प्रियदर्शन आणि राम गोपाल वर्मा या दोन दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री म्हणजे रसिका

कलाकार जेव्हा जग सोडून निघून जातात तेव्हा मागे उरतात त्यांच्या कलाकृती. या कलाकृती पाहून आपल्यातून अचानक निघून गेलेल्या अशा कलाकारांचं महत्व आपल्याला जाणवतं. मराठी सिनेसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे, अरुण सरनाईक, स्मिता पाटील या कलाकारांची अचानक एक्झिट रसिक प्रेक्षकांना चटका लावुन गेली होती.

याच कलाकारांमधलं एक नाव म्हणजे अभिनेत्री आणि लेखिका रसिका जोशी. आज रसिकाचा स्मृतीदिन. 

अगदी लहानपणापासून रसिकाचे बाबा तिला नाटकं दाखवायला घेऊन जायचे. त्यावेळी छोटी रसिका बाबांसोबत नाट्यगृहात जायची. रंगमंचावरचा कलाकार हसला की प्रेक्षक हसायचे. रंगमंचावरचा कलाकार दुःखी असला की प्रेक्षक सुद्धा शांत व्हायचे. लहानग्या रसिकाला या गोष्टीचं फार अप्रुप वाटायचं. रंगमंचावरचा कलाकार स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या भावनांना कसा मुठीत पकडतोय, याचं तिला फार कौतुक होतं. त्याच वयात तिने बाबांना सांगीतलं की, ‘मला त्या स्टेजवर बाई जसं करतात तसं करायला आवडेल. म्हणजे त्या बाई ठरवतात ना आपण हसायचं का रडायचं. तर मलाही असंच करायला आवडेल.’

रसिका शाळेत असल्यापासून शाळेच्या गॅदरींगमध्ये भाग घ्यायची. पुढे मग काॅलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तिने अभिनय करायला सुरुवात केली. 

रसिका स्वभावाने मस्तीखोर होती. त्याच दरम्यान दिग्दर्शिका विजया मेहता ‘नागमंडल’ नाटकासाठी अनेक मुलींच्या ऑडीशन्स घेत होत्या. तेव्हा रसिकाचा मित्र मंगेश कुलकर्णीने रसिकाला ‘काॅलेजमध्ये टाईमपास करण्यापेक्षा त्या ऑडीशनला जा’, असं सांगीतलं. रसिकाला विजया मेहता किती मोठ्या दिग्दर्शिका आहेत, याची काहीच कल्पना नव्हती. 

तिथे गेल्यावर तिथलं वातावरण, नाटक उभं करण्यामागची धडपड रसिकाला जवळुन अनुभवता आली. नाटक या प्रकाराचं गांभीर्य तिच्या लक्षात आलं. या नाटकात रसिका आणि नागेश भोसले कोरस मध्ये गायचे. त्यावेळी नाटकात इतकं काम नसल्याने संपूर्ण वेळ भक्ती बर्वेंचा अभिनय पाहणं आणि विजयाबाईंच्या दिग्दर्शनाची पद्धत जाणून घेणं हा रसिकासाठी एक वेगळाच अनुभव होता.

त्यावेळी अभिनय क्षेत्रात वाटचाल करण्याचा रसिकाचा प्रवास पक्का झाला. 

याचदरम्यान अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्याशी रसिकाची ओळख झाली. ‘कोणतीही भूमिका असो छोटी-मोठी. भूमिका राहूदे, अगदी जेवणासाठी कांदा काप. पण तू जसा कांदा कापशील तसा इतर कोणाला कापता आला नाही पाहीजे. तसं जमणार असेल तरच ते काम कर नाहीतर करु नको’ भक्ती बर्वेंचा हा सल्ला रसिकाने तिच्या संपूर्ण करियरमध्ये खुप जपला. 

रसिका मराठी नाटकांमध्ये स्वतःच्या अभिनयाने छाप पाडत होती. विनय आपटेंच्या ‘सुपरहिटनं.1’ या नाटकात रसिका आणि उपेंद्र लिमये आतंकवादी होते.

राम गोपाल वर्मा यांच्या असिस्टंटने हे नाटक पाहिलं. त्याने दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना रसिकाचं नाव सुचवलं. राम गोपाल वर्मा यांच्या ऑफीसमधून रसिकाला ऑडीशनसाठी दोन फोन येऊन गेले. त्यावेळी ती एका नाटकाच्या तालीमत होती. नाटकातलीच टारगट मंडळी मुद्दाम खोटा फोन लावून मस्करी करतायत, असं वाटून रसिकाने फोनकडे दुर्लक्ष केले. 

रामूंच्या ऑफीसकडून तिसरा काॅल आल्यावर रसिकाने इतरांना विचारलं. तेव्हा रसिकाला रामूंच्या ऑफीसमधून फोन येत असल्याची खात्री पटली, आणि ती ऑडीशनला गेली. ऑडीशन प्रक्रिया एव्हाना संपली होती. परंतु श्रीराम राघवन रसिकासाठी थांबले होते. त्यानंतर स्क्रीन टेस्ट वगैरे होऊन रसिकाने एका हिंदी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

सिनेमाचं नाव होतं ‘एक हसीना थी’. जेलमधल्या एका कैदीच्या भूमिकेत रसिका झळकली होती. 

रसिकाला ‘वसंत सोमण पुरस्कार’ जाहीर झाला. त्यावेळेस रत्नाकर मतकरींनी ‘पुरस्कार स्वीकारताना तू काहीतरी सादर कर’, असा रसिकासमोर आग्रह धरला. तेव्हा रसिकाने मित्र मिलींद फाटकला सोबत घेऊन एका एकांकिकेतील प्रवेश सादर करायचा विचार केला. परंतु रसिका-मिलींदचं वय हे त्या एकांकिकेतील प्रवेशाला साजेसं नव्हतं. 

तेव्हा रसिका आणि मिलिंदने त्या सोहळ्यापुरता एक २० मिनीटांचा छोटासा सीन लिहून काढला. ज्यावेळेस रसिका पुरस्कार स्वीकारायला गेली तेव्हा तिने सर्वांसमोर थाप मारली, की ‘मी-मिलींद एक आगामी नाटक करणार आहोत त्यातला एक प्रवेश तुमच्यासमोर सादर करतो.’ तो २० मिनीटांचा प्रवेश सर्वांना आवडला. त्यानंतर जेव्हा त्या सोहळ्यातले मान्यवर भेटायचे तेव्हा ‘काय मग! कुठवर आलंय नाटक?’ असं रसिकाला विचारायचे. 

रसिकाने एकंदर सर्वांच्या बोलण्याचं गांभीर्य ओळखलं. तिने मिलींदला हे सांगीतलं. मग दोघांनी २० मिनीटांच्या त्या प्रवेशाच्या विषयाला अनुसरुन एक संपूर्ण नाटक लिहीलं. ते नाटक होतं ‘व्हाईट लिली आणि नाईट रायडर’ .दोघांनी हे नाटक दिग्दर्शित करुन त्यात प्रमुख भूमिकाही साकारली. या नाटकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या नाटकानंतर रसिकाने केदार शिंदे दिग्दर्शित ‘यंदा कर्तव्य आहे’ या सिनेमासाठी कथा आणि संवादलेखन केले.

रसिका जोशीची अनेक बाबतीत स्वतःची अशी ठाम मतं होती. तिचं वाचन सुद्धा खुप चांगलं होतं. हिंदीतले कलाकार त्यांच्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी जसा वेळ देतात तसं मराठीत होताना दिसत नाही, हे तिला खटकायचं. आपला सिनेमा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मराठी कलाकारांनी सुद्धा प्रयत्न केले पाहीजेत, अशी तिची स्पष्ट भूमिका होती. 

नाटक चालू असताना फोनवर बोलणा-या प्रेक्षकांची तिला चीड यायची. एकदा तिच्या नाटकाच्या प्रयोगाला पहिल्या रांगेत असणा-या प्रेक्षकाला फोन आला. त्या प्रेक्षकाने फोन उचलला आणि तो फोनवर बोलायला लागला. त्याच्या या वर्तवणुकीमुळे रसिकाने नाटकाचा प्रयोग थांबवला होता. 

रसिकाचा स्वभाव आडपडदा न ठेऊन स्पष्ट बोलणारा असला तरी तिचे इंडस्ट्रीत खुप मित्र होते. जेव्हा अभिनेता पुष्कर श्रोत्री काॅलेजला होता. तेव्हा रसिकाने त्याचा अल्लड स्वभावगुण ओळखून या स्वभावाचा करियरमध्ये वापर करण्याचा सल्ला दिला.

तसेच जेव्हा तिने सुबोध भावेचा ‘बालगंधर्व’ सिनेमा पाहिला तेव्हा कौतुकाची थाप म्हणुन ५०० रु. ची नोट रसिकाने सुबोधला दिली. 

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि रसिकाची खुप चांगली मैत्री होती. रसिका गेल्यानंतर मुक्ताने तिच्या नावाने ‘रसिका’ हि निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेच्या अंतर्गत तिने ‘छापा काटा’, ‘कोडमंत्र’ अशा नाटकांची निर्मिती केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने रसिकानंतर तिच्या ‘व्हाईट लिली आणि नाईट रायडर’ नाटकात भूमिका साकारली. 

रसिका आणि तिचे पती गिरीश जोशी यांची सुद्धा काहीशी हटके प्रेमकहाणी आहे. प्रियदर्शन आणि राम गोपाल वर्मा या हिंदीतल्या दोन दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री म्हणजे रसिका. या दोघांच्या अनेक सिनेमांमध्ये ती झळकली आहे. मराठी सिनेसृष्टीतली पारपंरिक सोशिक आईची व्याख्या रसिकाने बदलली. ८ वर्ष ती कॅन्सरशी झुंजत होती. पण या दुर्धर आजाराचा तिने सहज स्वीकार केला. मराठी आणि हिंदीतल्या अनेक मालिकांमध्ये रसिकाने उत्तमोत्तम भुमिका साकारल्या.

आज रसिका आपल्यात नाही परंतु तिने केलेलं काम आणि तिने वठवलेल्या भूमिका सदैव तिची आठवण देत राहिल. ‘बोल भिडू’ तर्फे रसिकाला स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.