स्वराज्याचे दूसरे ‘तानाजी’ , ज्यांनी सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला.

गड आला पण सिंह गेला ही म्हण शालेय पाठ्यपुस्तकात वाचल्यापासून आपल्या सगळ्यांची पाठ आहे. १६७० मध्ये तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कोंढाणा गड जिंकला होता आणि त्यानंतर त्याचे नामकरण करून ठेवण्यात आले. बस एवढाच काय तो या गडाचा इतिहास लोकांना माहित आहे.

पण प्रत्यक्षात या गडाचा इतिहास हा दोन दशकांहून अधिक काळाचा आहे. १६७० ते १६९३ दरम्यान सिंहगडावर मराठे-मोगल यांची आठ वेळा सत्तापालट झाली होती. त्यावरून सिंहगड किती महत्वाचा होता हे सहज लक्षात येते.

१६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिंहगड, पुरंदर, राजगड, रायगड यासारखे महत्त्वाचे व मोक्याच्या ठिकाणी असलेले किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले होते. त्यामुळे मराठ्यांना देशपातळीवर हालचाली करणे अवघड झाले होते. शिवाय कोकणातील प्रतिकार सुद्धा मंदावत चालला होता. त्यामुळे मोगलांच्या ताब्यात गेलेले हे गड पुन्हा स्वराज्यात आणणे गरजेचे होते. १६८६ मध्ये संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी सिंहगड पुन्हा जिंकला होता पण तेव्हा तो जास्त काळ मराठ्यांच्या ताब्यात राहिला नाही.

मोगलांनी संभाजी महाराजांना कैद केल्यावर तीन वर्षांनीच म्हणजे १६८९ मध्ये कुठलाच संघर्ष न करता त्यांनी सिंहगड परत आपल्या ताब्यात घेतला.

संभाजी महाराजांचा मृत्यू होऊन ४ वर्षे झाली होती. औरंगजेब संपूर्ण स्वराज्य गिळंकृत करण्यास चवताळून उठला होता. त्याकाळात राजाराम महाराज स्वराज्यची तिसरी राजधानी असलेल्या तामिळनाडू मधील जिंजी गडावर होते. तर इकडे संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, शंकराजी नारायण सचिव हे स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी औरंगजेबाला झुंज देत होते.

अशातच १६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी सिंहगडावर कब्जा मिळवण्यासाठी बेत आखला.

शिवाजी-संभाजी महाराजांच्या एका शब्दावर प्राणाची बाजी लावणारे होऊन गेले होते. तसेच अनेक शूरवीर राजाराम महाराजांच्याही पाठीशी होते. त्यातलीच एक म्हणजे नावजी बलकवडे.

नावजींनी शंकराजींना सिंहगड जिंकून देण्याचे कबुल केले. नावजी हे शंकराजींच्या पायदळातील पंचसहस्त्री होते. अंगापिंडाने माणूस धिप्पाड आणि दणकट. जणू दुसरे तानाजीच ते पण, अनुभवी थोडे कमी होते. शंकराजींना सिंहगडाच्या भौगोलिक परिस्थितीचा चांगला अंदाज होता. हे काम नावजीसारख्या एकट्या दुकट्याचे नाही हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे नावजी सोबत विठोजी कारके यांना मदतनीस म्हणून दिले.

२५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे सोबत घेऊन राजमाचीवरून सिंहगडाकडे कूच केली.

पावसाळ्याच्या दिवसात भयाण अंधारात मराठे सह्याद्रीचे दऱ्याखोरे तुडवत निघाले आणि सिंहगडाजवळच्या जंगलात येऊन पोहचले. योग्य संधीची वाट बघत ते ५ दिवस तिथेच दबा धरून बसले. अखेर संधी मिळाली आणि ३० जून रोजी मध्यरात्री दोर आणि शिड्या बरोबर घेऊन गड चढायला लागले. ते अवघड मार्गाने खाचा-खळग्यातून गडाच्या तटबंदी खाली आले.

मात्र गडावर मोगलांची गस्त सुरु होती. कारण मराठे कधी, कुठून आणि कसा हल्ला करतील याचा नेम नसायचा म्हणून ते कायमच सावधगिरी बाळगून असायचे. मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाही.

सूर्योदय झाला तशी रात्रीच्या पहारेकारंची वेळ नवे पहारेकरी गस्तीसाठी येत होते. पावसाळ्यातील धुक्यांमुळे खाली काय चालले हे ते वरतून दिसत नव्हते. याच संधीचा फायदा घेत नावजींनी शिड्या तटाला आणि लगेचच मावळ्यांसह ते गडावर आले. काही कळायच्या आत मावळ्यांनी हल्ला करीत गनिमीकाव्याने गडावरील पहारेकारींना कापून काढले. या अकस्मातपणे झालेल्या हल्ल्याने मोगल सैन्याचे मोठे नुकसान झाले.

मराठे गडावर शिरल्याची चाहूल किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला असता आणि त्याने नावजींच्या सैन्यावर हल्ला चढवला असता. पण तसे घडू न देता नावजींनी आपले काम चोखपणे पार पडले होते.

नावजींचे धैर्य बघून त्यांच्यासोबत आलेल्या विठोजी कारकेंना हुरूप आला. ते संधीची वाट बघत तटाखाली थांबले. ते ही शिड्या लावून वर आले. आता मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहचले होते. हर हर महादेव गजराने गड दणाणून सोडला आणि सिंहगड पुन्हा एकदा स्वराज्यात परत आला. ती तारीख होती १ जुलै १६९३.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.