जेव्हा नेपाळच्या पाकिस्तानी एजंटला संपवण्यासाठी भारताचे दोन “डॉन” वापरण्यात आले…

१९९० च्या सुमाराची गोष्ट आहे. लखनौच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी महागडी अशी फियाट खरेदी केली होती. फियाट खरेदी केली खरी पण पुढच्या दहाच दिवसात ही गाडी चोरीला गेली.. 

जिल्हाधिकाऱ्यांची गाडी चोरीला जाते ही साधी गोष्ट नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. अगदी आपल्या मित्रांना बोलून स्टेट पोलीस कामाला लावलं.

शोधाशोध केल्यानंतर टिम मिळाली. ही गाडी होती नेपाळमध्ये.. 

नेपाळच्या मिर्झा बेग याच्या गॅरेजमध्ये गाडी उभी आहे अस सांगण्यात आलं. सोप्प होतं युपी पोलिसांना पाठवायचं आणि गाडी घेवून यायची. पण दम कोणाच्यातच नव्हतं. मिर्झा बेग ला साधं बघणं देखील अशक्य होतं. गाडी घेवून येणं तर अशक्य. 

युपी पोलीसांमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपआपले कॉन्टेक्ट वापरले. शेवटी मांडवली करायचं ठरलं आणि दहा हजार रुपये देवून जिल्हाधिकाऱ्यांनी आपलीच गाडी मिर्झा बेग कडून सोडवून घेतली… 

या मिर्झा बेगचा संपूर्ण नेपाळमध्ये करिष्मा होता. त्याचं प्रमुख काम म्हणजे भारतातल्या डॉन लोकांना नेपाळमार्गे बाहेर पाठवायचं, लपण्यासाठी जागा द्यायची. सोबत पाकिस्तान, चीन मार्गे येणाऱ्या घुसखोरांना भारतात सुरक्षित पोहचवायचं.

थोडक्यात मिर्झा बेग हा एक माध्यम म्हणून काम करायचा.

त्याच्यामुळे भारतातले अट्टल गुन्हेगार भारताबाहेर यशस्वीपणे पळून जायचे. अस सांगतात की डी गॅंगमधल्या निम्म्याहून अधिक लोकांना याच मिर्झा बेगने भारताबाहेर सुरक्षित नेलं. त्यामुळे टोळी कोणतिही असो मिर्झा बेग सर्वांना महत्वाचा असा होता. 

पण तुम्हाला वाटेल मिर्झा बेग म्हणजे कोणीतरी छपरी गुंडा असावा. तर तस नव्हतं. मिर्झा बेग हा नेपाळमध्ये खासदार होता, मंत्री होता.

मुस्लीम समाजाता तो नेता देखील होता.  याच मिर्झाचा लोकल धंदा चालायचा तो गाड्यांच्या चोरीचा. भारतातून गाड्या उचलणं आणि नेपाळमध्ये विकणं. दोन्ही देशात सीमारेषा असली तरी ती फक्त कागदावर. त्यामुळे गुन्हे दाखल व्हायचे तेव्हा मिर्झा बेगला फायदा घेता यायचा. भारताने रितसर नेपाळला कळवणं आणि नेपाळने कारवाई करणं हे अशक्यच झालं होतं. लोकल पातळीवर मिर्झाचं बरच वर्चस्व, त्यातही नेता असल्यानं सगळं माहिती असूनही नेपाळ मिर्झाला काहीही करत नव्हतं. 

दूसरीकडे भारताच्या जेलमध्ये बबलू श्रीवास्तव खितपत पडलेला. कधी एकदा इथून बाहेर पडतो अस त्याला झालेलं. अशा वेळी गुप्तचर यंत्रणांनी एक फिल्डिंग लावली. बबलू श्रीवास्तवला सांगण्यात आलं की तुच मिर्झा बेगचा गेम करं… 

पण बबलू श्रीवास्तवने ही ऑफर एका फटक्यात धुडकावून लावली. बबलू श्रीवास्तव आणि मिर्झा बेगचे चांगले संबंध होते. मिर्झा बबलूला गुरू मानायचा. त्याला रिस्पेक्ट द्यायचा. अनेक गुन्ह्यात बबलूला मिर्झाने मदत केली होती.. 

अशा वेळी युपी पोलीसांमधील एक वरिष्ठ अधिकारी उपयोगाला आले. या अधिकाऱ्याने बबलू श्रीवास्तवला सुरवातीच्या काळात मदत केली होती. त्यानंतर एक चांगला अधिकारी म्हणून बबलू या अधिकाऱ्यांना किंमत द्यायचा. अगदी त्यांच्या घरात देखील येणंजाणं होतं. याच अधिकाऱ्याचा वापर गुप्तचर यंत्रणेनं करुन घेतला.

या पोलीस अधिकाऱ्यांची आणि बबलू श्रीवास्तवची भेट जेलमध्ये करुन देण्यात आली. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी बबलूला देशप्रेमाची साद घातली. बबलू तयार झाला.. 

पण बबलू श्रीवास्तव हे काम पुर्णच करेल याची शंका होती. अचानक बबलू पलटी मारण्याची देखील शक्यता होती. तेव्हा मिर्झा बेगचा काटा काढण्यासाठी अजून एक डॉन वापरण्याची तयारी करण्यात आली. हा डॉन होता छोटा राजन. छोटा राजन व बबलू श्रीवास्तव या दोघांना मिर्झा बेगच्या मागे फिल्डिंग लावण्यासाठी सोडण्यात आलं.. 

मिर्झा सहसा आपल्या एरियातून बाहेर पडायचा नाही. एखाद्या ठिकाणावरून जाताना देखील संपूर्ण रेकी करुनच तो बाहेर पडायचा. त्यामुळं मिर्झाला संपवण हा साधा खेळ नव्हता. ठिकठिकाणी मिर्झाचे हस्तक देखील होते, त्यामुळे त्याला टिप मिळाली तर आपलाच खेळ खल्लास होण्याची शक्यता होती.. 

तेव्हा बबलूने या कामासाठी आपल्याकडे असणारी अर्चना शर्माला वापरून घ्यायचं ठरवलं. मुंबईच्या आर्केस्टामध्ये काम करणारी अर्चना हळुहळु दुबईत काम करु लागली. मुंबई दुबईच्या कनेक्शनमध्ये ती बबलु श्रीवास्तवच्या संपर्कात आली व तिथून ती बबलूसाठीच काम करु लागली. थंड डोक्याने एखादा गेम करायचा असेल तर बबलू अर्चनाला वापरून घेत असे. 

बबलूने नेपालच्या मिर्झा बेगशी संपर्क करुन त्याला सांगितंल की, अर्चना शर्माला पोलीस त्रास देत आहेत. तिला काही दिवस नेपाळमध्ये ठेव. ती माझी खास असल्यानं तिला चांगल्या ठिकाणी आसरा दे.. 

प्लॅननुसार अर्चना शर्मा मिर्झा बेगने दिलेल्या ठिकाणी गेली. मिर्झा बेगच्या हद्दीतच एका सुरक्षित ठिकाणी प्लॅटवर तिला ठेवण्यात आलं. आत्ता ती मिर्झा बेगसोबत जवळीक साधायचा चान्स शोधू लागली. काहीही करुन मिर्झा बेगसोबत संपर्क वाढवायचा इतकच टार्गेट तिला देण्यात आलं होतं.

१ जुन १९९८ ला ती नेपाळमध्ये पोहचली होती.

इकडे बबलू श्रीवास्तवने आपले शूटर फरीद तनाशा, मंजीत सिंग मंगे यांच्यासोबत अजून दोघांना नेपाळमध्ये पाठवलं होतं.. 

आत्ता वेळ होती ती फक्त अचूक डाव टाकायची. यासाठी अर्चना शर्माने त्याला टप्प्यात आणायचा प्लॅन आखण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे अर्चना बेगशी जवळीक साधू लागली. पण बेग भुलणारा नव्हता. बेग तिला भेटण्यासाठी टाळाटाळ करू लागला. 

तेव्हा पुन्हा बबलु श्रीवास्तव मध्ये पडला. त्याने मिर्झा बेगला फोनवर सांगितलं की अर्चना एकटी आहे तूम्हीच भेटून तिला थोडा धीर द्यावा. मिर्झा भेटायला तयार झाला.. 

ती तारिख होती २९ जून १९९८… 

रात्री मिर्झा बेग अर्चनाच्या घरी जेवायला येणार होता. ठरल्याप्रमाणे तो आला देखील. दरम्यानच्या काळात आपल्या घराच्या आजूबाजूला अर्चनाने शूट पेरले होते. अर्चनाने या शूटरना सांगितलेलं की मिर्झा आला की सर्व काही व्यवस्थित असेल तरच ती बाल्कनीत येईल. त्यानंतर काही वेळात जेवण होईल व तो समोरच्या दरवाजाने बाहेर पडले तेव्हा त्याला शूट करा.. 

मिर्झा घरी आल्यानंतर अर्चना त्याच्याशी बोलू लागली. पण मिर्झा अस्वस्थ वाटत होता. तेव्हा अर्चना जेवण आणण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेली. मिर्झाने बाल्कनीकडे बघितलं तर ती बाल्कनीत उभा होती. बाल्कनीत अचानक का गेली? मिर्झाला डाव कळाला. मिर्झा थेट मागच्या दाराने बाहेर पळून गेला. इकडे अर्चना समोरच्या दाराने बाहेर आली आणि शुटरला ओरडून सांगू लागली की, मिर्झा मागच्या दाराने पळून गेला आहे.. 

मिर्झाच्या ड्रायव्हरने हे पाहताच क्रॉस फायरिंग सुरू केलं. यात ड्रायव्हर मारला गेला. पाठलाग करुन मिर्झाला देखील संपवण्यात आलं… 

मिर्झा बेग चा गेम ही दाऊद टोळीसाठी प्रचंड धक्का देणारी गोष्ट होती.

पाकिस्तानच्या ISI नेटवर्कला देखील त्यामुळे खिंडार पडलं. त्यानंतर माध्यमांमधून थियरी मांडण्यात आली. 

एका थेअरीनुसार बबलू श्रीवास्तवने नेपाळी पासपोर्ट तयार केला होता. मात्र १९९५ साली त्याला सिंगापूरमध्ये अटक झाली. नेपाळी पासपोर्ट जप्त करुन त्याला भारताकडे सोपवण्यात आले. तेव्हा मिर्झा बेगने त्याला मदत केली नाही म्हणून त्यांचा गेम झाला.. 

दूसरी थेअरी अशी होती की, तो छोटा राजन आणि दाऊदच्या गॅंगवारचा बळी ठरला. कारण छोटा राजनने हा गेम आपण केला होता असा क्लेम टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

पण अस सांगितलं जात की राजनने आपले शूटर पाठवले गेम करण्यात देखील त्याचे शूटर होते पण बरेच प्रयत्न बबलू श्रीवास्तव ने केले होते. त्यामुळे हे क्रेडिट बबलू श्रीवास्तवला जातं पण देशप्रेमाचं क्रेडिट घेण्यासाठी राजनने आपल्याकडे क्रेडिट घेतलं.. 

दूसरी गोष्ट म्हणजे माध्यमांमधून अर्चनाची माहिती ती मिर्झा बेगची दूसरी बायको होती म्हणून छापून आली. त्यानंतर अर्चना कधीच कोणाला दिसली नाही. ती कुठे गेली हे देखील सांगण्यात आल नाही. असही सांगतात की बबलू श्रीवास्तवनेच तिला कायमचं संपवलं… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.