आज राकेश शर्मा ७१ वर्षांचे झाले, या वयातही त्यांची अंतराळात जायची तयारी आहे.
भारतातल्या प्रत्येक लहानमुलाप्रमाणे तो तासनतास कागदी विमानाबरोबर खेळायचा. विमानात बसून उडण्याच त्याला भलतच आकर्षण होत. पुढे या वेडाला दिशा मिळाली. विमानात फक्त बसवायचं नाही तर लढाऊ विमान चालवून देशाचं संरक्षण करायचं त्याच्या मनान ठरवलं.
नियतीने मात्र त्याच्या भाग्यात याच्या पेक्षा भरपूर काही लिहून ठेवलं होत. तो मुलगा होता स्क्वाड्रन लिडर राकेश शर्मा.
राकेश शर्माचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबच्या पतियाळा शहरात झाला. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. भारताची प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल चालली होती. आण्विक विज्ञानापासून अंतराळशास्त्रापर्यंत कोणत्याच क्षेत्रात मागे पडायचं नाही असा चंग देशाने बांधला होता.
आदर्श स्वप्नांचा तो काळ. लढाऊ विमानाचा वैमानिक व्हायचं स्वप्न बघणारा राकेश शर्मा हैद्राबाद मधल्या निझाम कॉलेजमध्ये शिकत असतना एनडीए मध्ये प्रवेश मिळवण्याची तयारी केली आणि १९६६ साली तो पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये जॉईन झाला.
१९७० साली वयाच्या एकविसाव्या वर्षी भारतीय एअर फोर्स मध्ये टेस्ट पायलट म्हणून त्याची निवड झाली. तिथे त्याच्या विमान उडवण्याच्या कौशल्याचे दाखले दिले जायचे. मिग एअरक्राफ्टवर त्याची विशेष कमांड होती.
१९७१च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात त्याने शौर्य गाजवले. तिथूनच त्याच नाव चर्चेत आले. भारत दरम्यानच्या काळात अंतराळ क्षेत्रात प्रगती करत होता. इंदिरा गांधीनी पंतप्रधान झाल्यापासून इस्रो या संस्थेकडे विशेष लक्ष घातले होते.
जगभरातच चंद्रावर जाण्याची चढाओढ लागली होती. शीतयुद्धाच एक युद्ध अंतराळ स्पर्धेत सुद्धा दिसत होत.भारतासारखा विकसनशील देश सुद्धा अंतराळात जाण्याची महत्वाकांक्षा बाळगून होता. शीतयुद्धाचा परिणाम म्हणून रशिया भारताच्या स्पेस प्रोग्रामला मदत करत होता.
भारताने आपला पहिला उपग्रह रशियन जमिनीवरून सोडला. डॉ.कलाम सारखे शास्त्रज्ञ इस्रो मध्ये स्वदेशी बनावटीच्या उपग्रह वाहक यानाला बनवण्यासाठी जीवापाड मेहनत घेत होते.
अशातच एक दिवस बातमी आली, रशिया आपल्या सोयुझ यानातून एका भारतीयाला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला नेणार आहे. अमेरिका वगैरे देशांचा जळफळाट झाला.
भारतातून दोन सर्वोत्कृष्ट वैमानिकांची या इंटरकोसमोस स्पेस प्रोजेक्ट साठी निवड करण्यात आली. त्यांच नाव होते स्क्वाड्रन लिडर राकेश शर्मा आणि रविश मल्होत्रा.
राकेश शर्मा हे मुख्य अंतराळवीर असणार होते आणि रविश मल्होत्राना त्यांचा बॅकअप म्हणून ठेवण्यात आले होते. हि निवड होण्यापूर्वी त्यांची मानसिक दृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कणखर आहेत का याच्या अनेक टेस्ट घेण्यात आल्या होत्या, त्यात पास झाल्यावर त्यांची रवानगी रशियाला झाली.
तिथे आपल्या पत्नी व मुलांसह गेलेल्या राकेश शर्माना सर्वात आधी रशियन भाषा शिकावी लागली. कारण मोस्को मध्ये होणारा ट्रेनिंग प्रोग्राम पूर्णपणे रशियन भाषेत होता. रशिया मध्ये एकदीड वर्ष दोन्ही भारतीय वैमानिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारे ट्रेनिंग देण्यात आले. शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे हा सुद्धा ट्रेनिंगचा भाग होता.
२ एप्रिल १९८४ रोजी दोन इतर रशियन अंतराळवीरांच्या सोबत राकेश शर्माना सोयुझ अंतराळ यानातून लॉंच करण्यात आले. अख्ख्या देशाचे लक्ष या घटनेकडे होते. राकेश शर्मांच्या सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी अनेक आयाबहिणी देवाकडे प्रार्थना करत होत्या. सोयुझ यानाने राकेश शर्मा आणि त्यांच्या टीमला सुरक्षितपणे अंतरीक्ष केंद्रात पोहचवले. अंतराळात पोहचणारे ते पहिले भारतीय ठरले होते.
सात दिवस २१ तास ४० मिनिट ते तिथे होते. तिथे गेल्यावर त्यांनी बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग याचे संशोधन केले. याशिवाय शून्य गुरुत्वाकर्षण असताना योगाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम याचाही अभ्यास केला.
राकेश शर्मा अंतराळात असताना भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्याशी लाईव्ह बोलण्याची संधी मिळाली. अख्खा देश हा सुवर्णक्षण टीव्हीवरून अनुभवत होता. इंदिराजींनी पूर्ण देशातल्या मनातला प्रश्न राकेश शर्माना विचारला
“उपरसे भारत कैसा दिखता है?”
राकेश शर्मा म्हणाले,
“सारे जहां से अच्छा!!”
भारताचा अंतराळयात्री अवकाशात पोहचला ही जगभरात भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती. भारतातल्या प्रत्येक लहान मुलाच्या स्वप्नात आता फक्त पायलट होणार हेच नाही तर मी अंतराळवीर होणार हे सुद्धा दिसू लागले.
राकेश शर्मा सुरक्षितपणे परत आल्यावर त्यांना रशियन सरकारने हिरोची पदवी दिली. भारतात त्यांना अशोक चक्र देऊन सन्मान करण्यात आला तर रविश मल्होत्रा यांना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले.
राकेश शर्मा काही वर्षांनी विंग कमांडर या पदावरून वायुदलातून निवृत्त झाले. त्यांनी त्यानंतर हिंदुस्तान एरोनोटीक या संस्थेत चीफ टेस्ट पायलट म्हणून सेवा बजावली. तेजस या विमानच्या बांधणीमध्ये त्यांचाही हातभार आहे.
२०१९ सालच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की भारत स्वतःच्या अंतराळयानातून अंतराळवीरांना अंतरिक्षात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे आणि २०२२ पर्यंत हे प्रत्यक्षात येईल.
आज राकेश शर्मा ७१ वर्षाचे झाले. या वयातही ते परत एकदा अंतराळात जायचे झाले तर जाण्यासाठी ते एका पायावर तयार आहेत.
अख्या देशाचं स्वप्न जगलेल्या या माणसावर “सारे जहां से अच्छा” नावाचा चित्रपट येतोय. शाहरुख खान यात राकेश शर्माची भूमिका करतोय. यानिम्मिताने ऐंशीच्या दशकात पूर्ण देशाने बघितलेले हे सुंदर स्वप्न आपल्याला परत पाहता येईल.
हे ही वाच भिडू.
- HAL ज्याचा पाया सोलापूरच्या वालचंद यांनी रचला, तर गगनभरारी कोल्हापूरच्या घाटगेंनी दिली.
- जेव्हा सगळे अब्दुल कलामांचा राजीनामा मागत होते तेव्हा ते त्यांच्या पाठीशी राहिले.
- अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ?