युवराज, धोनी आणि पंतच्याही आधी खरा ‘धडाकेबाज’ यशपाल शर्मा होता…

त्या काळात क्रिकेटला आत्तासारखं ग्लॅमर नव्हतं, आज क्रिकेटर्सवर पैशांचा पाऊस पडत असला तरी तेव्हा मात्र कुणी क्रिकेटरशी लग्न करायलाही तयार व्हायचं नाही, टीमसाठी सेंच्युरी ठोकणारी आणि मॅचेस जिंकवून देणारी नावं जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात येत नव्हती, तिथं थोडं पण मोलाचं योगदान देणारी माणसं कुणाच्या लक्षात राहणार ?

पण या सगळ्यातही जुन्या काळातला एक क्रिकेटर चांगलाच लक्षात राहिला ते म्हणजे यशपाल शर्मा.

८३ पिक्चरमध्ये सॅक्रेड गेम्समधला बंटी म्हणजेच जतिन सरना यशपाल यांच्या भूमिकेत दिसलाय. दुर्दैवानं सध्याच्या पिढीला यशपाल यांची अशी ओळख करुन द्यावी लागते, पण शेजारच्यांच्या घरात जाऊन टीव्ही बघणाऱ्या आणि कुणाच्या तरी एका रेडिओला कान देऊन कॉमेंट्री ऐकणाऱ्या पिढीला मात्र यशपाल शर्मा काय आहे, हे वेगळं सांगावं लागत नाही.

अगदी एकाच वाक्यात सांगायचं झालं तर, सुनील गावसकर यांनी यशपालना एक टोपण नाव ठेवलं होतं टीम इंडियाचा ‘क्रायसिस मॅन’. कारण टीमवर कुठलंही संकट आलं की यशपाल शर्मांची बॅट हमखास बोलायची…

यशपाल शर्मा इंडियन क्रिकेटमध्ये आले यामागंही एक भारी किस्सा आहे

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते सातत्यानं दमदार कामगिरी करत होते, मात्र त्यांची भारतीय संघात निवड तेवढी होत नव्हती. मात्र दुलिप ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी नॉर्थ झोनकडून खेळताना साऊथ झोनच्या टीमला १७३ रन्स मारले. साऊथ झोनच्या टीममध्ये भागवत चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना आणि वेंकटराघवन असे भारताचे तगडे स्पिनर्स खेळत होते, पण यशपालनी कुणालाच सुट्टी दिली नाही. इराणी ट्रॉफीमध्ये बलाढ्य कर्नाटकला ९९ रन्स मारले. महत्त्वाच्या मॅचेसमध्ये मोठ्या बॉलर्ससमोर स्कोअर करुनही निवड समिती यशपाल शर्मांकडे फारसं लक्ष देत नव्हती.

एक रणजी मॅच बघायला अभिनेते दिलीप कुमार आले होते, त्यांनी यशपालना बॅटिंग करताना पाहिलं आणि ते झटक्यात यशपालचे फॅन झाले. दिलीप कुमारांनी त्यांना भेटायला बोलावलं आणि कौतुक केलं. त्यानंतर दिलीप कुमार बीसीसीआयमध्ये सक्रिय असणाऱ्या राजसिंह डुंगरपूर यांच्याशी बोलले आणि यशपाल शर्मांची भारतीय संघात एंट्री झाली.

दोन वर्षानंतर १९७९ मध्ये त्यांना प्रत्यक्षात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंच्युरी मारली, पाकिस्तान विरुद्ध रन्स चोपले पण सगळ्यांच्या लक्षात राहिली, ती त्यांची मद्रास (आजचं चेन्नई) मधली बॅटिंग.

इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर होतं, मद्रासमध्ये पाचवी टेस्ट मॅच खेळवली जात होती. भारताची पहिली बॅटिंग होती आणि नेमक्या दोन विकेट्स धपाधप पडल्या. खतरनाक दिलीप वेंगसरकर आणि संयमी गुंडाप्पा विश्वनाथनं बाजू लाऊन धरली.  मात्र वेंगसरकर नेमका दुखापतग्रस्त झाला आणि टीम इंडियाचं टेन्शन वाढलं.

संयमी विश्वनाथच्या साथीला आले यशपाल शर्मा. गुंडाप्पा विश्वनाथ म्हणजे राहुल द्रविडचा आदर्श, त्याची बॅटिंगही अगदी शिस्तबद्ध. तर दुसऱ्या बाजूला यशपाल शर्मा म्हणजे ‘हाण की बडीव, धुरळा उडीव.’ ही विरुद्ध टोकं असलेली जोडी जमून आली. त्यांनी पाहिला दिवस तर खेळून काढलाच, पण दुसऱ्या दिवशी कहर केला.

त्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी, इंग्लंडला भारताची एकही विकेट मिळाली नाही. विश्वनाथ-शर्मा जोडीनं सगळा दिवस खेळून काढला होता. बॉब विलीस, इयान बॉथम असे डेंजर बॉलर्स असूनही यशपाल शर्मांनी १४० रन्स करत टीमला संकटापासून वाचवलं होतं. त्या इनिंगमध्ये त्यांनी दोन कडकडीत सिक्सही हाणले होते.

संकटातून वाचवायची अशीच मोहीम यशपाल शर्मांनी १९८३ च्या वर्ल्डकपमध्येही पार केली होती. भारताची वर्ल्डकप कॅम्पेनची सुरुवातच अगदी अनपेक्षित झाली होती. सलग दोनदा वर्ल्डकप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला भारतानं धूळ चारली आणि आपण जिंकू शकतो हा आत्मविश्वास टीममध्ये आला. ती मॅच जिंकवण्यात मोलाचा वाटा होता, तो यशपाल शर्मांच्या ८९ रन्सचा.

त्या वर्ल्डकपमध्ये भारतासमोर आणखी एक तगडं आव्हान होतं, ते म्हणजे इंग्लंड विरुद्ध असलेली सेमीफायनल जिंकण्याचं.

इंग्लंडनं पहिली बॅटिंग करत २१४ रन्सचं आव्हान दिलं होतं, त्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था २ आऊट ५० अशी होती. मात्र यशपाल शर्मा पुन्हा संकटमोचक बनले आणि मोहिंदर अमरनाथ सोबत ९२ रन्सची पार्टनरशिप केली.

अमरनाथ आऊट झाल्यावरही त्यांचा दांडपट्टा सुरूच राहिला, आणि त्यांनीच संदीप पाटील सोबत आणखी ६३ रन्स जोडले. यशपाल शर्मांची ६१ रन्सची इनिंग भारताला फायनलचं तिकीट काढून देणारी ठरली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यावरही ते जवळपास दहा वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत राहिले. एका मॅचमध्ये त्यांचा सामना झाला सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी. शर्मांचं करिअर जवळपास संपुष्टात आलं होतं, पण मनातली जिद्द कायम होती. त्यांनी रिचर्ड्सला सलग चार बॉल चार सिक्स हाणले.

यशपाल शर्मांची ताकद जगानं पुन्हा एकदा पाहिली.

पुढं गांगुली-चॅपेल राडा झाला तेव्हा निवड समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी कायम गांगुलीला पाठिंबा दिला आणि भारत मैदानाबाहेरच्या एका संकटापासून वाचला. २०११ च्या वर्ल्डकपसाठीची टीम निवडण्यातही निवड समिती सदस्य म्हणून त्यांचा मोलाचा वाटा होता.

क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही यशपाल शर्मांनी भारतीय क्रिकेटला भरपूर काही दिलं, जे ना ३ तासाच्या पिक्चरमध्ये सांगणं शक्य आहे आणि ना आकडेवारीच्या तक्त्यात.

गेल्यावर्षी जुलैमध्ये यशपाल शर्मा यांचं निधन झालं, मात्र वनडे क्रिकेटमध्ये एकदाही शून्यावर आऊट न झालेला हा भिडू आपल्याला बिनधास्त कसं खेळायचं हे शिकवून गेला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.