पोरं १८ व्या वर्षी कॉलेजला जातात त्या वयात पतंगरावांनी विद्यापीठ काढलं

भारती विद्यापीठ आणि पतंगराव कदम यांच्याबद्दल बरीच टोकाची मतं असतील. म्हणजे संस्थेत डोनेशन भरून ॲडमिशन होतं असं म्हणणारे असतील किंवा आवश्यक त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाहीत म्हणून आरोप करणारे असतील. दूसरीकडं पतंगराव कदम म्हणजे राजकारण ते ही कॉंग्रेसचे राजकारणी म्हणून विरोध करणारे देखील असतील.

पण या सगळ्यांच्या पलीकडे पतंगराव कदम आणि भारती ही एक सक्सेस स्टोरी आहे हे लक्षात घ्यायला हवं.

बर ही सक्सेस स्टोरी का? तर विचार करा १० वी व्हायला इथं १६ वर्ष जातात. त्यानंतर १२ वी व्हायला २ वर्ष पुढं पदवी घ्यायची म्हणलं तर किमान ३ वर्षांचा अभ्यासक्रम. सगळं सुरळीत झालं तरी वयाची २०-२१ वर्ष या सगळ्या कारभारात जातात. त्यानंतर मग स्वप्न बघायची, नोकरी करायची, बिझनेस करायचा, स्थळ बघायला जायचं अस करत करत वयाची ३० पार होवून जाते. आत्ता तुलना करायची झाली तर पतंगराव कदम या माणसासोबत करू.

हा माणूस वयाच्या १८ व्या वर्षी भारती संस्थेची स्थापना करतो. २२ व्या वर्षी पहिलं विद्यालय सुरू करतो. वयाच्या ३२ व्या वर्षी या माणसाचे तीन कॉलेज पुणे विद्यापीठाशी संलग्न असतात. हा माणूस पुणे विद्यापीठात सिनेट मेंबर असतो. बर या तीन कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठाचं पहिलं मॅनेजमेंन्ट कॉलेज असतं.

पतंगराव कदम रयतमध्ये शिक्षण घेत होते. चांगला मुलगा म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या ते संपर्कात आले. पुढे पुण्यात आले. पुण्यात आले तेव्हा पतंगराव कदमांकडे भांडवल म्हणून मॅट्रिक पास आणि टिडी चं शिक्षण होतं. जून्या काळी शिक्षक होण्यासाठी टिडीची परिक्षा पास होण्याची आवश्यकता असायची.

ते साल होतं १९६३-६४ चं.

पतंगराव कदमांच्या डोक्यात एक आयडिया आली. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पोरांच गणित आणि इंग्लिश कच्च असतं. प्रत्येक शाळेतून वेगवेगळ्या परिक्षा घेण्यात येतात. मॅट्रिकलाच फक्त राज्यभरात एकसारखे पेपर असायचे. त्यामुळे खरी स्पर्धा ही मॅट्रिकलाच समजत असे. त्यापूर्वी संपूर्ण राज्यातील मुलांचा एखाद्या परिक्षेतून कस लागेल अशी कोणतीही सिस्टिम तत्कालीन राज्यात नव्हती.

यावर पतंगरावांनी एक उपाय काढला. त्यांनी काय केलं तर भारती संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत इंग्लिश आणि गणिताच्या परिक्षांचा अभ्यासक्रम ठरवला. संस्था काय करणार तर दरवर्षी प्रत्येक इयत्तेच्या पोरांची परिक्षा घेणार आणि त्यांना सर्टिफिकेट वाटणार. संस्थेच काम फक्त अभ्यासक्रम ठरवायचा, परिक्षा घ्यायची आणि निकाल लावायचा.

एकसारखे पेपर असल्याने इथे स्पर्धा कळण्याचा चान्स होता. 

त्यासाठी शिक्षकांनी ३ रुपये भरून सदस्य व्हायचं होतं. पतंगरावांच्या या आयडियाला पहिल्यांदा सपोर्ट केला तो अहमदनगर जिल्ह्याने. बाळासाहेब विखे आणि शंकरराव काळे या दोघांनी नगर जिल्हापरिषदेचं सर्क्युलर काढून परिक्षा कंम्पल्सरी करून टाकली. सुरवातीला या परिक्षांच काम कसबा पेठेतल्या नाभिक समाजाच्या मंदीरातून सुरू करण्यात आलं होतं. तिथे असताना गणिताच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या पण वर्षाभरात हे ऑफिस सदाशिव पेठेत शिफ्ट करण्यात आलं.

भारती विद्यापीठाचं पहिलं ऑफिस नेमकं कस होतं ?

पतंगराव कदमांनी त्या काळचे ६ हजार मोजून संस्थेसाठी जागा घेतली. संस्था म्हणजे १० बाय १० ची एक खोली आणि १० बाय २० ची दूसरी खोली. पैकी १० बाय १० च्या खोलीत स्वत: पतंगराव कदम रहायचे तर दूसऱ्या खोलीतून संस्था चालायची.

या संस्थेचे संस्थापक होते पतंगराव कदम. संस्थेत एक क्लार्क होता त्याच नाव पतंगराव कदम आणि संस्थेत एक शिपाई देखील होता त्याचं नाव देखील पतंगराव कदम.

थोडक्यात काय तर वन मॅन आर्मी काम चालू होतं. सगळं काम पतंगराव स्वत: करायचे.

इकडे परिक्षाची आयडिया जोर खावू लागली. दूसरीकडे पतंगराव कदमांची ओळख यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव मोहिते यांच्यासोबत झाल्याने एस्टी महामंडळावर त्यांची निवड झाली. सकाळी पतंगरावांना भेटायला आलेला माणूस संध्याकाळी गावात कंडेक्टर म्हणूनच जायचा.

इथली गंम्मत अशी की,

पतंगराव आपल्या पंचक्रोशीत फिरायचे. गावातल्या पोरांना एकत्र करायचे. वाचता येणाऱ्यांना महामंडळात चांगली नोकरी, बाकीच्यांना ड्रायव्हर ते कंडक्टर. जूजबी माहिती असणाऱ्यांना मॅकेनिकल. कागदावर चिट्टी लिहली की नोकरी लागायचा तो काळ होता.

एका बाजूला पोरांना अशा प्रकारे नोकऱ्या लावायचं काम चालू होतं तर दूसरी कडे संस्थेची स्थापना रंगात येत होती.

पतंगरावांनी संस्था काढली सदाशिव पेठेत आणि पहिली शाळा काढली कोथरुडात. शंकरराव मोरे हायस्कूल सुरू झालं तेव्हा तिथे फक्त ३६ मुले यायची. ही शाळा १९६८ साली सुरू करण्यात आली. ही जागा त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या सहकार्याने मिळाल्याचं सांगण्यात येतं.

एका बाजूला पंतगराव संस्था वाढवण्याच्या कामाला लागले होते. त्या काळात पुणे विद्यापीठाच कार्यक्षेत्र पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे अस विस्तारलेलं होतं. सिनेट मेंबर निवडून जाण्याची प्रथा होती आणि पतंगरावांनी यात उडी घेतली. वयाच्या तिशीनंतरच्या काळात ते सिनेट मेंबर झाले. एकूण चार वेळा ते सिनेट मेंम्बर झाले.

नंतरच्या एकूण काळात कॉलेजचा पसारा वाढत गेला. इकडे पतंगरावाचं नाव राजकारणात देखील गाजू लागलं.

पण भारती संस्था भारती डिम्ड विद्यापीठ नेमकी कधी झाली.

हा किस्सा देखील पतंगरावांच्या शैलीप्रमाणेच आहे. आजच्या प्रमाणे संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देणारा कारभार नव्हता. त्यासाठी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा स्पेशल कायदा होता. त्यानूसार UGC  स्वतंत्र कमिटी नेमत असे. ही कमेटी संस्थेचा सर्व्हे करत. त्यानंतर ती फाईल HRD मिनिस्ट्रीला जात असे.

संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात भारती संस्थेतल्या लोकांचाच विरोध होता. त्यांच म्हणणं होतं की पूणे विद्यापीठ नावाजलेलं असताना विद्यापीठाचं तुणतुणं कशाला. इथे पतंगराव कदम आपला एक किस्सा सांगतात,

ते एका मुलाखतीत म्हणतात,

वयाच्या १८ व्या वर्षी संस्था स्थापन करताना मी डायरीत लिहलं होतं एकदिवशी या संस्थेच विद्यापीठ होईल. भान ठेवून योजना आखायच्या असतात आणि बेभान होवून त्या अंमलात आणायच्या असतात.

ठरल्याप्रमाणे पतंगरावांनी विद्यापीठ स्थापनेसाठी अर्ज केला. UGC च्या १६ सदस्यांची चौकशी समिती आली व त्यांनी हिरवा कंदिल दिला. आत्ता ती फाईल नरसिंह राव यांच्याकडे गेली होती. नरसिंह राव तेव्हा लातूर येथे शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते.

ठरल्याप्रमाणे पतंगराव हार मानणाऱ्यातले नव्हते. त्यांनी लातूरच सर्किट हाऊस गाठलं. नरसिंह रावांची भेट घेतली. नरसिंह रावांना म्हणाले माझी एक फाईल आली असेल त्यावर सही पाहीजे होती.

नरसिंहराव म्हणाले, गेल्या पाच वर्षात तर तुमची कोणती फाईल आली नाही आणि आत्ता या प्रचाराच्या धामधुमीत कुठलं काम काढलं. पतंगरावांनी विद्यापीठाची फाईल सांगितली. नरसिंहरावांनी तिथल्या तिथं सही केली आणि लातूरच्या सर्किट हाऊसमध्ये १० बाय २० च्या खोली सुरू झालेल्या संस्थेस विद्यापीठाची मान्यता मिळाली त्यानंतर संस्था डिम्ड युनिवर्सिटी झाली.

पुढचा इतिहास तर तुम्हाला माहितच असेल. आजही टिळक रोडवर असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलच्या बोळात गेलात तर तूम्हाला एका घरावर असणारा बोर्ड दिसतो. त्या बोर्डवर लिहलय भारती विद्यापीठाची स्थापना इथे झाली.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Jitendra Mohite says

    ajunahi kasaba pethetli jaga ahe tithe benches ahet va tyavarti invard number sahit 1964 sal lihilele ahe. Mi 2004 sali he pahilele hote. kadachit ajunahi asel.

Leave A Reply

Your email address will not be published.