बुरखा, हिजाब आणि नकाब मध्ये नेमका काय फरक असतो…

आपल्या देशात वाद काय नवीन नाहीत. वाईन वरून आपल्या राज्यात जसे दोन गट पडले आहेत. तसंच काहीसं आपल्या शेजारी कर्नाटकमध्ये  शाळकरी मुलींच्या पेहरावावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातही दोन गट पडले असून हा प्रश्न लोकसभेपर्यंत जाऊन पोहचला आहे.

तर पहिल्यांदा वाद नेमका काय आहे ते पाहुयात

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका सरकारी कॉलेज मधील मुस्लीम मुलींनी हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी मागच्या महिन्यापासून आंदोलन सुरु केले होते. तर कॉलेज व्यवस्थापनाने नियमांचे कारण देत हिजाब घालून वर्गात येण्यापासून रोखले होते. तसेच या वादात कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी असे कपडे घालून शाळा कॉलेजात येणं कायद्यात बसत नसल्याचं म्हटलं होतं.

आंदोलनतल्या काही विद्यार्थिनींचं  म्हणणे आहे की, इथे पुरुष शिक्षक आहेत आणि हिजाबशिवाय पुरुष शिक्षकासमोर बसण्याला आमची हरकत आहे. त्यानंतर हा वाद आता वाढला असून संपूर्ण कर्नाटक राज्यात याचे लोन पसरले आहे.

तर आता मुख्य मुद्द्याकडे येऊयात  

बुरखा, हिजाब आणि नकाब मध्ये नेमका काय फरक आहे 

वडील आणि पती सोडून इतर पुरुषासमोर जातांना संपूर्ण शरीर जावे अशी शिकवण इस्लाममध्ये असल्याचं सांगण्यात येतं.जगभरात हिजाबबाबत अनेक समजुती आहेत. सौदी अरेबिया, इराण, इराकमध्ये अनेक ठिकाणी महिलांना बाहेर पडण्यासाठी हिजाबची सक्ती केली जाते.तर युरोपमध्ये अनेक देशांनी यावर बंदी घातली आहे.

 हिजाब:

आधुनिक इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ पडदा असल्याचं सांगण्यात येतं. कुराणमध्ये हिजाब कपड्यांशी संबंधित नाही, तर महिला आणि पुरुषांमधील पडदा म्हणून आहे. कुराणात मुस्लिम पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सभ्य कपडे घालण्याची सूचना देण्यात आली आहे. येथे खिमार (डोके झाकण्यासाठी) आणि कपड्यांसाठी जिलबाब (लबादा ) हे शब्द सांगितले आहेत. हिजाब अंतर्गत, पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सैल आणि आरामदायक कपडे घालण्यास तसेच डोके झाकण्यास सांगितले आहे.


निकाब:

नकाब किंवा निकाब म्हणजे चेहरा झाकण्याचे कापड. यामध्ये डोके पूर्णपणे झाकलेले असते. इस्लाममध्ये कोठेही चेहरा झाकण्यास सांगितलेले नाही, फक्त डोके आणि केस कापडाने झाकले पाहिजे असंही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे . पण कट्टरतावादी देशांमध्ये महिलांनाही तोंड लपवणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत डोके, चेहरा झाकणे आणि फक्त डोळे उघडे ठेवणे हे नकाबाचे काम असते. सामान्यतः हे काळ्या रंगाचे कापड असते जे पिनच्या मदतीने लावले जाते.

बुरखा:

भारतात, मुस्लिम महिलांनी परिधान केलेल्या काळ्या कपड्यासारख्या पोशाखाला आपण अनेकदा बुरखा म्हणतो. वास्तविक बुरखा हा त्याहून वेगळा आहे. निकाबचा पुढचा स्तर म्हणजे बुरखा. जिथे निकाबमध्ये डोळे सोडून संपूर्ण चेहरा झाकलेला असतो, तिथे बुरख्यात डोळेही झाकलेले असतात. डोळ्यांच्या जागी एकतर खिडकीसारखी जाळी तयार केली जाते किंवा कापड हलके असते जेणेकरुन ते पाहता येईल. यासोबतच संपूर्ण शरीरावर घोळदार झगा असतो.

आता तुम्हाला जी सांगायची ती माहिती आम्ही सांगितली. असं म्हणतात कपडे हे प्रत्येकाच्या संस्कृतीचा भाग असतो त्यामुळं दिलेल्या माहितीत थोडा फार बदलही असू शकतो. बाकी कर्नाटकातल्या हिजाबवरच्या वादावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.