गावातल्या बृजमोहन दास महाराजांना अटक झाली, मग कळलं हा तर डाकू छेदा सिंग..

एकेकाळचं डाकू आणि बंडखोरांचं आश्रयस्थान असलेल्या चंबळच्या खोऱ्याचं नाव ऐकलं तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहायचा. खून, मारामार्‍या, लुटा-लूट करणार्‍या मोठ मोठ्या प्रसिद्ध डाकूंच्या टोळ्या ह्या चंबळच्या खोर्‍यात वास्तव्यासाठी असायच्या. या खोर्‍यात शिरायला भल्या भल्यांची हिम्मत होत नसायची. या खोर्‍यात अनेक डाकू तयार झाले. यात जवळपास ५० च्या वर डाकूंच्या टोळ्या कार्यरत होत्या.

त्यांचे एकमेकांसोबत नेहमी वाद होत असत आणि त्यातून मग एकमेकांवर गोळ्यांचा अक्षरश:पाऊस पाडला जायचा. याच खोर्‍यातला हा एक डाकू होता त्याचं नाव डाकू छेदा सिंग.

फुलन देवीचं अपहरण याच छेदा ने केलं होतं

अगदी लहान वयापासून आपल्यावर अमानुषपणे झालेल्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी डाकूंच्या टोळीत सामील होऊन आपल्या अत्याचारांचा बदला घेणार्‍या फुलन देवीची हृदयद्रावक कथा सार्‍या देशाला परिचित आहे. 

फुलनच्या वडिलांची सारी शेतजमीन त्यांच्याच सख्या भावानं कपटानं  घेतली होती. तो त्यांना नेहमी धमक्या देत असे. तो नेहमी फुलन व तिच्या बहिणीला मारत असे. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे. वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या इसमासोबत झालं. त्यानं वयात येण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं.

फुलनचं शारीरिक शोषण केलं. तिचा मानसिक छळ केला. तो तिला नेहमी मारहाण करत असे. त्याच्या त्रासामुळे फुलन दोन-तीन वेळा घरातून पळून गेली होती. त्याच्या छळाला वैतागून ती आपल्या घरी निघून आली.

फुलनचं आणि  सरपंचाच्या मुलाचं कुठल्याशा कारणामुळे भांडण झालं होतं त्यामुळे फुलन त्याला काही उलटसुलट बोलल्यामुळे वयाच्या १५ व्या वर्षी त्या सरपंचाच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला, तोसुद्धा तिच्या आई-वडिलांसमोर.

फुलननं पोलिसांकडे मदत मागितली, पण पोलिसांनी तिला काही मदत केली नाही. काही दिवसांनंतर फुलन तीच्या बहिणीच्या गावी गेली. तेव्हा इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ तिच्यावर डाकू असण्याचा खोटा आरोप लावून तिला व तिच्या बापाला पोलिस ठाण्यात टाकतात. पोलिस स्टेशनात काही पोलीस अधिकारी तिच्यावर बलात्कार करतात.

मग पुढे हा सरपंच आणि तिचा चुलत भाऊ तिला ठार करण्यासाठी बाबू गुज्जर नावाच्या डाकूला तिची सुपारी देतात. नंतर काही डाकू येऊन फुलन व तिच्या आई-वडिलांना खूप मारहाण करून फुलनला आपल्यासोबत घेऊन जातात. 

फुलनवर वयाच्या २० व्या वर्षापर्यंत अनन्वित अत्याचार झाले.

तिचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. पुढे तिने आपल्या वर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला तिने त्या सगळ्या माणसांना संपवून टाकलं ज्यांनी ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता.

काही काळाने फुलनदेवीने आत्मसमर्पन केलं, ती खासदार झाली.. पण फुलनला सुद्धा गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.

फुलन संपली.. तिच्यावर अत्याचार करणारे लोकही संपले.. पण फुलन चं अपहरण करून तिला या अत्याचाराच्या खाईत लोटणारा एक व्यक्ति अजून पर्यंत जीवंत आहे.

तो म्हणजे फुलनचं अपहरण करणार्‍या बाबू गुज्जरच्या टोळीत असणारा छेदा सिंग नावाचा डाकू.

छेदा सिंग वयाच्या २० व्या वर्षी घरातून पळून गेला आणि पुढे तो चंबळमधील लालारामच्या टोळीत सामील झाला. हळूहळू तो कुप्रसिद्ध डाकू होत गेला. तो लालारामसाठी चंबळमध्ये लोकांचं अपहरण करायचा. लोकांचं अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय होता.

छेदा आणि त्याच्या या टोळीने मिळून खंडणीसाठी अपहरण, दरोडा, खून असे डझनभर गुन्हे केले होते. छेदा आपल्या सोबत कायम एक कुर्‍हाड बाळगायचा. त्याच्या सुरक्षेचं तेच एक साधन त्याच्या जवळ असायचं. सगळ्या खोर्‍यात आणि आसपासच्या गावात छेदाची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्याचं नाव घेतलं तरी लोक थर थर कापायचे.

१९९८ मध्ये त्याने आपल्या टोळीसह आयना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जसवंतपूर गावातल्या चार लोकांचं अपहरण केलं होतं, ज्यामध्ये काही लोकांना खंडणी मिळाल्या नंतर सोडून देण्यात आलं. याच प्रकरणाचा पोलिसांना सुगावा लागला आणि पोलिसांनी सापळा रचून छेदाला पकडण्याचा प्रयत्न केला,

त्यावेळी पोलिसांनी छेदाच्या बहुतेक साथीदारांच खात्मा केला. या प्रकरणात पोलिसांसोबत झालेल्या या चकमकीतून तो कसाबसा निसटला आणि फरार झाला. त्यानंतर जवळपास २४ वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांनी २०१५ साली त्याच्यावर ५०,००० रुपयांचं  इनाम जाहीर केलं होतं.

इकडे त्याच्या गावी त्याच्या भावाने छेदा मेल्याची कागदपत्रं बनवली आणि वडीलोपार्जित सगळी जमीन आपल्या स्वत: च्या नावावर करून घेतली. आणि छेदा मेला असं जाहीर केलं. त्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांना वाटलं की पोलिसांच्या चकमकीत छेदा मारला गेला. सगळे लोक छेदाला विसरून गेले. 

लोकांचं अपहरण करून त्यांचा खून करणारा छेदा पोलिसांपासून वाचण्यासाठी आता एक संत बनून आपलं जीवन व्यतीत करत होता. 

पळून गेल्या नंतर तो पोलिसांपासून वाचण्यासाठी मध्यप्रदेशातल्या चित्रकूट मध्ये भगवद् आश्रमात एक साधू बनून राहात होता. त्याने आपलं नाव बदलून बृजमोहन दास असं ठेवलं होतं. या फेक नावासोबतच त्याने फेक आधार कार्ड, वोटर आयडी, राशन कार्ड हे सगळं बनवून घेतलं होतं.

तो आता ६९ वर्षांचा झाला होता, त्याची प्रकृतीही साथ देत नव्हती.

त्याला नीट चालताही येत नव्हतं, अशी त्याची अवस्था झाली होती. अशा अवस्थेत आपल्या माणसांना, आपल्या लोकांना भेटावं म्हणून एकदा गावी जाऊन यावं असं त्याला वाटत होतं.

छेदा अविवाहित होता परंतु गावातल्या आपल्या इतर नातेवाईकांना भेटून यावं म्हणून तो त्याच्या एका सहकारी संन्याशासोबत बोलेरो कारमधून उत्तरप्रदेशातल्या भासोन या आपल्या मूळ गावी आला होता. 

नेमकं त्याचवेळी पोलिसांना ही बातमी समजली आणि पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन छेदा ला पकडलं. तब्बल २४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत राहिलेल्या छेदाला अखेर पोलिसांनी पकडलंच. त्याच्यावर खून, दरोडा, अपहरण असे  एकूण २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.