पाण्यात उभा राहून ध्यान करणाऱ्या गगनगिरी महाराजांचे पाय माशांनी कुरतडले होते?

गगनगिरी महाराजांबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्याबद्दल हमखास सांगितलं जातं की,

ते पाण्यात उभा राहून ध्यानधारणा करत असत. ते तप करण्यात इतके एकाग्र व्हायचे की त्यांच्या पाय माशांनी कुरतडले होते. 

गगनगिरी महाराज हा विषय निघताच खोपोलीचा आश्रम आठवतो. नाहीतर महाराजांबद्दलची वरील गोष्ट आठवते.

पैकी आश्रमामुळे महाराज हे कोणीतरे बडे प्रस्थ असावे असे वाटते तर ध्यानधारणेच्या गोष्टीमुळे महाराज सिद्धपुरूष असल्याचं वाटायचं.

यापैकी नक्की काय?

गगनगिरी महाराज नेमके कोण होते हे सांगणारा हा लेख. 

पाटण तालुक्यातले मणदुरे गावचे पाटणकर सरकार म्हणून ओळखले जाणारे कुटूंब. पाटणकरांच मुळ आडनाव साळुंखे. महाराजांचा जन्म देखील इथलाच. १९०६ साली वडिल गणपतराव आणि आई विठाबाई यांच्या पोटी गगनगिरी महाराजाचां जन्म झाला. गगनगिरी महाराजांच नाव श्रीपाद पाटणकर साळुंखे. त्यांचे कुटूंब मणदुरे या गावात रहायला होतं. महाराज तीन वर्षांचे असताना आईचे आणि पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

त्यामुळे एकटे पडलेल्या महाराजांनी सहाव्या वर्षी घर सोडले.

त्यानंतर वैराग्य ही एकमेव गोष्ट महाराजांसोबत राहिली. घर सोडल्यानंतर ते नाथसंप्रदायाच्या संपर्कात आले. नाथसंप्रदायाच्या प्रभावातूनच ते सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळा येथे आले. वयाच्या सातव्या वर्षीच त्यांना नाथसंप्रदायाची दीक्षा मिळाली.

गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायातील हठ योगी होते. ते चालुक्यसम्राट पहिला पुलंकेशीच्या घराण्यातील होते. त्यानंतर त्यांनी चित्रकूटच्या दिशेने प्रस्थान केले. तिथेच त्यांची चित्रानंदस्वामी यांची भेट झाली. 

पुढे उत्तर भारतात ते भटकत राहिले. बद्रीनाथजवळील व्यासगुंफेत महाराज असताना तिथे त्यांना एका साधुंमूळे सिद्धअवस्था प्राप्त झाल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे. तू दक्षिणेकडे चालत राहण्याची आज्ञा साधूंनी दिल्याने महाराजांनी दक्षिणेकडे प्रयाण केले. 

महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यन्त पायी प्रवास करत आले. तसेच ते पुढे भोपाळपर्यन्त गेले. तलावाच्या काठी ध्यानधारणा करत असताना काही सरदार तिथे मराठी बोलत असल्याचे महाराजांना दिसले.

महाराज त्या सरदारांबरोबर मराठीत बोलू लागले. मराठी व्यक्ती असल्याने त्या सरदारांनी महाराजांना कोल्हापूरात आणले. तिथून पुढे दाजीपूरच्या जंगलात ते तप करत राहू लागले. अशी कथा सांगितली जाते.

दाजीपूरच्या जंगलात असणाऱ्या धनगरवाड्याच्या शेजारी झोपडी बांधून महाराज राहू लागले. खाण्यासाठी कंदमुळे आणि तप करण्यासाठी तप. भूतविद्या, जारण मारण उच्चाटन विद्या या गोष्टींच्या दंतकथा महाराजांच्या नावासोबत जोडल्या जावू लागल्या.

तिथूनच भ्रमण करत महाराज गगनगडावर पोहचले व इथल्या वास्तव्यात गगनगिरी महाराज झाले. इथेच ते जलतपश्चर्या करु लागले. ते इतका काळ पाण्यात तप करायचे की त्यांच्या पायाला मासे चावा घेत असत.

महाराजांचे भक्त सांगतात की त्यांना योगशास्त्रातील विमलज्ञान, शिवयोग, उन्मती विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा विद्या आत्मसात होत्या. निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी तप केले होते. १९३२ ते १९४० या काळात दाजीपूरच्या पाटाचा डंक भागात राहून त्यांनी अरण्यनिवासी तप पुर्ण केले होते.

हळुहळु महाराजांची किर्ती पसरू लागली. 

१९४८ ते १९५० साली महाराज मुंबईतील वाळकेश्वरजवळील शिडीच्या मारूतीजवळ दादी हिरजी पारशी स्मशानात राहू लागले व तप करू लागले.

ब्रीच कँडीचा खडक, महालक्ष्मीचा खडक, बाणगंगेचा खडक या टापूंत तप करून दादी हिरजी शेठच्या पपेटी बंगल्यात अय्यारीच्या समोर, कधी कधी स्मशानबावडीजवळ खाट टाकून तप करू लागले.

महाराजांची किर्ती वाढू लागल्याने बरेच संस्थानिक महाराजांना भेटण्यासाठी येवू लागले. या काळात खोपोली येथे आज जिथे आश्रम आहे अशा निसर्गरम्य ठिकाणी महाराजांचे वास्तव होवू लागले.

मात्र महाराजांची किर्ती पसरली ती १९६५ च्या काळखंडानंतर. 

दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, राजारामबापू पाटील, कपासे आदी सर्व मंत्री मंडळी व प्रतिष्ठित अधिकारी त्यांना मान सन्मान देवू लागले. मुंबईच्या बिर्ला क्रिडा केंद्रात गुरूपोर्णिमा साजरी होवू लागली.

१९६० च्या काळात तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनीच गगनगिरी महाराजांचे मुळे पाटणकर असल्याची माहिती दिली. १९९५ साली मनोशी बेटावर आश्रम उभारण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम उभारण्यात आले.

दिनांक ४ फेब्रुवारी २००८ रोजी महाराजांचे खोपोली येथे निधन झाले. 

हे ही वाच भि़डू. 

2 Comments
  1. RUSHIKESH PANDIWALE says

    महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाज संस्थे बद्दल काही माहिती त्यांच्या शाखा अजून चालू आहेत काय?

  2. Sachin Kamble says

    Jay Gagangiri

Leave A Reply

Your email address will not be published.