क्रोनिए हिरो की व्हिलन याचं उत्तर मिळतं, पण त्याच्या मृत्यूच्या कारणावर विश्वास बसत नाही

साऊथ आफ्रिकन प्लेअर्सला भारतातून प्रेम मिळणं हे काय नवीन नाही. एबी डिव्हिलिअर्स, डेल स्टेन, ग्रॅम स्मिथ, मखाया एंटीनी अशी प्रचंड मोठी लिस्ट आहे.

पण स्टेन, एबीडीच्याही आधी एक असा आफ्रिकन प्लेअर होता, जो भारतीय चाहत्यांना प्रचंड आवडायचा, आफ्रिकन लोकांसाठी तर तो हिरो होता, असं वाटायचं याच्यासारखं कुणी कधी बनूच शकत नाही.

त्याचं नाव हॅन्सी क्रोनिए, ‘Hansie Cronje’ या स्पेलिंगमुळं त्याच्या नावाचे इतके उच्चार तयार झाले होते, की गिणतीच नाही.

कुणी क्रॉंजे म्हणायचं, कुणी क्रोन्जे… पण गडी होता लय भारी.

जितका दिसायला देखणा होता, तितकीच देखणी बॅटिंग करायचा. बॉलिंग फार फास्ट नव्हती, पण अचूक नक्कीच होती. त्यामुळे धावांचे आणि विकेट्सचे आकडे तक्त्यात वाढतच राहिले… पण त्याही पेक्षा क्रोनिएचा महत्त्वाचा गुण होता कॅप्टन्सी. अगदी लहान वयात साऊथ आफ्रिकेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी घेऊनही क्रोनिएनं टीम घडवली आणि कित्येक प्लेअर्स उभे केले.

एवढं गुणांचं भांडार असूनही क्रोनिए लक्षात राहिला तो मॅच फिक्सिंग कांड आणि अपघाती मृत्युमुळं.

निदा फाजलींचा एक शेर आहे,

हर आदमी में होते हैं, दस बीस आदमी,
जिसको भी देखना हो कई बार देखना…

हा शेर क्रोनिएला अगदी परफेक्ट सुट व्हायचा, कारण ज्या प्रमाणात लोकांनी त्याच्यावर प्रेम केलं, त्याच्या दुप्पट तिरस्कार फिक्सिंग कांडसमोर आलं तेव्हा केला. पण एवढं होऊनही त्याची लोकांच्या मनातली जागा गेली नाही, कारणं बदलली मात्र क्रोनिए हिरोच राहिला..!

सगळ्या कुटुंबालाच खेळाची पार्श्वभूमी असल्यानं क्रोनिएनं क्रिकेटर बनण्यात फार आश्चर्य वाटण्याची गोष्ट नव्हती. साऊथ आफ्रिकन संघ त्यांना लागलेल्या बॅनमधून नुकताच बाहेर पडत होता, तेव्हा इंडिया टूरसाठी क्रोनिएची ‘डेव्हलपमेंट प्लेअर’ म्हणून निवड झालेली, मात्र त्याच्यातलं टॅलेंट बघून लवकरच त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यात संघात निवड झाली.

एक एक टप्पे पार पडत गेले आणि वयाच्या २५ व्या वर्षी हॅन्सी क्रोनिए साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा कॅप्टन झाला. त्यानं संघातल्या नवख्या प्लेअरपासून अनुभवी प्लेअरपर्यंत प्रत्येकाला आत्मविश्वास दिला, बळ दिलं. त्यानं लीड केलेल्या ५३ टेस्ट मॅचेसपैकी २७ टेस्ट मॅचेस आफ्रिकेनं जिंकल्या. वनडेमध्ये हा आकडा १३८ पैकी ९९ मॅचेसमधला विजय असा होता.

कॅलिस, बाऊचर, डोनाल्ड, गिब्स, पोलॉक, निकी बोएसारखे अनेक गुणवान प्लेअर्सही त्याच्याच कॅप्टन्सीमध्ये पुढं आले.

क्रोनिएच्या नेतृत्वातही आफ्रिकेला वर्ल्डकप तेवढा जिंकता आला नाही, १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये ते वेस्ट इंडिज विरुद्ध क्वार्टर फायनलला हरले आणि १९९९ ला क्लूझनर-डोनाल्डच्या पळण्याच्या घोळात स्वप्न तुटलं ते तुटलंच.

या मॅचनंतर एका कार्यक्रमात क्रोनिएला विचारण्यात आलं होतं, ‘तुझी सगळ्यात मोठी इच्छा काय आहे?’ तो म्हणाला होता, ‘एक रन..’

मुथय्या मुरलीधरन म्हणजे बॅट्समनचा कर्दनकाळ. त्यात उपखंडाबाहेरचे प्लेअर त्याच्या स्पिनला बेक्कार टरकून असायचे. मुरली आणि क्रोनिएमधली गाजलेली लढाई झाली होती, १९९८ मध्ये सेंच्यूरियनवर. पहिल्या इनिंगमध्ये मुरलीनं क्रोनिएला किरकोळीत खोललं होतं, पण दुसऱ्या इनिंगमध्ये क्रोनिए बादशहा ठरला होता. सनासना तीन विकेट्स काढणाऱ्या मुरलीला त्यानं दाद दिली नाही आणि ५ लांबलचक छ्गेही हाणले. त्याच्या झटपट ८२ रन्सचा आफ्रिकेच्या विजयात मोलाचा वाटा होता.

इतिहासात डोकावून पाहिलं, तर अशा एक नाही कित्येक मॅचेस मिळतील, ज्या क्रोनिएनं गाजवल्या. पण तो लक्षात राहिला ते फिक्सिंग कांड आफ्रिकेलाच नाही तर जगाला हादरवणारं होतं.

२००० साली भारत विरुद्ध आफ्रिका सिरीज झाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला, तो म्हणजे मॅच फिक्सिंगचा आणि त्यात क्रोनिएचा संबंध असल्याचा. सुरुवातीला त्यानं हा आरोप फेटाळून लावला. ९ एप्रिलला त्यानं पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपण निर्दोष असल्याचं सांगितलं.

या गोष्टीला दोनच दिवस उलटून गेले आणि क्रोनिएनं आफ्रिकन बोर्डाच्या मॅनेजिंग डायरेक्टरला रात्री तीन वाजता फोन करुन आपल्या कृत्यांची कबुली दिली. त्याची कॅप्टन्सी आणि संघातली जागा या दोन्ही गोष्टी गेल्या. पुढं चौकशीची कित्येक सत्र झाली, हर्शेल गिब्ज आणि निकी बोएचं नाव पुढं आलं, आपल्या अझरुद्दीनचं नावही क्रोनिएनं घेतलं.

१९९६ पासून २००० पर्यंत पाच वेगवेगळ्या प्रसंगी आपण बुकींकडून १ लाख ४० हजार पौंड घेतले, अशी कबुली त्यानं दिली. आजीवन क्रिकेटबंदी लागली आणि आफ्रिकेच्या हिरोनं चर्चा आणि आरोपांच्या केंद्रस्थानी राहून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

किंग कमिशनच्या चौकशीत बरेच खुलासे झाले पण कित्येक अनुत्तरित राहिले. क्रोनिएनं कबुली दिली असली, तरी तो फक्त एक मोहरा होता हे जगजाहीर होतं. बेटिंग आणि फिक्सिंगच्या मुळाशी असणाऱ्यांपर्यंत पोलीस किंवा आयसीसी कधीच पोहोचलं नाही.

क्रोनिएची लोकप्रियता इतकी अफाट होती की, नेल्सन मंडेला यांनी या सगळ्या प्रकरणानंतर क्रोनिएला भेट दिली. त्यांनी क्रोनिएला एक साधा मेसेज दिला होता, “तू मोठी चूक केली आहेस, जर तुझ्यावरचे आरोप सिद्ध झाले किंवा नाही झाले तरीही, या सगळ्यातून तू भरारी घेऊ शकतोस, तेवढी क्षमता तुझ्यामध्ये नक्की आहे. तू अजूनही देशासाठी रोल मॉडेल बनू शकतोस.”

क्रिकेट कायमचं सुटल्यावर क्रोनिएनं एका कंपनीत काम करत नवं आयुष्य सुरू केलं होतं, तिथं त्याचं डेडिकेशन, लीडरशिप स्किल्स याचा त्याला प्रचंड फायदा होत होता.

पण सगळं पुन्हा सुरळीत झालंच नाही…

३१ मे २००२ ला एका बिझनेस मिटिंगवरुन तो घरी परत येत होता. ट्रॅफिकमुळं आधीच उशीर झालेला, त्यात ‘बेल इक्विपमेंट’ या कंपनीत त्याला मिटिंगसाठी जावं लागलं. क्रिकेट सोडावं लागल्यानंतर तो याच कंपनीत काही महिने कामाला होता. ते न फिटणारं ऋण फेडणं बाकी होतं, म्हणून क्रोनिए तिथं गेला. आणखी उशीर झाला आणि फ्लाईट चुकली.

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं त्यानं ‘एअर क्वारियस’च्या चार्टर्ड विमानातून प्रवास करायचं ठरवलं, हा तसा त्याचा नेहमीचा प्रवास होता… पण १ जून २००२ च्या पहाटे तो पूर्ण झालाच नाही.

क्रोनिएचं विमान पर्वतांना धडकलं आणि जिंदगीच्या मैदानातली त्याची इनिंग अनपेक्षितरित्या संपली…

कायम याच मार्गावर प्रवास करणारं विमान धडकलं आणि लोकांमध्ये अनेक कुशंका निर्माण झाल्या. किंग कमिशनसमोर एकट्या क्रोनिएनं आपली ७२ बँक अकाऊंट्स असल्याचं सांगितलेलं. बेटिंग आणि फिक्सिंगच्या विश्वात क्रोनिए एक ठिपका होता, तर ते अवकाश व्यापणाऱ्यांकडे किती संपत्ती असेल..?

 पण क्रोनिएच्या मृत्यूमुळे ही संपत्ती ना कधी पुढे आली आणि ना ते अवकाश व्यापणाऱ्यांची नावं.

साहजिकच क्रोनिएचा मृत्यू हा घातपात होता की अपघात, हे कोडं अपघाताचा निर्वाळा देऊनही कायम राहिलं. कारण दिसतं तसं नसतंय, हे क्रोनिएकडे बघूनच दुनियेला समजलं होतं.

या विषयावर आरोप होतील, अंदाज लावले जातील, पण क्रोनिएची लोकप्रियता कधी कमी होणार नाही. ‘हॅन्सीला खेळताना ग्राऊंडवर थुंकणं थांबवायला सांगा, कारण आमची मुलंही त्याचं अनुकरण करतात,’ या अशा तक्रारी आफ्रिकन आया क्रोनिएच्या वडिलांकडे करायच्या, तिथून सुरू झालेली लोकप्रियता अजूनही आफ्रिकन लोकांनी त्याचा फोटो असलेला टीशर्ट, कॉफी मग आणि वॉलपेपरमधून कायम ठेवलीये.

सहानुभूती म्हणा, कबुली देण्याचा प्रामाणिकपणा म्हणा किंवा खेळामुळं आफ्रिकेला गाठून दिलेली उंची.. आफ्रिकन लोकांना क्रोनिए नावाच्या गारुडानं मोहित केलं. मात्र त्याच्या मृत्यू अपघातामुळं झाला यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.

२० वर्ष उलटून गेली तरी अजूनही साऊथ आफ्रिकन क्रिकेट स्थिरस्थावर झालं नाही, ग्रॅम स्मिथनं त्याच्या काळात टीमला अजिंक्य बनवलं पण विश्वविजेतं बनवणं त्यालाही जमलं नाही. आफ्रिकेवरचा चोकर्सचा शिक्का गडद होत गेला आणि प्रत्येकवेळी हॅन्सी क्रोनिएची आठवण तेवढी येत राहिली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.