१०० वर्षे उलटून गेली तरी १ रुपयाची नोट एका ऐतिहासिक कारणामुळं सरकारनं बंद केलेली नाही

भिडू पैसे लै महत्वाची गोष्ट आहे. पैशाच्या बाबतीत म्हणा किंवा नोटांच्या बाबतीत आपल्या देशात अशा काही घटना घडून गेल्या की आता त्या विनोदी वाटतात आणि कधीकधी असं वाटून जातं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बर 500- 1000 च्या नोटाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नवीन 2000 आणि 200ची नोट लॉन्च करण्यात आली होती. पण जर तुम्ही खरचं नॉस्टॅल्जिया एन्जॉय करता तर तुम्हाला 1, 2 रुपयांची नोट आठवत असेल. या नोटा म्हणजे त्याकाळी लहान पोरांची चंगळ असायची.

आज पोरांना पॉकेट मनी मिळतो की नाही मिळत ते माहिती नाही पण या 1,2 रुपयांच्या नोटा पॉकेट मनी म्हणून मिळायच्या तेव्हा आपण जग जिंकलय असा फिल यायचा. घरी पाहुणेरावळे आले किंवा मामा वैगरे आले तर ते मस्त खिशातून एक एक रुपयांच्या नोटांचा कोरा करकरीत बंडल बाहेर काढायचे आणि घरातल्या नातवंडांना किंवा लहान मुलांना ती एक एक रुपयांच्या नोटांचा आस्वाद मिळायचा. या एक रूपयात या लहान पोरांची पार्टी व्हायची.

पण ते सोडा, आठवणी या सुखद आहेत या नोटेबद्दल. पण भिडू एक रुपयाच्या नोटेबद्दल इतका भावनिक होऊन का बोलतोय ? असा प्रश्न पडला असेल तुम्हाला पब्लिक त्याचं कारण सुद्धा ऐतिहासिक आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे या एक रुपयाच्या नोटेला छापून. पहिल्यांदा एक रुपयाची नोट 30 नोव्हेंबर 1917 रोजी लॉन्च केली गेली होती. तेव्हापासून ते आजवर या नोटेने बरेच आर्थिक चढउतार पाहिले. या नोटेचा प्रवास आणि काही महत्वाच्या facts बद्दल आपण जाणून घेऊया.

एक रुपयाची नोट भारतात 30 नोव्हेंबर 1917 रोजी लॉन्च झाली जी इंग्लंडमधून छापून आली होती. तेव्हा नोटा तिथेच छापल्या जायच्या जिथं सत्तेच केंद्र असायचं. या नोटेवर किंग जॉर्ज पंचमचा फोटो होता. ती नोट हाताने बनवलेल्या सफेद कागदावर छापण्यात आली होती, तिच्यावर ब्रिटिश वित्त सचिव एमएमएस गूबे, एसी वाटर्स आणि ए. डेनिंग यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या नोटांचे 25 पॅकेट बनवून इश्यू करण्यात आले होते.
याचं काही लिखित रेकॉर्ड नाहीय पण असं सांगण्यात येतं की एक रुपयाची नोट ही पहिल्या विश्वयुद्धाच्या कारणामुळे छापण्यात आली होती.

पहिलं विश्वयुद्ध 1914 ते 1918 या काळापर्यंत चाललं. 1917 मध्ये हे युद्ध रंगात आलेलं होतं तेव्हा हत्यार बनवण्यासाठी कोलोनियल अथॉरिटीला चांदी समवेत अनेक धातूंची गरज होती. त्यावेळी भारतात एक रुपयाच्या ठोकळ्यात 10.7 ग्रॅम चांदी असायची. त्यामुळे ठोकळे बनवण्याएवजी नोटा छापल्या जाऊ लागल्या. नोटा परवडू लागल्या. तेव्हा एक रुपयाच्या ठोकळ्यात 10.7 ग्रॅम चांदी असायची आज घडीला चांदीची किंमत ही 60 हजार किलोच्या वर आहे म्हणजे 10 ग्रॅम चांदी 600 रुपयांच्या आसपास. म्हणजे तेव्हाच्या तुलनेत बघितल तर एक रुपयात जितकं सामान खरेदी करता यायचं त्यालाच आजच्या काळात 600 रूपये देणं लागतं.

1926 मध्ये पहिल्यांदा एक रुपयांची नोट बंद करण्यात आली होती हेही प्रकरण आर्थिक नुकसान करणारच ठरलं होतं. 1940 साली एक रुपयाची नोट पुन्हा मार्केटमध्ये आली. जी 1994 सालापर्यंत चालू होती. 1994 साली भारत सरकारने पुन्हा तिच्यावर बंदी आणली आणि ही बंदी 2014 सालापर्यंत चालली. 1 जानेवारी 2015 पासून परत या नोटांची छपाई सुरू करण्यात आली.

एक रुपयाच्या नोटा भले दोनदा बंद करण्यात आल्या होत्या पण मार्केटमध्ये त्या लीगल होत्या. लोक या नोटांचा वापर खास क्षणी करताना दिसतात. 1994 पर्यंत ही नोट इंडिगो कलरमध्ये छापली जायची पण जेव्हा 2015 मध्ये हीची छपाई सुरू करण्यात आली तेव्हा त्यात गुलाबी आणि हिरवा रंग ॲड करण्यात आला.

इंडियन करन्सीच्या सगळ्या नोटा आरबीआय छापते पण एक रुपयाची नोट भारत सरकार छापते. यावर आरबीआय गव्हर्नर चे नाही तर वित्त सचिवाच्या स्वाक्षर्‍या असतात. बाकी नोटांवर ‘मैं धारक को इतने रुपए अदा करने का वचन देता हूं’ ही ओळ लिहिलेली असते तर एक रुपयाच्या नोटेवर ही ओळ लिहिलेली नाही त्यामुळे या नोटेला लायबिलिटी म्हणून ओळखलं जातं.

एका रिपोर्टनुसार 1917 ते 2017 या काळात एक रुपयाची नोट 125 वेगवेगळ्या पद्धतीने छापली गेली होती हा सगळा बदल नंबर आणि सह्या यांचा होता काही स्पेशल सिरीज नोट सुद्धा होत्या उदाहरणार्थ 1969 मध्ये गांधीजींच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या फोटोसकट एक खास सिरीज छापण्यात आली होती. 2017 पर्यंत ह्या नोटे मध्ये 28 वेळा बदल करण्यात आला आणि यावर एकवीस वेळा सिग्नेचर बदलण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये भारत सरकारने एक रुपयाच्या नोटा वर असलेला किंग जॉर्ज पंचम याचा फोटो हटवून अशोक लाटेच्या फोटोचा वापर करणं सुरू केलं पण खरं तर सरकार सगळ्यात आधी महात्मा गांधींचा फोटो लावू इच्छित होतं पण तसं काही घडलं नाही. भारत सरकारला एक रुपयाची नोट छापण्याचा अधिकार coinage act च्या अंतर्गत आहे या ऍक्टमध्ये वेळोवेळी बदल होत राहतात खरं तर एक रुपयाच्या नोटेचं डिस्ट्रीब्यूशन ही आरबीआयची जबाबदारी असते. तसंही नोटा बाबतचा कोणताही अधिकार आणि approval यांचा निर्णय सरकार आणि आरबीआय मिळून घेतात.

ऑनलाईन म्युझियम चे सीईओ सुशील अग्रवाल सांगतात की सणावारांच्या वेळी आणि लग्नाच्या वेळी एक रुपयांची नोटीची गड्डी पंधरा हजार रुपयांपर्यंत विकले जाते बाकीच्या लोकांना नोटा गोळा करण्याचा शौक असतो ते लोकं कलेक्टर मार्केटमध्ये हजारो रुपये देऊन या नोटा खरेदी करतात. नोव्हेंबर 1994 मध्ये एक रुपयाची नोट बंद केल्यानंतर सरकारने फेब्रुवारी 1995 मध्ये दोन रुपयेची आणि पाच रुपयांची नोट बंद करून टाकली होती पण त्याचे ठोकळे मात्र सुरू होते 2015 मध्ये छपाई सुरू झालेल्या नोटांवर वर भारत सरकार आणि खाली गव्हर्मेंट ऑफ इंडिया लिहिलेलं असतं असं सांगण्यात येते की ठोकळ्यांच्या कमतरतेमुळे सरकारने हा निर्णय घेतला होता.

2015 च्या अगोदर सुरू झालेल्या छापायच्या शेवटच्या वर्षांमध्ये चार करोड 40 लाख नोटा छापल्या गेल्या होत्या छपाई बंद झाल्यानंतर भारत सरकारने त्याच नोटांचे रूपांतर ठोकळ्यामध्ये करण्याचा आदेश दिला पण तसं घडलं नाही आणि नोटांच्या स्वरूपातच त्याचा वापर सुरू राहिला. जून 2002मध्ये आलेल्या आरबीआयच्या वार्षिक रिपोर्ट मध्ये एक रुपयाची नोट आणि त्याच्याबद्दलचे शेवटचे आकडे देण्यात आले होते त्यानुसार मार्च 2002 पर्यंत मार्केटमध्ये एक रुपयाच्या तीनशे आठ करोड नोटा चलन मध्ये होत्या. असा सगळा मॅटर आहे पण आजही काही लोकांनी एक रुपयाची नोट आपल्या पॉकेट मध्ये आठवण म्हणून जपून ठेवलेली आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.