला पंतप्रधान राजीव गांधी आणि अमृतमहोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. एका स्थानिक भाषेतील वर्तमानपत्राच्या कार्यक्रमात दोन वेळा देशाचे प्रधानमंत्री उपस्थित राहतात ही किमया प्रतापसिंह जाधव हेच करू शकतात.

आज त्यांनी वयाच्या पंचाहत्तरी मध्ये पदार्पण केलं आहे. इकडे राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदाचा घोळ सुरु आहे. शिवसेना भाजप युतीची गाडी चर्चेच्या पुढे सरकत नाही आहे, राष्ट्रवादी व  कॉंग्रेसकडे आवश्यक ते बहुमत नाही, अपक्षांची वेगळीच मिजास चालू आहे. कोल्हापूरकर गंमतीमध्ये म्हणतात ,

” या सगळ्यांना एकत्र आणून सरकार स्थापनेसाठी तयार करायचं असेल तर एकच उपाय, प्रतापसिंह जाधवाना बैठकीला बोलवायचं. हमखास तोडगा काढून मिळेल.”   

प्रस्तुत लेखासाठी दैनिक पुढारीच्या अनिभिषिक्त समाजनेतृत्व या लेखाची मदत घेण्यात आली आहे. 

हे ही वाच भिडू.

 

4 Comments
  1. मनिष अग्रवाल says

    प्रतापसिंह जाधव सरांना, जो अनुभव आहे, तो इतरांमध्ये दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.