ऑस्ट्रेलियावाले पिचवरुन रडतायत, पण भारताच्या टीमला भारतात दमवणं पीटरसनलाच जमलेलं

साल होतं २००६, इंग्लंडच्या एजबॅस्टन मैदानावर इंग्लंड विरुद्ध श्रीलंका टेस्ट मॅच रंगली होती. श्रीलंकेच्या पहिल्या डावाचा बाजार उठला होता. त्यात इंग्लंडचा एक दैत्य त्यांच्या बॉलिंगवर तुटून पडला. त्याची सेंच्युरी पूर्ण झाली होती, त्यामुळं हाणामारीला आणखीनच चेव आला होता. बॉलिंग करत होता मुरलीधरन. फक्त श्रीलंकेचाच नाही, तर जगातला सगळ्यात बाप स्पिनर.

या राक्षसानं मुरलीला सलग तीन चव्वे हाणले. मुरलीनं कमबॅक केलं आणि पुढचे तीन बॉल डॉट टाकले. ओव्हरच्या शेवटी मुरली आणि स्ट्राईकवर असणाऱ्या बॅट्समनची खुंखार नजरानजर झाली. सगळ्यांना चाहूल लागली होती काहीतरी खुंखार होणार आहे.

पुढच्या ओव्हरला मुरली बॉलिंगला आला, पहिले दोन बॉल डॉट गेले. तिसऱ्या बॉलला प्रॉपर नाट्य रंगलं होतं. मुरलीनं बॅट्समनच्या पायावर बॉल सोडला आणि तेवढ्यात या राईटी बॅट्समननं लेफ्टी बॅट्समन घेतात तसा स्टान्स घेतला आणि बॉल डायरेक्ट स्टॅन्डमध्ये भिरकावला.

मॉडर्न डे क्रिकेटमधला पहिला स्विच हिट..!

हा बॅट्समन होता, केविन पीटरसन. साडेसहा फूट उंची, तगडी तब्ब्येत आणि अंगात प्रचंड रग. हे धूड बॅटिंग करायला क्रीझवर उभं राहिलं, की फिक्स धडकी भरायची. कारण पीटरसन नुसता मारायचा नाही, तर समोरच्या टीमचा आत्मविश्वास संपवून टाकायचा. त्यादिवशीच्या स्विच हिटनं श्रीलंकन टीमचा आत्मविश्वास खच्ची झाला होता.

पुढं काय झालं तर, मुरलीधरननं एकाच बॉलच्या अंतरानं पीटरसनला एलबीडब्ल्यू केलं. ती लढाई भले मुरली जिंकला असेल, पण केविन पीटरसनच्या एका शॉटनं बॅटिंगचं चित्रच बदलून टाकलं.

पीटरसन हे अजब रसायन होतं. साऊथ आफ्रिकेकडून खेळायची संधी असताना सुद्धा तो प्रचंड स्पर्धा असलेल्या इंग्लंडमध्ये आला. तिथं टेकनिकला प्रचंड महत्त्व होतं. पीटरसनकडे टेक्निक होतं, मात्र त्याची खरी ताकद होती हाणामारीमध्ये. पायांमध्ये बरंच अंतर घेऊन पीटरसन क्रीझवर उभा राहायचा आणि मैदानातल्या प्रत्येक कोपऱ्यात बॉल पोहोचायचा.

मुरलीला केलेली हाणामारी हे तर हिमनगाचं टोक होतं, पीटरसन काय होता हे सांगणाऱ्या त्याच्या दोन इनिंग्स बघुयात.

ओव्हल २००५. ॲशेस सिरीजची शेवटची मॅच आणि त्याचा शेवटचा दिवस. तब्बल १६ वर्षांनी इंग्लंडला ॲशेस जिंकण्याचा चान्स होता. त्यांच्याकडे २-१ अशी आघाडी होती. ही शेवटची टेस्ट ड्रॉ केली असती, तरी चाललं असतं. पण त्यासाठी कुणीतरी क्रीझवर टिकून राहणं गरजेचं होतं.

त्यादिवशी ग्लेन मॅकग्रा खतरनाक फॉर्ममध्ये होता. त्यानं आधी मायकेल वॉनला खोललं आणि पुढच्याच बॉलवर इयान बेलला. क्रीझवर आला पीटरसन, हॅटट्रिक बॉल होता. मॅकग्रानं बाऊन्सर टाकला, जो पीटरसनच्या खांद्यांना चाटून गेला. पुढं शेन वॉर्ननं पीटरसनचा कॅच सोडला आणि मैदानावर जलवा सुरू झाला.

पीटरसननं वॉर्न, मॅकग्रा, ब्रेट ली कुणालाच सुट्टी दिली नाही आणि जिथं डिफेन्स करायची गरज होती, तिथं हाणामारी करायला घेतली. त्या मॅचमध्ये पीटरसननं सेंच्युरी केली होती, दुसऱ्या बाजूला कॉलिंगवूडनं ५१ बॉलमध्ये १० रन्स केले, पण हा बाबाजी मात्र पेटला होता. त्याच्या १५८ रन्समुळं इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर दबाव टाकला आणि पुढं मॅचही ड्रॉ झाली.

या हाणामारी मागचं पीटरसनचं लॉजिक सोपं होतं, तो सांगतो, ‘ती माझी पहिलीच सिरीज होती, मी काही चांगले स्कोअर केले होते पण माझ्या नावापुढं शतक जमा नव्हतं. संधी मिळाली, कॅप्टननं सांगितलेलं तुला हवं तसं खेळ म्हणून तसा खेळलो, शतक मारलं.’

विषय कट.

दुसरा किस्सा मुंबईतला, वानखेडेवरचा.

इंग्लंड भारतात आलं होतं, पहिल्या टेस्टमध्ये भारतानं त्यांचा गंमतमध्ये बाजार उठवला होता. दुसऱ्या टेस्टमध्येही अशाच गंमतीची अपेक्षा होती. त्यात पहिल्या इनिंगमध्ये भारतानं ३२७ रन्स लावले होते. इंग्लंड स्पिनसमोर गंडेल असं वाटत होतं, मात्र कुकनं एक बाजू लावून धरली आणि दुसऱ्या बाजूला होता पीटरसन.

इंग्लंडचा कॅप्टन हे मानाचं पद पीटरसनकडून काढून घेण्यात आलं होतं, मैदानाबाहेरचे वाद त्याची पाठ सोडत नव्हते आणि एवढं सगळं सुरू असताना स्पिनर्सचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. लेफ्ट आर्म स्पिनरसमोर तर पीटरसन फिक्स गंडत होता. त्यात भारताकडं प्रग्यान ओझा होता.

पण त्यादिवशी वानखेडेवर पीटरसननं ओझाला ठरवून बुकलला. त्याच्या बॅटमधून रन्स अक्षरश: बरसत होते. त्यानं पाच तासांपेक्षा जास्त वेळ क्रीझवर काढला. जिथं गरज होती तिथं डिफेन्स केला आणि प्रत्येक चुकीचा बॉल उचलून मारला. टेस्ट इनिंगमध्ये २० फोर आणि ४ सिक्स मारत त्यानं १८६ रन्स केले. अखेर ओझानंच त्याची विकेट काढली.

या इनिंगनं पीटरसनला त्याचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला. भारतीयांचा कार्यक्रम मात्र गंडला आणि भारतानं ती मॅच १० विकेटनं गमावली.

पीटरसननं आपल्या पूर्ण करिअरमध्ये जगाला धक्के देण्याचं काम केलं. त्याच्या चित्रविचित्र केसांची आणि त्यांना दिलेल्या रंगाची चर्चा व्हायची, तेव्हा हा गडी केस बारीक करुन यायचा. सगळं जग म्हणायचं स्विच हिट मारणं चुकीचं आहे, पीटरसन पुढच्या मॅचला हमखास स्विच हिट मारायचा. मॅच वाचवायला डिफेन्स करणं गरजेचं आहे, असं जेव्हा जगाला वाटायचं तेव्हा पीटरसन बॉलिंगवर तुटून पडायचा.

त्याच्याकडे लंबी रेस का घोडा म्हणून पाहिलं जात होतं, तेव्हा यानं ९ वर्षांमध्येच टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला. शंभर टेस्ट खेळला, विक्रम केले, मॅचेस जिंकवून दिल्या आणि बाजूला झाला. पुढं टी२० क्रिकेट खेळत त्यानं जग गाजवलं, पण पीटरसन कधीच लेजंडमध्ये गणला गेला नाही. त्याला त्याचा फरकही पडला नाही म्हणा…

पीटरसन लेजंड नसला, तरी राक्षस होता… तो क्रीझवर असला की तोंडातून शिवी यायची आणि इथंच पीटरसन जिंकायचा!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.