सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून सुप्रिया कर्णिक एअर होस्टेसचं काम करायच्या

बॉलिवूड आणि तिथलं ग्लॅमर हे आपल्याला कायमच खुणावत असत. म्हणजे एकवेळ आपण तिथं पोहचू शकत नाही हे आपल्याला आपल्या कुवती नुसार समजत जातं खरं पण जितके आपले मराठी सेलिब्रिटी लोकं बॉलिवूडमध्ये आपल्याला दिसून येतात तेव्हा बर वाटत. म्हणजे एकवेळ आपले मराठी सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये दिसले नाही तरी चालत पण जेव्हा जेव्हा साऊथ इंडियन सिनेमे बघतो आणि तेव्हा त्यात आपल्याला सयाजीराव शिंदे दिसून येतात तेव्हा आपसूकच मन आनंदी होतं. आता जर निवडक लोकं सोडले म्हणजे बॉलिवूडमध्ये मराठी सेलिब्रिटी असलेले अशोकमामा, लक्ष्यामामा, सयाजी शिंदे, नाना पाटेकर, रेणुका शहाणे, उषा नाडकर्णी, सध्याच्या काळात बोलायचं झालं तर जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव ही मंडळी दिसून येतात. पण एक अशी अभिनेत्री आहे जी बॉलिवूडमध्ये तुफ्फान गाजलेली आहे पण आपल्याला माहिती नाही की त्या मराठी आहेत. तर त्या आहेत सुप्रिया कर्णिक.

सध्या आपल्या देशात चाललेला धार्मिक आणि राजकीय खेळ आपण पाहतच आहोत. धार्मिक गोष्टी आणि त्याला बळी जाणारे निष्पाप नागरिक ही किड अजूनच फोफावत चालल्याचे लक्षण दिसून येत आहेत. याच धार्मिक गोष्टींचा कंगोरा धरून पाहिलं तर सुप्रिया कर्णिक या सौदी अरेबियात हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेस होत्या आणि त्या सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून एअर होस्टेसचं काम करायच्या. तर जाणून घेऊया त्यांच्या एकूण कारकिर्दीबद्दल. सुप्रिया कर्णिक यांची बॉलिवूडमध्ये त्या काळी मोठी क्रेझ होती म्हणजे आजही आहे त्यात काही वाद नाही.

सुप्रिया कर्णिक यांचा जन्म मुंबईत झाला. आता प्रत्येक पुरुषाला आपली प्रेयसी,बायको किंवा आवडणारी पोरगी ही लांबसडक केसांमध्ये आवडते पण सुप्रिया कर्णिक या गाजल्या त्या त्यांच्या बॉबकटमुळे. हाच लूक त्यांचा भरपूर लोकप्रिय झाला आणि त्यात त्यांचं दिसण एकदम कुल वाटायचं. बॉलिवूडमध्ये सुप्रिया कर्णिक या फेमस होत्याच पण खऱ्या अर्थाने त्या मराठी प्रेक्षकांच्या काळजात जाऊन बसल्या ते म्हणजे अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबतच्या तिसरा डोळा या मालिकेतून. ही मालिका अजूनही बऱ्याच कट्टर फॅन लोकांना आठवत असेल. कर्णिक या गाजल्या होत्या आणि अजूनही या मालिकेचे हिट डायलॉग, शीर्षक गीत लोकांना पाठ असेल. रमेश भाटकर आणि सुप्रिया कर्णिक ही जोडी चांगलीच गाजली.

सिनेमा क्षेत्रात येण्याआधी सुप्रिया कर्णिक यांनी बरेच जॉब केले होते. शेअर बाजारात गुंतवणूक करणे असो किंवा जितके छोटेमोठे व्यवसाय करता येईल तसे सगळे व्यवसाय त्या करून बसल्या होत्या आणि मग त्या सिनेमामध्ये आल्या. त्याही पलीकडे सुप्रिया कर्णिक सौदी अरेबियामध्ये एअर होस्टेस होत्या. तिथेही त्या आनंदाने आपलं काम करत होत्या. पण काही काळानं त्या आपल्या मायदेशी परतल्या आणि इथच रमल्या. दोन वेळा त्या प्रेमात पडल्या आणि दोन्ही वेळा त्यांची फसवणूक झाली पण सुप्रिया कर्णिक इतक्या हुशार होत्या की त्यांनी फसवणूक करणाऱ्याला चोपून काढल आणि अद्दल घडवली. मग मात्र त्या काय प्रेमा बिमाच्या प्रकरणात अडकल्या नाही.

बेवफा,राजा हिंदुस्थानी, यादे, जीस देस मे गंगा रहता है, वेलकम, मुझसे शादी करोगी हे सिनेमे सुप्रिया कर्णिक यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही इतकी दमदार छाप त्यांची होती.

वेलकम सिनेमा मधला त्यांचा डायलॉग हा आज स्पेशल मिम् मटेरियल मानला जातो, तो डायलॉग होता

अरे देखो ये जिंदा है….

जवळपास 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये सुप्रिया कर्णिक यांनी काम केलं आणि आजही लोकांना त्यांनी केलेल्या भूमिका विशेष लक्षात राहतात हे ही तितकंच महत्वाचं….

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.